शिवसेनेशी आता वैर नाहीः नारायण राणे

यापुढे शिवसेनेबाबत आकासाचं आणि वैमनस्याच राजकारण करणार नसल्याचं उद्योगमंत्री नारायण राणेंनी म्हटलयं. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर शिवसेनाप्रमुख या पदाबाबद घेतलेला निर्णय योग्यच असल्याचंही त्यांनी म्हटलंय.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Dec 4, 2012, 03:27 PM IST

www.24taas.com, मुंबई
शिवसेनेबाबत माझ्या मनात यापूर्वीही आकस व वैमनस्य नव्हते व आताही नाही. मात्र माझ्याकडे जे पैलू आहेत त्याचा वापर मी योग्य वेळेस करेन असे प्रतिपादन उद्योगमंत्री नारायण राणे यांनी ठाण्यात केले.

ठाणे महापालिकेतील स्थायी समितीचे सभापती रवींद्र फाटक यांच्या दालनाचे उद्घाटन राणे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी तुमचे व शिवसेनेचे संबंध पूर्वीसारखेच आहेत काय असे त्यांना विचारले, त्यावर त्यांनी वरीलप्रमाणे भाष्य केले. दुसरे शिवसेनाप्रमुख होणार नाहीत असे शिवसेनेचे कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते. त्याबाबत विचारले असता नारायण राणे म्हणाले, या निर्णयाचे मी स्वागत करतो. कारण बाळासाहेब हेच एकमेव शिवसेनाप्रमुख आहेत.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर शिवसेनाप्रमुख या पदाबाबद घेतलेला निर्णय योग्यच असल्याचंही त्यांनी म्हटलंय.
बाळासाहेबांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांच्या सांत्वनासाठी नारायण राणे यांनी मातोश्रीवर जाण्याची परवानगी मागितली होती. `साहेबांची शेवटपर्यंत भेट झाली नाही, याचं शल्य आयुष्यभर मला राहील...` असं म्हणत नारायण राणे यांनी प्रचंड दु:ख व्यक्त केलं होतं. नारायण राणेंनी `झी २४ तास`कडे त्यांच्या भावना व्यक्त केल्या होत्या. मला नगरसेवक ते मुख्यमंत्री या पदापर्यंत साहेबांच्या आणि फक्त साहेबांच्याच कृपेने पोहचलो, अशी कबुलीही त्यांनी यावेळी दिली.
बाळासाहेब मला माफ करा. मी खूप त्रास तुम्हाला त्रास दिला आहे, असे पश्चातापाचे उद्गार माजी शिवसेनेचे नेते आणि काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी काढले होते.
साहेबांना मी त्रास दिला, याचे क्षल्य मला सतत सतावत राहिले. त्यांच्यामुळे मी घडलो आणि वाढलो. मी साहेबांची माफी मागतो, अशा भावना राणे यांनी व्यक्त केल्या.
मी आज जे काही घडलो. ते फक्त साहेबांमुळेच असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. साहेब गेल्याचं दु:ख प्रचंड आहे. मराठी माणसासाठी लढणारा नेता आजवर पाहिला नाही. मराठी माणसाला स्वाभिमानाने जगण्यासाठी बाळासाहेबांनीच शिकवलं` या शब्दात नारायण राणे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात होत्या.