बाळासाहेबांच्या भेटीसाठी अभिनेत्यांनी लावली रीघ

बाळासाहेब उपचारांना प्रतिसाद देत असून त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याचं शिवसेना नेते मनोहर जोशी तसच अनिल देसाईंनी म्हटलयं.

Updated: Nov 16, 2012, 05:36 PM IST

www.24taas.com, मुंबई
बाळासाहेब उपचारांना प्रतिसाद देत असून त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याचं शिवसेना नेते मनोहर जोशी तसच अनिल देसाईंनी म्हटलयं. देसाईंनी सकाळी मातोश्रीवर जाऊन बाळासाहेबांच्या प्रकृतीची विचारपूस केली. बाळासाहेबांची विचारपूस करण्यासाठी शिवसैनिकांची, नेत्यांची मातोश्रीवर गर्दी सुरूच आहे.
शिवसेना नेते मनोहर जोशी, आरपीआय नेते रामदास आठवले यांनी मातोश्रीवर येऊन बाळासाहेबांच्या प्रकृतीची विचारपूस केली. दरम्यान डॉक्टरांचं पथक रुटीन चेकअपसाठी मातोश्रीवर दाखल झालंय... मातोश्रीवर बाळासाहेबांच्या प्रकृतीच्या चौकशीसाठी आजही नेते अभिनेते आणि अध्यात्मिक गुरुंनी हजेरी लावली.
सकाळी शिवसेना खासदार अनिल देसाई, मनोहर जोशी आरपीआय नेते रामदास आठवलेंनी मातोश्रीवर भेटी दिल्या. तर अभिनेता विवेक ओबेरॉय, राकेश रोशन,जुही चावला यांनी आणि योगगुरु बाबा रामदेव यांनीही बाळासाहेबांच्या प्रकृतीची चौकशी केली.
शिवसेनाप्रमुखांवर उपचार सुरू असलेल्या दुसऱ्या मजल्यावर जाण्यास परवानगी देण्यात आली नाही. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघेच वरखाली करीत होते. नेतेमंडळी, उद्योगपती किंवा बॉलिवूडमधील बडय़ा हस्तींना केवळ शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची भेट घेता आली. शरद पवार यांनी काही काळ उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली.