सेनाप्रमुख आणि शिवसैनिकांमध्ये पडणार नाही - उद्धव

By Shubhangi Palve | Last Updated: Tuesday, November 20, 2012 - 18:51

www.24taas.com, मुंबई

शिवसेनाप्रमुखांच्या शिवाजी पार्कवरील स्मारकाबाबत पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिलीय. स्मारकाबाबत वाद घालण्याची ही वेळ नाही. आमच्या भावना टीकेचा सूर काढणाऱ्यांनी समजून घ्यावात, अशी आवाहन शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केलंय.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर सुरू झालेल्या स्मारकाच्या वादावर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिलीय. एका निवेदनाच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांनी आपलं म्हणणं मांडलंय. या निवेदनात उद्धव ठाकरे म्हणतात, ‘बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकावरून वाद घालण्याची ही वेळ नाही... ठाकरे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळलाय... शिवसेना परिवार या धक्क्यातून अजून सावरू शकलेला नाही. तरच हा वाद का?’ असा प्रश्न त्यांनी विरोधकांना विचारलाय.
‘आमच्या सगळ्यांच्या भावना वाद घालणाऱ्यांनी आणि टीकेचा सूर काढणाऱ्यांनी समजून घ्याव्यात... विनाकारण वाद घालणाऱ्यांना हात जोडून नम्र विनंती आहे, कृपया संयम राखण्यास सहकार्य करावे’ असं आवाहन शिवसेना कार्याध्यक्षांनी केलंय. याचबरोबर स्मारकाविषयी आपली वैयक्तिक भूमिका स्पष्ट करताना ते म्हणतात, ‘स्मारकाबद्दलचा निर्णय लाखो कडवट शिवसैनिकच घेतील… शिवसेनाप्रमुख आणि शिवसैनिक यांच्यामध्ये मी पडणार नाही’.
शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी मात्र शिवसेना शिवाजी पार्कवर बाळासाहेबांच्या स्मारक बनवण्याच्या मुद्द्यावर ठाम असल्याचं म्हटलंय.

First Published: Tuesday, November 20, 2012 - 18:33
comments powered by Disqus