बामनाच्या पोराने आवाज उठवणं शिकवलं...

( जयवंत पाटील, झी २४ तास ) शेतकऱ्याचं दु:ख कोण विचारत घेतं?, ज्या बापाने आपल्याला घडवलंय, तो मुलगाही नोकरी आणि बायको आल्यानंतर शेतकरी बापाला विसरतो. नेत्यांचं सोडाचं ते तर उपरेच. 

Updated: Dec 13, 2015, 05:18 PM IST
बामनाच्या पोराने आवाज उठवणं शिकवलं... title=

मुंबई : ( जयवंत पाटील, झी २४ तास ) शेतकऱ्याचं दु:ख कोण विचारत घेतं?, ज्या बापाने आपल्याला घडवलंय, तो मुलगाही नोकरी आणि बायको आल्यानंतर शेतकरी बापाला विसरतो. नेत्यांचं सोडाचं ते तर उपरेच. 

ज्यांच्या चड्डीला ठिगळं लावायला कापडं नव्हती, जे बापाच्या कष्टाच्या पैशाने शिकले, पुढे मोठे झाले, मोठे झाले म्हणजे त्यांचं शेवटचं टार्गेट नोकरी लागली. (नोकरीवर सुंदर बायको मिळाली (जिंकली), म्हणजे ते मोठे झाले.)

हे स्वयंघोषित मोठे झालेलेही, गावाकडचा माणूस दिसला, किंवा त्याने छोटी चूक केली, तरी त्याला 'गावंढळ' म्हणतात, मात्र शरद जोशी हे परदेशातील बड्या पगाराची नोकरी सोडून, कोरडवाहू शेती घेऊन शेतकरी झाले. या मातीत दमले, रमले आंदोलनं करत, गावागावात फुफाट्यात फिरले.

शरद जोशी यांना शेतकऱ्यांचं दु:ख कळलं, बामनाच्या मुलाला काय कळतं, म्हणून असंख्य वेळेस त्यांनी टीका झेलली, टीका सोसणे तसं शरद जोशी यांच्या सारख्या शेतकऱ्यांचं दु:ख समजून घेणाऱ्या कोमल हृदयाच्या माणसासाठी तसं सोपं नसेलही.

शरद जोशी यांना वर वरचा शेतकरी माहित होता, असंही म्हणता येणार नाही. शरद जोशी यांना ४० एकर कोरडवाहू शेती करणारा शेतकरी देखील कसा संकटात आहे, हे माहित होतं, मोठा शेतकरी, लहान शेतकरी असे खोटे भेद त्याच्या मनात कधीच नव्हते.

बामनाच्या पोरामागे दहा शेतकरीही येणार नाहीत, असं त्यावेळेचे चुकून राजकारणात आलेले पुढारी म्हणायचे. पण याच शरद जोशींनी, शेतकरी संघटीत होणे शक्य नाही, एक होणे शक्य नाही, हे देखील खोटं ठरवलं. 

आज शेतकऱ्याच्या मुलामागे देखील दहा शेतकरी येणं तसं सोपं नाहीय. तेव्हा शरद जोशींनी शेतकरी जमवला, त्यांना अन्यायाची जाणीव करून दिली, शेतीसाठी आंदोलनाची संस्कृती महाराष्ट्रात रूजवली.

शेतीसाठी आंदोलनाची संस्कृती एवढ्या खोलपर्यंत रूजली आहे, हे पाहायचं असेल, तर आजही ८० वर्षाच्या त्यावेळच्या शेतकरी संघटनेच्या नेत्यांना भेटा, आजही शेतकरी संघटनेचा बिल्ला छातीवर आहेच, हंगामी पुढाऱ्यांसारखं निवडणुका आल्यावर, ते बिल्ला लावत नाहीत, निवडणुका असोत किंवा नसोत बिल्ला त्यांच्या छातीवरच असतो.

बिल्ला बारमाही छातीवर ठेवणारा शेतकरी संघटनेचा जुना कार्यकर्ता, आपल्याला स्वातंत्र्य सैनिकांनंतर मोलाचा वाटतो. स्वातंत्र्य सैनिकही शेवटपर्यंत बिल्ला छातीवर लावतात. तसे शरद जोशी यांचे सैनिकही शेवटपर्यंत बिल्ला छातीवरच ठेवतात.

या कार्यकर्त्यांमध्ये ८० वर्ष वयानंतरही आंदोलनाची उर्मी आणि धग आणि विचार करण्याची ताकदही तिच आहे. ५० मैल दूर आंदोलन असलं आणि यांना पेपरातून नुसतं समजलं, तरी ते आजही जाऊन पोहोचतात. ही शेतकऱ्यांसाठी आंदोलनाची संस्कृती शरद जोशी यांनी रूजवली.

लोकशाहीत चांगल्या गोष्टींसाठी योग्य पद्धतीने आंदोलनं झालीचं पाहिजे. आंदोलन ही लोकशाही वाढीसाठी, जिवंत ठेवण्यासाठी महत्वाची ठरतात असं म्हटलं जातं.

ज्या शेतकऱ्याला काम करूनही न्याय नाही, आपल्याला न्याय नाही, हे देखील ज्याला माहित नाही, गुलामासारख्या राबणाऱ्या शेतकऱ्याला विचाराचं सोनं शरद जोशींनी दिलं.

शेतकऱ्याच्या मुलाची शहरात शिकायला आल्यानंतर काय अवस्था असते, ते त्यांनी शेतकऱ्याच्या मुलाला लिहिलेल्या पत्रातून मांडली आहे. आजही ते पत्र प्रचंड प्रभावी आहे.

शेतकऱ्यांची मुलं आज मोठ्या प्रमाणात प्रत्येक क्षेत्रात प्रावीण्य मिळवत आहेत, पण आजही ते पत्र वाचून प्रत्येक शेतकऱ्यांच्या मुलाच्या डोळ्यातून पाणी येईल, कारण शहरात शिकायला आल्यानंतर, नोकरी मिळेपर्यंत पत्रात लिहिलेलं सर्व काही त्याने सोसलेलं असतं, हे दु:ख आणि ही अवहेलना त्याच्या नशिबात यासाठीच येते, कारण तो शेतकऱ्याच्या घरी जन्माला आलाय म्हणून.

आजही ज्यांचं सर्वकाही शेतीवर अवलंबून आहे, अशा शेतकऱ्यांची मुलं शहरात शिकण्याच्या खर्च पूर्ण करू शकत नाहीत. शेतकऱ्यांच्या मुलांना दहावीपर्यंत हे नक्की कळलेलं असतं की घराचं बजेट कसं चाललंय. म्हणून शहरात शिक्षण घेताना, घरून पैसे आल्यावर तो नेमके खर्च करतो, कारण त्याला माहित असतं, शेतकरी बापाने उधार कुणाकडून घेतले असतील, आणि नाहीच मिळाले तर व्याजाने कसे आपल्यापर्यंत पोहोचले असतील.

शरद जोशी यांनी शेतकऱ्य़ांच्या समस्या मांडण्याचा प्रयत्न केला, शेतकरी कसा समृद्ध होईल हे पाहिलं, शरद जोशी यांच्या पहिल्या फळीचे कार्यकर्ते, शरद जोशींना जीवाला जीव देणारे होते, ते ही असेच शेवटपर्यंत शरद जोशी यांच्यासारखे साधेच राहिले, त्यांनी कधीच जमीनी घेऊन संपत्ती वाढवली नाही, ते रात्रीचे माफिया आणि दिवसाचे पुढारी बनून फिरले नाहीत.

संघटनेपासून एक रूपया आवक नव्हती, आंदोलनांवरून अख्खा गाव वेड्यात काढतं होतं, कधी नागपूर, कधी लासलगाव, कधी चांदवड, आंदोलनचं आंदोलनं करणाऱ्याला बायको-पोरं त्रासली, तरी पदरच्या खर्चाने आंदोलनात उभे राहणारे ते कार्यकर्ते होते, आणि कार्यकर्ते अशाच लोकांना म्हणायलं हवं. 

अखेर शेतकऱ्याची जात-पात, नातं-गोतं नसताना शरद जोशी यांनी शेतकऱ्यांसाठी खूप काही केलं, तसे शेतकरीही त्यांच्या मागे भिंतीसारखे उभे राहिली, म्हणून बामनाच्या पोरामागे कुणी उभं राहणार नाही अशी म्हणणाऱ्यांची तोंडं बंद झाली. अखेर बामनाच्या पोरानं आवाज उठवणं शिकवलं.

शेती आणि शेतकऱ्यांचं जीवन सुखी करण्यासाठीही आजही अनेक चांगल्या लोकांची गरज आहे. जगात काय चाललंय, हे अजून शेतात कष्ट आणि जमिनीसाठी पैसे जमवून थकलेल्या शेतकऱ्याला आजही माहित नसतं, म्हणून शेतकऱ्यांसाठी जे शक्य होईल, ते काम करण्याची पुढे येण्याची गरज आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.