... असं घडलं बाळासाहेबांचं व्यक्तिमत्वं

अन्यायाविरोधात आवाज उठवणाऱ्या, समाजाच्या दांभिकपणावर प्रहार करणाऱ्या आणि प्रबोधनातून समाजकल्याण हे एकमेव ध्येय असणाऱ्या प्रबोधनकारांचा वारसा बाळासाहेबांनी नुसताच समर्थपणे पेलला नाही, तर प्रबोधनकारांचा संस्कार महाराष्ट्राच्या घराघरात रुजवला.

शुभांगी पालवे | Updated: Nov 17, 2012, 06:53 PM IST

www.24taas.com, मुंबई
शिवसैनिकाचा श्वास आणि मराठी मनांचा ध्यास असणारे बाळासाहेब... केशव सीताराम ठाकरे अर्थात प्रबोधनकारांचा हा मुलगा... अन्यायाविरोधात आवाज उठवणाऱ्या, समाजाच्या दांभिकपणावर प्रहार करणाऱ्या आणि प्रबोधनातून समाजकल्याण हे एकमेव ध्येय असणाऱ्या प्रबोधनकारांचा वारसा बाळासाहेबांनी नुसताच समर्थपणे पेलला नाही, तर प्रबोधनकारांचा संस्कार महाराष्ट्राच्या घराघरात रुजवला. म्हणूनच बाळासाहेबांच्या एका शब्दासाठी जीवावर उदार होणारे हजारो मावळे या महाराष्ट्रात तयार झाले.
४६ वर्षांपूर्वी शिवसेनेचा जन्म झाला. दृढनिश्चयी आणि निर्भीड सेनापतीच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची घोडदौड सुरू झाली. पण, त्याआधी व्यंगचित्रांमधून ही चळवळ आकाराला येत होती. तरुण तडफदार बाळासाहेबांची १९५० च्या दशकातली फ्री प्रेस जर्नलमधली व्यंगचित्रं राजकारणावर रोखठोक भाष्य करत होती. रेषांचे फटकारे अचूक काम करतायत, हे बाळासाहेबांना वेळीच उमगलं आणि जन्म झाला मार्मिकचा. भारतात महाराष्ट्राला मानाचं स्थान होतं. पण मुंबईत मात्र मराठी माणसाला आदर मिळत नव्हता. या न्यूनगंडाखाली पिचलेल्या मराठी माणसाला बाळासाहेबांच्या मार्मिकनं खडबडून जागं केलं आणि मराठी माणसाच्या न्यूनगंडाचं रुपांतर अभिमानात झालं. हा चमत्कार घडवला तो बाळासाहेबांच्या सडेतोड रेषांनी....

व्यंगचित्रांमुळे मराठी माणूस जागा होईल पण संघटित होणार नाही, हे बाळासाहेबांनी ओळखलं.... आणि 19 जून 1966 रोजी शिवसेनेची मुहूर्तमेढ रोवली गेली.... शिवतीर्थावर 30 ऑक्टोबर 1966 ला शिवसेनेचा पहिला मेळावा झाला. या पहिल्यावहिल्या मेळाव्याला पाच लाख लोक उपस्थित होते.... मराठी बाणा घेऊन राजकारणाच्या मैदानात उतरलेल्या शिवसेनेची घोडदौड सुरू झाली.... मराठी लोकांचे प्रश्न, मराठी माणसाचा रोजगार, मराठी विरुद्ध परप्रांतीय, हिंदुत्व सीमाप्रश्नाबद्दल बाळासाहेबांनी ठाकरी शैलीत आवाज उठवला आणि महाराष्ट्रात बाळासाहेब नावाचं वादळ घोंगावू लागलं. मराठी माणूस मराठी माणसाच्या कल्याणासाठी एकत्र झाला.... तो अभिमानानं शिवसैनिक असं बिरुद मिरवू लागला. लढवय्या सेनापतीच्या या शिवसेनेनं ठाणे महापालिकेवर पहिला भगवा फडकवला..... गाव तिथे शाखा आणि घर तिथे शिवसैनिक या न्यायानं संघटनेचं जाळं घट्ट विणलं गेलं मग ग्रामपंचायती, जिल्हा परिषदा, नगरपालिका, महापालिका शिवसेनेनं सर केल्या..... 1988 साली महाराष्ट्राच्या विधानसभेत फक्त 3 आमदार असलेली शिवसेना 1995 साली महाराष्ट्राच्या सिंहासनावर विराजमान झाली....शिवसेना-भाजप युतीचं शासन आलं, मंत्रालयावर भगवा फडकला. हे साध्य झालं ते बाळासाहेबांचे परखड विचार, अस्सल ठाकरी भाषा आणि झुंजार सभांच्या जोरावर.... युतीची सत्ता जाऊनही अनेक वर्षं लोटली. पण मुंबई महापालिकेवरचं वर्चस्व कायम राहिलं.....आताच्या महापालिका निवडणुकांमध्येही 86 वर्षांचे बाळासाहेब धडाडीनं उतरले. आणि महापालिता ताब्यात आलीच. शिवसेनेनं अनेक चढ-उतार पाहिले पण बाळासाहेब या नावाचं तेज कमी झालं नाही..... सच्चा शिवसैनिक असलेल्या छगन भुजबळांनी शिवसेना सोडली.... बाळासाहेबांनी त्याहीवेळी लखोबा म्हणत भुजबळांना पळता भुई थोडी केली..... शिवसेनेनं ज्यांना मुख्यमंत्रिपद बहाल केलं, त्या नारायण राणेंनी शिवसेना जय महाराष्ट्र केला.... उडाले ते कावळे आणि राहिले ते मावळे म्हणत बाळासाहेबांनी हाही वार अंगावर झेलला..... पण अंगाखांद्यावर खेळवलेल्या राजनं शिवसेना सोडली आणि हा घाव मात्र बाळासाहेबांच्या जिव्हारी लागला..... एकेकाळी सच्चे आणि निष्ठावान म्हणून ज्यांना जपलं त्यांनी दिलेल्या या जखमा सहन करणं सोपं नक्कीच नव्हतं पण बाळासाहेब त्यातूनही तावून सुलाखून निघाले..... आणि तेजाचा हा सूर्य आणखी तळपता झाला.... तब्बल पन्नास वर्ष एखाद्या नेत्याच्या करिष्म्यावर अख्खा महाराष्ट्र फिदा होतो, त्याच्यासाठी जीव टाकतो, त्याच्या एका शब्दानं पेटून उठतो....त्यानं हात उंचावताच शांत होतो.... हा चमत्कार महाराष्ट्रात घडला.... अख्ख्या जगानं तो पाहिला..... आणि आपण सगळे खरंच भाग्यवान, आपण हा चमत्कार याचि देही याचि डोळा अनुभवला.....