अबु आझमींचा शिवतीर्थ नावाला विरोध

By Surendra Gangan | Last Updated: Tuesday, December 11, 2012 - 16:29

www.24taas.com,नागपूर
समाजवादी पार्टीने मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्कचे नाव बदलण्यास विरोध केला आहे. पक्षाचे आमदार अबु आझमी यांनी विरोध करताना स्पष्ट केलंय, या मैदानाला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. त्यामुळे शिवतीर्थ नाव देणे योग्य नाही.
शिवाजी पार्कचं शिवतीर्थ नामांतर करण्याचा मुद्दा आता चांगलाच पेटलाय. कायद्यानुसार नामांतर करुच, अशी ठाम भूमिका शिवसेनेनं घेतलीय. तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेनं या मुद्यावर विरोधाची भूमिका घेतल्यानं शिवसेना एकाकी पडलीय. त्यातच समाजवादी पार्टीनेही विरोध दर्शविला आहे. नागपूर येथे समाजवादीचे आमदार अबु आझमी यांनी शिवसेनेच्या भूमिकेला विरोध केला आहे. शिवाजी पार्कचे नाव बदलण्याचा मार्ग चुकीचा असल्याचे आझमी यांनी म्हटलेय.

शिवाजी पार्कला शिवाजी महाराज यांच्यामुळे नाव दिलेले आहे. ते सर्वांच्या मनात आहे. या मैदानाला ऐतिहासिक महत्व आहे. त्यामुळे ऐतिहासिक महत्वाला धक्का पोहोचविणे योग्य नाही. मुंबई पालिकेमध्ये शिवसेनेची सत्ता आहे. त्यामुळे जर शिवसेनाप्रमुख बाळ ठाकरे यांचे नाव द्यायचे असेल तर त्यांनी मुंबईत दुसरे मैदान तयार करावे आणि त्याला त्यांचे नाव द्यावे. याला कोणाचीच हरकत नसेल, असे आझमी यांनी विरोध करताना सांगितले.

शिवाजी महाराज यांच्यामुळे शिवाजी पार्कला नाव दिलेले आहे. ते सर्वांच्या मनात आहे. अशा स्थितीत नाव बदले योग्य होणार नाही. आपल्या नेत्याविषयी ज्यांना काही करायचे आहे. त्यांनी दुसऱ्या ठिकाणी मैदान तयार करून ते करावे. मात्र, कोणाच्यातरी हट्टासाठी शिवाजी पार्कचे नाव बदलणे योग्य होणार नाही, अशी भूमिका आझमी यांनी मांडून विरोध केलाय.First Published: Tuesday, December 11, 2012 - 15:56


comments powered by Disqus