अजित पवार : महापालिकेच्या चक्रव्युहातील अर्जुन की अभिमन्यू....!

अजित पवार... राज्यातील राजकारणातले एक प्रमुख नाव...शरद पवार यांच्या सावलीत मोठे झालेले हे नेतृत्व असले तरी कामाच्या शैलीने स्वतःच राजकीय अस्तित्व बनवलेले हे व्यक्तिमत्व.

Updated: Nov 30, 2016, 06:55 PM IST
अजित पवार : महापालिकेच्या चक्रव्युहातील अर्जुन की अभिमन्यू....! title=


कैलास पुरी

कैलास पुरी, झी मिडिया पिंपरी चिंचवड :  अजित पवार... राज्यातील राजकारणातले एक प्रमुख नाव...शरद पवार यांच्या सावलीत मोठे झालेले हे नेतृत्व असले तरी कामाच्या शैलीने स्वतःच राजकीय अस्तित्व बनवलेले हे व्यक्तिमत्व. त्यांच्या नेतृत्व गुणांचे अनेकदा कसब लागले, बहुतांश वेळा त्यात ते यशस्वी झाले. पण लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपासून त्यांचे राजकीय फासे उलटे पडू लागलेत. विधानपरिषदेत त्यांची गणिते चुकली. तीच स्थिती नगरपरिषदेच्या निवडणुकीत पाहिला मिळाली. आता महापालिकेच्या निवडणुकीला अजित पवार सामोरे जातात. त्यांच्यावर पुणे जिल्ह्याची जबाबदारी आहे. पण या निवडणुकीला सामोरे जाताना त्यांची अवस्था चक्रव्युव्हात अडकलेल्या योध्या सारखी झालीय. 

पिंपरी चिंचवड खरे तर अजित पवार यांचा खऱ्या अर्थाने बालेकिल्ला. अजित पवार यांचा शब्द पिंपरी चिंचवडमध्ये प्रमाण मानला जातो. पण त्यांच्या या बालेकिल्याचे बुरुज आता ढासळलेत. अजित पवार यांनीच राजकीय ताकत दिलेले लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे त्यांना आव्हान द्यायला तयार झालेत. शहर पातळीवरच्या मोठ्यातल्या मोठ्या नेत्यापासून अगदी सामान्य कार्यकर्ता पवारांच्या शब्दाबाहेर नव्हता. पण लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांच्या नंतर त्यांचे पाठीराखे तर भाजपवासी झाले आहेतच ,पण शहरातले अजित पवार यांनीच मोठे केलेले किती तरी नगरसेवक, कार्यकर्ते तिकीट मिळाले नाही तर त्यांची साथ सोडायला तयार आहेत.

लक्ष्मण जगताप यांचे आजचे शहरातले जे राजकीय वजन आहे त्यात अजित पवार यांचा वाटा मोठा आहे ही वस्तूस्थिती आहे. लक्ष्मण जगताप यांना दोनदा अपक्ष आमदार करताना अजित पवार यांनी किती साथ दिली होती हे पिंपरी चिंचवड मधल्या बहुतांश लोकांना माहीत आहे. जगताप भाजप मध्ये जाण्यापूर्वी त्यांच्या किती तरी लोकांना महापालिकेतली अनेक सत्तेची पदे अजित पवार यांनी बहाल केली. विशेष म्हणजे जगताप भाजप मध्ये गेले तरी त्यांच्या गटाच्या शकुंतला धऱ्हाडे यांना पवारांनी महापौरपदी कायम ठेवले. आता जगताप भाजपवासीय झालेत. त्यामुळे अजित पवार शहरात येण्याच्या आधी मी नगरसेवक होतो असे सांगत अजित पवारांचे आपल्या राजकीय वाटचालीत आपले कसलेही योगदान नसल्याचे सांगतायेत. ते काही वेळ खरे जरी मानले तरी किमान लक्ष्मण जगताप यांच्या रूपाने अजित पवार यांच्या पुढे त्यांचे स्वकीयच लढाईला आहेत हे ही तितकंच खरे.
 
तीच परिस्थिती महेश लांडगे यांची. महेश लांडगे यांना ही विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार यांनी सोन्याची अंडी देणाऱ्या स्थायी समितीचे अध्यक्षपद दिले होते. अपक्ष आमदार म्हणून निवडून आल्यानंतर ही अजित पवार यांनी त्यांना दूर केले नव्हते. पण राजकीय महत्वकांक्षा वाढलेल्या महेश लांडगे यांनी महापालिकेला काही महिने राहिले असताना भाजप मध्ये प्रवेश केला आणि आता अजित पवार यांच्या विरोधात दंड थोपटलेत.

महेश लांडगे यांच्या राजकीय जडण घडणीतही अजित पवार यांचे मोठे योगदान आहे. पण महापालिका निवडणुकीच्या रणांगणात महेश लांडगे यांच्या रूपाने ही आणखी एक स्वकीय त्यांच्या विरोधात आहे. हे झाले सरळ सरळ लढाईला उभारलेल्या नेत्यांचे. पण अजित पवार यांना या नेत्यांबरोबरच पक्षातल्या नेत्यांशी ही युद्ध करावे लागतंय की काय अशी शक्यता निर्माण झालीय.  विधानपरिषदेत निवडणुकीत तिकीट नाकारल्याने राष्ट्रवादी मधल्या शहरातल्या तगड्या नेत्यांनी ही भाजपच्या नेत्यांबरोबर गुप्त बैठक घेतल्याची चर्चा आहे. त्यात अजित पवार यांच्यावर नाराजी व्यक्त झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे पक्षातल्या या नेत्यांनी असहकार पुकारला तर लढाईत पक्षातले स्वकीयही असणार आहेत.  

प्रमुख नेतेच नाही तर शहरातल्या अनेक नगरसेवक, कार्यकर्त्यांना अजित पवार यांनी आर्थिक दृष्ट्या सक्षम केले. महापालिकेतली कामे, व्यवसायात मदत असे या ना त्या मार्गाने पवारांनी अनेकांना मोठे केले. पण या नगरसेवक, कार्यकर्त्यांची महत्वकांक्षा ही चांगलीच वाढलीय. किती तरी नगरसेवक, कार्यकर्ते अजित पवारांच्या कार्यक्रमाला हजर राहतात आणि रात्री दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांच्या घरी हजेरी लावतात हे चित्र सऱ्हास दिसते. वास्तविक पाहता अजित पवार यांनी मोठे केले असताना वाढलेल्या महत्वाकांक्षेमुळे ऐन क्षणी अजित पवार यांची साथ सोडायला मागे पुढे न पाहणारे नगरसेवक आणि कार्यकर्ते किती तरी प्रमाणात शहरात वावरतायेत. ते स्वकीय ही अजित पवार यांच्या पुढे आहेतच. 
 
एकूणच काय तर अजित पवार पिंपरी चिंचवड महापालिकेच्या रणसंग्रामात उघड विरोध करणाऱ्या पण दुसऱ्या पक्षात गेलेल्या कधी काळच्या स्वकीयांसह, पक्षातल्या स्वकीयांनी तयार केलेल्या चक्रव्यूहात अडकलेत. पण राजकारणात भावनेला महत्व नसते, संधीला असते. त्यामुळे अजित पवार यांनी दु:ख करण्याचे कारण नाही. प्रश्न आहे तो नेतृत्व सिद्ध करण्याचा. आता पर्यंत पिंपरी चिंचवड मध्ये तरी त्यांचे डावपेच उलटे पडले नाहीत. पण राजकारणात काही ही सांगता येत नाही. किमान सध्याच्या बदललेल्या परिस्तिथीत. त्यामुळे आता चक्रव्यूहात अडकलेल्या अजित पवारांचा त्यांच्या स्वकीयांनी घात केला तर त्यांचा अभिमन्यू होणार आणि ते यशस्वी झाले तर ते पिंपरी चिंचवडचे अजेय अर्जुन होणार...!