मिसळ, महाराष्ट्राला पडलेलं एक चवदार स्वप्न !

पुण्यातली जानेवारी महिन्यातली दिवसभर हवीहवीशी वाटणारी थंडी अगदी सौमित्रच्या गारवावाली हवा असावी, निवडक मित्रांबरोबर गप्पा रंगलेल्या असाव्यात.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 4, 2017, 11:59 PM IST
मिसळ, महाराष्ट्राला पडलेलं एक चवदार स्वप्न ! title=

पुणे : (अंबर कर्वे) पुण्यातली जानेवारी महिन्यातली दिवसभर हवीहवीशी वाटणारी थंडी अगदी सौमित्रच्या गारवावाली हवा असावी, निवडक मित्रांबरोबर गप्पा रंगलेल्या असाव्यात.

मंद झुळूके सोबत,त्याक्षणाला केवळ 'दैवी'च म्हणता येईल असा खमंग सुवास सुटावा.क्षणभर डोळे मिटून आपण तो सुवास अनुभवत रहातोय, तोपर्यंत बाळू,पिंट्या,बारक्या असे एरवीच नाव धारण केलेल्या यक्षाने आपल्यासमोर, बादशहासमोर नजराणा पेश करताना आणतात, त्या पद्धतीनी ट्रेमधे ठेवलेला, उसळीवर मुक्तहस्ते घातलेल्या शेवफरसाणीनी भरलेला चिनी मातीचा बाऊल, त्याच्यासोबत डोक्यात जगातले सगळे विचार तात्पुरते संपवायची ताकद असणाऱ्या रस्याचा भला थोरला वाडगा आणि पांढऱ्या शुभ्र पावाची जोडी अवतीर्ण व्हावी.त्यासोबत नवपरिणीत वधूबरोबर पाठराखीणीसारख्या येणाऱ्या खमंग तळलेल्या भजीच्या प्लेट,आणि अधमुर्या ताकाचा शुभ्र चषक पेश करावा. 

आपण जगाचा विचार सोडून काठोकाठ भरलेल्या मिसळ,रस्याच्या बाऊलकडे आणि भजीकडे मन भरून बघत ‘चांगभलं’ म्हणत मिसळीवर ताव मारावा.ताकात चिमटीयेवढीच मिठाची कणी घालत त्याचा पेला रिचवावा. 

'प्लीज रिटायर होऊ नकोस रे' असं विनवणी करायची वेळ आणणाऱ्या गावसकरच्या बॅटींगसारखी हुरहूर लावत तरी समाधानानी मिसळीच्या ह्या कार्यक्रमाची चवदार सांगता व्हावी आणि खादाडीचा कार्यक्रम न राहता तो मिसळीचा एक महोत्सवच होऊन जावा. 

पुण्यातला पहिला मिसळ महोत्सव,तोही आमराईत सादर करणाऱ्या ‘पुणे फूड फेस्ट’चे पुढंच सादरीकरण येतंय ‘मिसळ आणि बरंच काही”.

ह्या महोत्सवात असणारे तर्हेतर्हेची मिसळ.पुण्याची किंचित गोडसर,नाशिकची चटकदार,कोल्हापुरची झटका देणारी मिसळ,श्रीरामपूरची ‘नगरी’पद्धतीची  चवदार तर्रीवाली मिसळ,फक्त पुण्यातच नाही तर पहिल्यांदाच नागपूरी स्पेशल ‘सावजी रस्यातली मिसळ’.

या शिवाय उपासाची मिसळ, दही मिसळ, ट्रेंडी चीज मिसळ असणार आहेत. जोडीला खास आकर्षण म्हणजे बेळगावच्या बाहेर पहिल्यांदाच आलेपाक पोहे आणि खास बेळगावच्या ऊसाचा रस.

मिसळ फेस्टीवल पुण्यात - 6,7,8 जानेवारी 2017 रोजी, सातव हॉल, सहकार नगर येथे आयोजित करण्यात आला आहे.