Film Review : 'बजरंगी भाईजान' पाहण्याचं नेमकं कारण

( जयवंत पाटील, झी २४ तास ) सलमान-करिना आहे पण रोमान्स नाहीय, मात्र....., सलमानच्या या सिनेमात शिट्या नाहीत, तर टाळ्या....., बोलता न येणारी सहा वर्षाची मुलगी पाकिस्तानात कशी परतणार.... नवाझु्द्दीन सिद्दीकीच्या अभिनयाची नजाकत....'भाईजान इंटरनेट में बहुत बडी ताकत है'.... 'दुनिया में नफरत बडी जल्दी से बिकती है'....

Updated: Jul 18, 2015, 05:03 PM IST
Film Review : 'बजरंगी भाईजान' पाहण्याचं नेमकं कारण title=

मुंबई : ( जयवंत पाटील, झी २४ तास ) 'बजरंगी भाईजान' सिनेमाचा प्रोमो पाहिला, तर सुरूवातीला हा काहीतरी धार्मिक चित्रपट असेल, यात सलमानचा कायमचा डान्सचा तडका आणि थोडं फार बदलेलं संगीत, आणि एखादं अॅटम साँग, असा समज होतो. मात्र सलमानची एक अनोखी भूमिका आणि चित्रपटाच्या कथानकाचा विचार करून हा चित्रपट पाहायला जा.

सलमान-करिना आहे पण रोमान्स नाहीय, मात्र.....
या सिनेमात सलमान खान आहे, करिना कपूर आहे, पण रोमान्स नाहीय, मात्र एका सहा वर्षाच्या लहानगीसाठी भरभरून प्रेम आहे. लहानगीला तिच्या घरी पोहोचवण्याची ओढ सिनेमातल्या हिरोला आहे, आणि हे कथानक अतिशय व्यवस्थित मांडल्यानं, या सिनेमाला सलमान-करिनाच्या रोमान्सची गरजच पडलेली नाही. म्हणूनच करिना कपूर शिवाय आणखी कोणती अभिनेत्री सिनेमात असती तर चाललं असतं का?, असाही प्रश्न पडतो.

सलमानच्या या सिनेमात शिट्या नाहीत, तर टाळ्या
सलमानच्या सिनेमात एखाद्या दृश्याला शिट्या मारल्या जातात, हे कुणीही सांगेल, पण सलमानच्या चित्रपटात एखाद्या दृश्याला प्रेक्षक टाळ्या देत असतील, तर ते पाहण्यासाठी तुम्हाला बजरंगी भाईजान पाहावा लागेल.

बोलता न येणारी सहा वर्षाची मुलगी पाकिस्तानात कशी परतणार
एका सहा वर्षाच्या मुलीला बोलता यावं, म्हणून एका धार्मिक स्थळी भारतात आल्यानंतर समझौता एक्स्प्रेसने पाकिस्तानात परतत असतांना ही मुलगी हरवते, अर्थात तिला बोलता येत नसल्याने, मुळात ती कुठली आहे?, हे ओळखणं एक आव्हान असंत, मात्र ती पाकिस्तानची आहे, हे कसं ओळखलं जातं?, आणि 'बजरंगी भाईजान'ला तिला थेट पाकिस्तानात घरी पोहोचवण्याची वेळ का येते?, आणि हे काम पूर्ण होतं का?, यात त्याला किती शत्रू आणि मित्र भेटतात हे दिग्दर्शकाने व्यवस्थित मांडलंय.

सरकार, अधिकारी आणि मीडिया
मानवता एवढी महान गोष्ट आहे, आणि ती दोन देशांच्या सीमेच्या मधोमध आहे. मानवतेची एक वेगळी जागा आहे, असं या सिनेमात दाखवण्यात आलंय, भारतीय पाकिस्तीनींबद्दल आणि पाकिस्तानी भारतीयांबद्दल काय विचार करतात, अधिकारी आणि सरकार याकडे कसं पाहातात, हे सर्व विचार करायला लावतं.

पाकिस्तानात या मुलीचं घर बजरंगी कसं शोधणार?, हा प्रश्न कायम असतांना, या थरारक प्रवासात, बजरंगीला कशी विनोदी आणि गंभीर पात्र भेटतात, ही दृश्य सिनेमाला आणखी रंजक बनवतात.

नवाझु्द्दीन सिद्दीकीच्या अभिनयाची नजाकत
काही दिवासांपूर्वी यू-ट्यूबवर पाकिस्तानचा न्यूज रिपोर्टर, 'चाँद नवाब'चा विनोदी व्हिडीओ तुम्ही पाहिला असेल, यात रेल्वे स्टेशनवर चाँद नवाब सोबत एक विनोद होतो, त्यापासून प्रेरणा घेऊन, सिनेमात 'चाँद नवाब'ची भूमिका साकारून नवाझुद्दीन सिद्दीकीने, सिनेमाला 'चार चाँद' लावायला भाग पाडले आहे. 

'बॅड न्यूज सेन्सवाल्यां'नी नक्की पाहा
चाँद नवाब हा एक मुक्त पत्रकार आहे, एक भारतीय पाकिस्तानी मुलीला सोडायला पाकिस्तानात आला आहे, ही एक मोठी बातमी आहे, ती कोणत्या तरी न्यूज चॅनेलला लागावी, यासाठी तो धडपडतोय, मात्र चाँद नवाबचा न्यूज सेन्स, एसी ऑफिसमध्ये नको तो ईगो घेऊन डेस्कवर बसलेली मंडळी, समजून घ्यायला तयार नाही. अखेर बातमी नेहमीप्रमाणे इंटरनेटवर व्हायरल झाल्यानंतर, ती प्रिन्टला आणि प्रिन्ट नंतर टीव्ही मीडियाला घेणे भाग पडते.

'भाईजान इंटरनेट में बहुत बडी ताकत है'
'भाईजान इंटरनेट में बहुत बडी ताकत है', असं म्हणून अखेर चाँद नवाबने न्यू मीडियाची म्हणजेच इंटरनेटची मदत घेतलीय, त्याने आपली बातमी कशी जगात सर्वांपर्यंत पोहोचवली हे देखिल पाहण्यासारखं आहे. 

'दुनिया में नफरत बडी जल्दी से बिकती है'
बजरंगी भाईजान हा भारताचा 'जासूस' नाहीय, म्हणून ती बातमी घेण्यात कोणत्याही न्यूज चॅनेलला रस नाही, तेव्हा नवाझुद्दीन सिद्दीकी यावर म्हणतोय, 'मेरे भाई, दुनिया में नफरत बडी जल्दी से बिकती है, मगर मोहब्बत बेचना बडा मुश्कील है', यासारखे अनेक डायलॉग आहेत जे प्रेक्षकांच्या टाळ्या मिळवतात.

नवाझुद्दीन सिद्दीकीने सलमानपेक्षा जास्त भाव खाल्लाय का?

शेवटच्या भागात नवाझुद्दीन सिद्दीकीने सलमानपेक्षा जास्त भाव खाल्लाय का? आणि एकंदरीत दिग्दर्शकाने धार्मिक गोष्टी, दोन देशांच्या सीमा, सीमेपलीकडील माणसं ही तेढ निर्माण करण्यासाठी नाहीत, संस्कृती वेगवेगळी असली तरी, ती द्वेष करण्यासाठी नाही, हे पडद्यावर मांडण्यासाठी आपलं कसब वापरलं आहे, चित्रपटात आणखी अनेक गोष्टी आहेत, ते पाहण्यासाठी हा चित्रपट पाहा.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.