आई कधीच अपवित्र नसते, मग 'ती' कशी?

( दीपाली जगताप पाटील, झी २४ तास ) 'ती'ने शनिदेवाचं दर्शन घेतलं म्हणून शनिदेवाला दुग्धाभिषेक केला गेला. कोणत्या आणि कसल्या पुरोगामी महाराष्ट्राच्या गप्पा मारतो आपण ? लाज नाही वाटत का आपल्याला? 

Updated: Dec 1, 2015, 12:25 AM IST
आई कधीच अपवित्र नसते, मग 'ती' कशी? title=

मुंबई : ( दीपाली जगताप पाटील, झी २४ तास ) 'ती'ने शनिदेवाचं दर्शन घेतलं म्हणून शनिदेवाला दुग्धाभिषेक केला गेला. कोणत्या आणि कसल्या पुरोगामी महाराष्ट्राच्या गप्पा मारतो आपण ? लाज नाही वाटत का आपल्याला? 

आईचं दूध पिऊनच सगळे मोठे होतात. ते दूध नाही का अपवित्र वाटत यांना? तुमच्या घरात 'ती'च स्वयंपाक करते. ते जेवण नाही का अपवित्र वाटत तुम्हाला?  'ती' 'त्या' दिवसातंही शेतात राबते. ते पिक नाही का अपवित्र वाटत तुम्हाला?, तुमच्या बाळाला जन्म देते, ते बाळ का नाही अपिवत्र वाटत तुम्हाला?, 'ती' 'त्या' दिवसातंही कामावर जाते. ते पैसे का नाही अपवित्र वाट तुम्हाला? 

अरे कशाकशावर दुग्धाभिषेक कराल?  तुम्ही स्वत: 'त्या' रक्तावर नऊ महिने 'ती'च्या पोटात राहिलात. तसं तर मग तुम्हालाही अपवित्र म्हणायचे का?

देवासारखा देव एका महिलेच्या हात लावल्याने अपवित्र होतो ? कमाल आहे. आणि तो कोपलाच तर 'ती'च्यावर कोपेल ना...'ती' बघून घेईल..'ती'चा देवही बघेल..तुम्ही कोण? की देवाने तुम्हाला दर्शन देवून ही जबाबदारी दिलीय ? 

बर मला सांगा. तुमच्या देवाला जी फुलं वाहिली जातात ती पुरुषच झाडावरुन तोडतात का?  देवाला लागणारा हार कोण विणतं?, फक्त पुरुषच का?, देवासमोर सुगंधी अगरबत्ती लावता तीही फक्त पुरुषच बनवतात का?, पुरुषच विकतात का?, मग तुमच्या देवासाठी लागणारं साहित्य फक्त आणि फक्त पुरुषच तयार करतात?

अरे कोणत्या परंपरांची भिती दाखवता आम्हाला. इतिहास साक्षी आहे, महिलांवर अन्याय करणाऱ्या परंपरा वेळोवेळी बंद झाल्या आहेत. आता ही बुरसटलेली परंपराही बंद करायची वेळ आलीय, आणि कुणाला काळजी आहे याची?, तिकडे शेतकरी दुष्काळापुढे हरतोय. त्याच्या घरातल्या चिमुकलीपासून ते म्हाताऱ्या आजीपर्यंत सगळेच शेतात राबतायत, त्यांना कष्ट करुन दोन वेळच्या अन्नाची चिंता आहे, त्याला तुम्ही सांगणार का बाईला शेतात जावू देवू नको..बघा सांगून.

आणि इथे शहरात बायकांना पहाटे उठून घरासाठी स्वयंपाक करुन, बाळाची तयारी करुन ऑफिसला जाण्यासाठी वेळेवर ट्रेन पकडायची आहे. 'ती'च्या घरात नवरा बायको दोघांनी कमवलं नाही तर जगायचं कसं?, मुलांना शिकवायचं कसं?, आई वडिलांचा दवाखाना कसा करायचा? याची पडलीय, त्यांना ही तुम्ही सांगून बघा, अहो बाई पाळी सुरु असताना तुम्ही कुठेही जावू नका, सगळं अपवित्र होतं..बघा तर सांगून..

ग्रामीण असो वा शहरी ज्यांना दोन वेळचं कमवून खायचं आहे ना, त्यांना नाही सुचत हे असलं काही दुग्धाभिषेक वैगरे, हे चोचले ज्यांची दुकानं बंद होतील ना, त्यांना सुचत असावं.

अहो इथे सामान्यांना जगणं कठीण आहे. जिथे गावागावात बायका छोट्या मोठ्या कामाला जावू लागल्या आहेत. मजूरीलाही जातायत. मुलींना शिकवतायत. चांगलं शिक्षण देतायत. हुंडा नाकारतायत. 

तिथे तुमचे हे बुरसटलेले विचार कधीपर्यंत चालणार ?, चालू देत परंपरेच्या नावाखाली जितके वर्ष चालवता येईल, आम्ही पण पाहू तुमच्या मुली, तुमच्या नाती, त्यांची ही नवीन पिढी कुठवर चालू देईल हे सगळं?, मला विश्वास आहे, कधीतरी पावित्र्याचा सूर्य उगवेलंच तुमच्या शनिशिंगणापूरात.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.