शिवाजी पार्कचं कायद्यानुसार नामांतर करू - सेना

शिवाजी पार्कचं शिवतीर्थ नामांतर करण्याचा मुद्दा आता चांगलाच पेटलाय. कायद्यानुसार नामांतर करुच, अशी ठाम भूमिका शिवसेनेनं घेतलीय. तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेनं या मुद्यावर विरोधाची भूमिका घेतल्यानं शिवसेना एकाकी पडलीय. तर वरिष्ठ नेते या प्रकरणी निर्णय घेतील अशी भूमिका भाजपनं घेतल्यानं शिवसेनेच्या समस्येत भर पडलीय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 11, 2012, 03:22 PM IST

www.24taas.com,मुंबई
शिवाजी पार्कचं शिवतीर्थ नामांतर करण्याचा मुद्दा आता चांगलाच पेटलाय. कायद्यानुसार नामांतर करुच, अशी ठाम भूमिका शिवसेनेनं घेतलीय. तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेनं या मुद्यावर विरोधाची भूमिका घेतल्यानं शिवसेना एकाकी पडलीय. तर वरिष्ठ नेते या प्रकरणी निर्णय घेतील अशी भूमिका भाजपनं घेतल्यानं शिवसेनेच्या समस्येत भर पडलीय.
शिवाजी पार्कला शिवतीर्थ नाव देण्यासाठी शिवसेनेनं आग्रही भूमिका घेतलीय. तर काँग्रेसनंही शिवाजी महाराज आणि मराठी माणसांची अस्मिता हे त्यांच्या डिक्शनरीत नसलेले शब्द घेऊन शिवतीर्थला विरोध केलाय. ऐतिहासिक वास्तूचं नाव बदलणं सहन करणार नाही, असा इशारा काँग्रेसनं दिलाय. तर नामांतराचा प्रस्ताव पास झाल्यास कोर्टात जाऊ, असं राष्ट्रवादीनं स्पष्ट केलंय.

नामांतराच्या मुद्यावर भाजपच्या नेत्यांनी वरिष्ठ निर्णय घेतील असं सांगत ते शिवसेनेबरोबर नसल्याचं दाखवून दिलंय. तर मनसेनंही ऐतिहासिक वास्तूंचं नाव बदलण्यास विरोध असल्याचं स्पष्ट केलंय.
शिवाजी पार्क, शिवसेना आणि शिवसेनाप्रमुख हे जणू समीकरणच आहे. याच शिवाजी पार्कला शिवसेनाप्रमुखांनी शिवतीर्थ असं संबोधल्यानं शिवसेनेसाठी हा प्रतिष्ठेचा मुद्दा बनलाय. महापौरांनीही कायद्यानुसार नामांतर करूच असं ठणकावून सांगितलंय.
शिवाजी महाराजांच्या नावावरून राजकारण करणा-या शिवसेनेच्या भूमिकेत यावेळी काँग्रेस शिरलीय. परिणामी आगामी काळात दोन्ही बाजूंकडून राजकीय तलवारी उपसल्या जाऊन चांगलाच खणखणाट होणार हे नक्की.

दरम्यान, शिवसेनेने मुंबईतील सर्व शिवसैनिकांना शिवाजी पार्क येथे एकत्र येण्याचे आदेश दिले आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्यविधीची जागा मोकळी करण्यासंदर्भात कारवाई होण्याची शक्यता असल्याने हे आदेश दिलेत. त्यामुळे शिवाजी पार्कवर कार्यकर्त्यांचा गर्दी दिसत आहे. तर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शिवाजी पार्कमध्ये पोलिसांनीही कडक बंदोबस्त ठेवला आहे.