बाळासाहेब स्मारकाबाबत सेनेची मवाळ भूमिका

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्कमधील स्मारकाचा वाद आता निवळण्याची चिन्हं निर्माण झाली आहेत. शिवाजी पार्कमध्ये स्मारक व्हावं, असा शिवसेनेने आग्रह धरला नव्हता, असे शिवसेना नेते खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी स्पष्ट केले. त्यामुले सेनेची मवाळ भूमिका दिसत आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 2, 2012, 07:18 PM IST

www.24taas.com,मुंबई
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्कमधील स्मारकाचा वाद आता निवळण्याची चिन्हं निर्माण झाली आहेत.
शिवाजी पार्कमध्ये स्मारक व्हावं, असा शिवसेनेने आग्रह धरला नव्हता, असे शिवसेना नेते खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी स्पष्ट केले. त्यामुले सेनेची मवाळ भूमिका दिसत आहे.
शिवाजी पार्कवर स्मारक उभारण्यात येणा-या अडचणी समोर येऊ लागल्यानंतर आता याच ठिकाणी स्मारक उभारण्याची शिवसेनेची भूमिका मवाळ झाल्याची चिन्हं दिसतेय. गेल्याच आठवड्यात शिवाजी पार्कवरच स्मारक होईल, असं शिवसेना नेते सांगत होते. मनोहर जोशी यांनी तर कायदा हाती घेण्याची भाषा केली होती. मात्र आज संजय राऊत यांनी शिवाजी पार्कवर स्मारक उभारावं, अशी मागणी कधीच केलेली नसल्याचं म्हटलंय.
दरम्यान, शिवाजी पार्कवरील बाळासाहेबांच्या तात्पुरत्या स्मारकाची जागा रिकामी करण्याचा निर्धार राज्य सरकारनं केलाय. अर्थात, हा प्रश्न शक्यतो सामंजस्यानं सुटावा, असाही सरकारचा प्रयत्न आहे. मात्र याला यश न आल्यास अन्य पर्यायांचाही विचार सुरू आहे आणि त्या दिशेनं तयारीही सुरू आहे, अशी माहिती सूत्रांनी दिलीये.
वरिष्ठ पोलिस अधिका-यांच्या उपस्थितीत नुकत्याच झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत याबाबत निर्देश देण्यात आलेत. शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मध्यस्थीनं यावर तोडगा निघेल, अशी आशाही सरकारला वाटतेय.
दरम्यान, दिल्लीची भांडी घासणा-यांनी बाळासाहेबांच्या स्मारकासंदर्भात बोलू नये, अशी बोचरी टीका संजय राऊत यांनी केलीये. बाळासाहेबांबद्दल बोलणा-या 3-5 काँग्रेस नेत्यांचं मराठीसाठी योगदान काय असा सवालही त्यांनी केलाय. त्यामुळे हा वाद पेटण्याची शक्यता होती.
शिवसेनेनं शिवाजी पार्कवर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला विरोध करणा-यांना कडक इशारा दिलाय. अर्थात बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी शिवसेना दुस-या जागेच्या शोधात असल्याचंही स्पष्ट करण्यात आलय. दुसरीकडे सामाजिक कार्यकर्त्या आभा सिंग यांनी अग्नीसंस्कार झालेल्या ठिकाणी बांधण्यात आलेला चौथरा पर्यावरणाच्या नियमांचं उल्लंघन करणारा असल्याची तक्रार दाखल केलीय. त्यामुळे तिढा वाढत चालला आहे.
दरम्यान, मुंबईतल्या शिवाजी पार्कवर बाळासाहेबांवर जिथं अग्निसंस्कार झाले तिथं तयार करण्यात आलेला चौथरा हटणार नाही, अशी सक्त ताकीद संजय राऊत यांनी दिलीय. मात्र बाळासाहेबांच्या स्मारकासाठी शिवसेना पाच एकर जागेच्या शोधात असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलय. त्यामुळे स्मारकाबाबत मवाळ धोरण सेनेने स्वीकारल्याचे दिसत आहे.

सहा डिसेंबरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखो अनुयायी शिवाजी पार्कवर येणार आहेत. तर दुसरीकडे बाळासाहेब ठाकरे यांच्यावर अग्निसंस्कार करण्यात आलेल्या ठिकाणाच्या दर्शनासाठीही शिवसैनिक मोठ्या संख्येनं येतायेत. त्यामुळे सरकारसमोरील अडचणी दिवसेंदिवस वाढतच चालल्यायेत.