विशेष संपादकीय : नाथा ‘बजरंगी’ला करमाफी नको आता!

Updated: Jul 21, 2015, 09:49 PM IST
विशेष संपादकीय : नाथा ‘बजरंगी’ला करमाफी नको आता! title=

 

महसूलमंत्री श्री. नाथाभाऊ खडसे यांस...

सलमान खानच्या ‘बजरंगी भाईजान’ या तद्द्न करमणूक करणाऱ्या चित्रपटाची टीम तुम्हाला भेटली, आणि त्यांनी या चित्रपटाचा करमणूक कर महाराष्ट्रात माफ करावा अशी विनंती तुम्हाला केली, हे आम्ही ऐकलं आहे. राज्य दुबार पेरणीच्या उंबरठ्यावर असताना आणि पावसाळी अधिवेशनात मग्न असतानाही, वेळात वेळ काढून कबीर खान आणि अलवीराला अपॉईंटमेंट मिळते, हे ऐकून आश्चर्यही वाटलं.

नाथाभाऊ, या भेटीची ‘शायनिंग’ कारणं महाराष्ट्रालाही कळू द्यात. केवळ तीन दिवसांत १०० कोटींचा विक्रमी गल्ला कमावणाऱ्या चित्रपटाला करमणूक कर माफ असण्याची गरजच काय? प्राईम टाईमसाठी झगडणाऱ्या नवोदित मराठी निर्मात्या-दिग्दर्शकांना अशी तुमची व्यस्त वेळ मिळू शकली असती का हो? ‘ख्वाडा’, ‘किल्ला’, ‘कोर्ट’ यासारख्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्या दिग्दर्शक, अभिनेत्यांना भेटावं, असं आपणास कधी का बरं वाटलं नाही हो खडसेसाहेब? या नवोदितांना चित्रपटगृह सोडाच, पण सिनेमा प्रदर्शित करण्यासाठी निर्मातेही मिळत नाहीयेत...  हे वास्तव तुम्हाला माहीत आहे का?

याउपरही उत्तर प्रदेश सरकारप्रमाणे दयाशील अंतःकरणानं ‘बजरंगी भाईजान’ला करमणूक कर माफ झालाच, तर आश्चर्य कमी आणि दुर्दैव नक्की वाटेल! कर्जमुक्ती नाकारणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या तिजोरीत हा खड्डा नक्कीच नको... आणि आपणाकडे या राज्याचे कृषि मंत्रालयही आहे, हे विसरु नकाच! या करमाफीतून किती शेतकऱ्यांची कर्ज माफ करता येतील, याचा हिशेब कोण ठेवणार?

डॉ. उदय निरगुडकर, 

मुख्य संपादक, झी २४ तास

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.