शिवसेनेसाठी कठीण परीक्षेची घडी

शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी भाजपाबरोबरची युती तोडण्याची घोषणा केल्याने मुंबईत आता प्रामुख्याने शिवसेना विरुद्ध भाजपा असाच सामना रंगलेला पहायला मिळणार आहे. 2015 ला झालेल्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत जे झाले त्याची पुनरावृत्ती आता मुंबई महापालिका निवडणुकीत पहायला मिळेल. मागील 20 वर्ष मुंबईत शिवसेना-भाजपाची एकत्र सत्ता होती. या कालावधीतील मुंबई महापालिकेच्या सर्व निवडणुका हे दोन्ही पक्ष एकत्र लढले. आता एकमेकांपासून फारकत घेतल्यानंतर प्रथमच मुंबईत हे दोन्ही पक्ष एकमेकांसमोर येणार आहेत. यात खरी परीक्षा असणार आहे ती शिवसेनेची. 

Updated: Jan 30, 2017, 01:47 PM IST
शिवसेनेसाठी कठीण परीक्षेची घडी title=

मुंबई, दीपक भातुसे : शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी भाजपाबरोबरची युती तोडण्याची घोषणा केल्याने मुंबईत आता प्रामुख्याने शिवसेना विरुद्ध भाजपा असाच सामना रंगलेला पहायला मिळणार आहे. 2015 ला झालेल्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत जे झाले त्याची पुनरावृत्ती आता मुंबई महापालिका निवडणुकीत पहायला मिळेल. मागील 20 वर्ष मुंबईत शिवसेना-भाजपाची एकत्र सत्ता होती. या कालावधीतील मुंबई महापालिकेच्या सर्व निवडणुका हे दोन्ही पक्ष एकत्र लढले. आता एकमेकांपासून फारकत घेतल्यानंतर प्रथमच मुंबईत हे दोन्ही पक्ष एकमेकांसमोर येणार आहेत. यात खरी परीक्षा असणार आहे ती शिवसेनेची. 

मुंबईत मराठी अस्मितेचा मुद्दा घेऊन शिवसेना राजकारण करत आली आहे. निवडणुकीत अस्मितेचा मुद्दा समोर आणायचा आणि लोकांच्या भावनेला हात घालून मतं मिळवायची हे आतापर्यंत घडत आलं आहे. यापुढे फक्त मराठी अस्मितेचा हा मुद्दा शिवसेनेसाठी तारणहार ठरणार नाही. त्याचे कारण म्हणजे मुंबईतील मराठी टक्का आता मुळात कमी होऊ लागला आहे. 

मुंबईत साधारणतः 30 टक्के मराठींची संख्या असल्याचा अंदाज आहे ही सगळी 30 टक्के मते कधीच शिवसेनेला मिळत नव्हती आणि यापुढेही मिळणार नाहीत. या 30 टक्क्यांमध्ये मनसे हा शिवसेनेनंतर सगळ्यात मोठा वाटेकरी होता. त्यामुळे 2012 च्या निवडणुकीत मनसेला 28 जागा जिंकता आल्या. शिवसेना-मनसेबरोबर मुंबईतील मराठी मतदार इतर पक्षांबरोबरही काही प्रमाणात आहेच. यात भाजपा आहे, काँग्रेस आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरही आहे. 

मुंबईतील मराठी मतदार शिवसेना व्यतिरिक्त इतर पक्षांनाही मतदान करतातच. त्यामुळे आताच्या निवडणुकीत केवळ मराठी मतांवर मुंबई महापालिका जिंकणे शिवसेनेसाठी अवघड असणार आहे. आतापर्यंत शिवसेना-भाजपा एकत्र निवडणुक लढवत असल्यामुळे अमराठी मतं म्हणजेच उत्तर भारतीय, बिहारी, गुजराती, मारवाडी या समाजाची मतं भाजपाबरोबरी युतीमुळे शिवसेनेला मिळत होती. यावेळी भाजपाची ही मतं शिवसेनेकडे वळणार नाहीत. मुंबईत अनेक मतदारसंघ असे आहेत जिथे परप्रांतीय मतदारांचा प्रभाव आहे. त्यामुळे मराठी मतांबरोबरच अमराठी मतं मिळवण्यासाठी शिवसेनेला कंबर कसावी लागणार आहे. 

दुसरीकडे भाजपाने पारदर्शकतेचा मुद्दा समोर आणून शिवसेनेची कोंडी केली आहे. मुंबई महापालिकेत 20 वर्ष शिवसेनेबरोबर सत्तेत एकत्र असल्यामुळे भाजपाला शिवसनेची सगळी अंडी-पिल्ली माहिती आहेत. युती तुटल्यामुळे आता ही सगळी भ्रष्टाचाराची प्रकरणे भाजपा मोठ्या आवेशाने समोर आणणार आहे. खरे तर युती तुटण्यापूर्वीच भाजपाने मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराचे मुद्दे समोर आणून शिवसेनाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

रस्ते घोटाळा, टॅब घोटाळा, पाणी माफीया, कचरा घोटाळा अशा विविध घोटाळ्यांचे मुद्दे समोर आणून भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आणि भाजपा खासदार किरीट सोमय्या यांनी शिवसेनेविरोधात आधीच प्रचार सुरू केला आहे. आता प्रत्यक्ष निवडणूक प्रचारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उडी घेतील तेव्हा तेही आक्रमकपणे भ्रष्टाचाराचे हे मुद्दे समोर आणून शिवसेनेला नामोहरम करण्याचा प्रयत्न करतील. 

भाजपाच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या या भ्रष्टाचारविरोधी प्रचाराला उत्तर देताना निश्चितच शिवसेनेची दमछाक होणार असून तयांची कसोटीही पणाला लागणार आहे. भाजपाकडून होणाऱ्या प्रत्येक घोटाळ्याचे स्पष्टीकरण शिवसेनेला मतदारांसमोर मांडावे लागणार आहे. शिवसेना राज्य सरकारमधील घोटाळे महापालिका निवडणुकीत समोर आणणार असल्याचे संकेत उद्धव ठाकरेंनी युती तोडण्याची घोषणा करण्यासाठी घेतलेल्या सभेत दिले आहेत. मात्र ते अधिक प्रभावीपणे मांडून भाजपाला अडचणीत आणले तरच शिवसेनेला त्याचा फायदा होणार आहे. 

राज्यात आणि केंद्रात शिवसेनेची सत्ता आहे. ही बाबही शिवसेनेसाठी काहीशी त्रासदायक ठरणार आहे. केंद्रात आणि राज्यात सत्ता असली की मुंबई महापालिकेसाठी आपण मोठा निधी आणणार असा प्रचार भाजपाकडून निवडणुकीत केला जाणार आहे. त्यातच निवडणुकीच्या आधी पंतप्रधानांच्या हस्ते मुंबईत शिवस्मारकाबरोबर मेट्रो रेल्वे आणि काही उड्डाणपुलांचे भूमीपूजन भाजपाने केले आहे. 

या सगळ्या प्रकल्पांची किंमत एक लाख कोटी रुपयांच्या घरात असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला आहे. या प्रकल्पांमुळे मुंबईतील पायाभूत सुविधा वाढणार असल्याचा प्रचार भाजपाकडून केला जाईल. दुसरीकडे कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांनी या शहरासाठी सहा हजार कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा करून मतदारांना आकर्षित केले होते. मुंबईसाठीही निवडणूक प्रचारात मुख्यमंत्री अशा प्रकारची घोषणा करून मतदारांना आकर्षित करू शकतील आणि तो मुद्दाही शिवसेनेसाठी अडचणीचा असणार आहे. त्यामुळे मुंबईतील विकासकामांसाठी ठोस कार्यक्रम घेऊन शिवसेनेला मतदारांसमोर जावं लागणार आहे.

शिवसेनेने आतापर्यंते मुंबईकरांच्या आणि मुंबईच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुढे करून मतदारांच्या भावनेला हात घातला आहे. मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव असल्याचा प्रचार शिवसेनेने केंद्रात आणि राज्यात काँग्रेसची सत्ता असताना केला होता. आता पुन्हा हाच मुद्दा शिवसेना भाजपाविरोधात वापरणार आहे. केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे सरकार सत्तेवर आल्यानंतर मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न झाला आहे. 

मुंबईतील एअर इंडियाचे मुख्यालय दिल्लीत हलवण्यात आले, कोस्ट गार्ड प्रशिक्षण केंद्र पालघर इथ होणार होते ते गुजरातमध्ये हलवण्यात आले, मुंबईतील केंद्र शासनाचे वजन-मापे मुख्यालयही हलवण्यात आले, तर रिझर्व्ह बँक, शेअऱ मार्केट आणि मुंबईतील हिरा बाजारही मुंबईबाहेर हलवण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे. या सगळ्या मुद्यावरून शिवसेना भाजपाला टार्गेट करण्याचा प्रयत्न करणार आहे. 

आतापर्यंत शिवसेनेला प्रभावी विरोधाक मुंबईत नव्हता, आता भाजपाच्या रुपाने त्यांचा मित्रपक्षच प्रभावी विरोधक म्हणून समोर ठाकला आहे. भाजपाची प्रचार यंत्रणा, सोशल मिडियावरील भाजपाचे प्रभुत्व हे शिवसेनेपेक्षा प्रभावशाली आहे. त्यामुळे या आघाड्यांवरही भाजपाचा मुकाबला करण्याचे आव्हान शिवसेनेसमोर असणार आहे.

शिवसेनेने युती तोडताना यापुढे कुणाच्याही पुढे युतीसाठी कटोरा घेऊन जाणार नाही अशी स्वाभिमानाची भाषा केली. मात्र महापालिका आणि जिल्हा परिषदेत युती तोडताना केंद्र सरकार आणि राज्य सरकारमधून बाहेर पडण्याबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही. शिवसेनेच्या मेळाव्यात आपल्या सर्व मंत्र्यांच्या बॅगा भरून तयार असतात कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंनी आदेश दिले तर आम्ही तात्काळ सत्तेतून बाहेर पडू अशी भाषा शिवसेनेच्या मंत्र्यांनी केली. मात्र सध्या तरी शिवसेना सत्तेतून बाहेर पडेल अशी चिन्हं नाहीत. 

राज्यातील सत्तेतून आता बाहेर पडलो आणि महापालिकेतही अपेक्षित कामगिरी झाली नाही तर तेलही गेले आणि तूपही गेले अशी अवस्था होईल अशी भीती शिवसेनेला वाटत असावी. त्यामुळेच भाजपाबरोबर पटत नसताना, मंत्रिमंडळात शिवसेनेच्या मंत्र्यांना मान मिळत नसताना किंवा कोणताही निर्णय घेताना मुख्यमंत्री शिवसनेला विचारात घेत नसतानाही शिवसेना सत्ता सोडत नाही. मुंबई महापालिकेच्या निवडणूक निकालानंतर कदाचित याबाबत फैसला होऊ शकतो. त्यामुळे ही बाबही शिवसेनेसाठी काहीशी अडचणीची ठरू शकते. शिवसेनेला सत्तेचा मोह सुटत नाही असा आरोप त्यांच्यावर केला जाऊ शकतो.

मुंबईत सध्या शिवसेनेचे ७५ तर भाजपाचे ३१ नगरसेवक आहेत. आता एकटे लढताना भाजपाच्या जागा आता आहेत त्यापेक्षा वाढतील अशीच शक्यता आहे. मात्र शिवसेनेला भाजपापेक्षा कमी जागा मिळाल्या तरी तो त्यांच्यासाठी नैतिक पराभव असेल. या सगळ्या आघाड्यांवर शिवसेनेला यंदाच्या महापालिका निवडणुकाला सामोरं जावं लागणार आहे. त्यामुळे ही निवडणूक शिवसनेची परीक्षा पाहणारी ठरणार आहे. त्यामुळेच कदाचित उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना साद घालताना निखाऱ्यार चालायची तयारी आहे ना असा आर्त सवाल केला होता.