कुठे जाणार महाराष्ट्र माझा ?

झी चोवीस तासचे प्रतिनिधी किरण खुटाळे यांचा ब्लॉग

Updated: Oct 14, 2014, 10:18 PM IST
कुठे जाणार महाराष्ट्र माझा ? title=

किरण खुटाळे -  माणूस कसा बदलतो याचं जिवंत, चालतं-बोलतं (ओरडत) उदाहरण म्हणजे सध्याचं राज्यातलं राजकारण. एकमेकांच्या ओंजळीनं पाणी पिणा-यांना आता एकमेकांकडे बघणंही इतकं असह्य होऊ शकतं? हो, हे शक्य आहे. ज्या मुद्दयांवर लोकसभा निवडणुका लढल्या गेल्या त्याच किंवा त्याच्याच जवळपास जाणा-या मुद्दयांवर विधानसभा निवडणुका लढल्या जातील आणि ढोबळ मानाने शिवसेना, भाजप विरुद्ध काँग्रेस, राष्ट्रवादी असा सामना रंगेल. त्यात आमचं आवाज करणारं इंजिनही धडधडेल. अशी साधी सोपी सरळ अपेक्षा होती. पण चित्रच काय अख्खा कॅनवॉसचं बदललाय.

शिवसेना, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा सामना रंगताना दिसतोय... काय घडलं असं कि ज्या नेत्याला पंतप्रधानपदावर बसवण्यासाठी ‘आम्ही’ जीवाचं रान केलं, ज्या नेत्याचं गुणगान करता करता आम्ही थकायचो नाही आज त्याच नेत्याला आम्ही अफझल खान म्हणावं?  मी पहिला ज्यानं मोदींना देशाचा पंतप्रधान व्हाव असं जाहीरपणे सांगितलं... असं म्हणणारे राज ठाकरे आज मोदींवर आग पाखड करताना दिसतायत... 
महाराष्ट्राचा दबदबा निर्माण करायचा असेल, राज्यात विकासाचा नळ सुरू करायचा असेल तर एकहाती सत्ता द्या अशा विनवण्या वजा धमक्या मोदीजी देतायत... म्हणजे एकहाती सत्ता दिली नाही तर महाराष्ट्राचा विकास होऊच देणार नाही... असा छुपा संदेशही त्यातून मिळतोय.

जनतेमध्ये मोदींची क्रेझ आहेच, प्रश्नच नाही. ‘मुख्यमंत्र्यांना सही करता येते’ - (अजित पवार) इथपासून ते ‘अशी भाषा वापरणा-यांबरोबर मी कसं काम केलं असेल?’ – (पृथ्वीराज चव्हाण) अशा पातळीपर्यंतच्या टीका झाल्या.. युती(महा) आणि आघाडी आपापल्या जागी राहिली असती तर समीकरण वेगळ असतं. पण आता परिस्थिती फारच वेगळी आहे. परिस्थिती नक्की काय आहे याचं विश्लेषण भल्या-भल्यांना जमत नाहीए.. एक्झिट पोलही आले पण पुढचा अकं कसा असेल हे अजून पडदा उघडल्या शिवाय समजणार नाही.

 आवाज कुणाचा म्हणा-यांपासून आवाज बसलेल्या (मोदींच्या) राज्यभरात तुफान सभा झाल्या, प्रत्येक जण माझ्या सभेला किती गर्दी मोजून सांगतोय.. गर्दी तर दिसली पण मतदान झालेलं दिसेल? दिसलच पाहिजे, या निवडणकीत एका मतदाराकडे जितके पर्याय आहेत तितके यापूर्वी कदाचित कधीच नव्हते. पण प्रॉबलेम तेव्हाच होतो जेव्हा समोर (जास्त) पर्याय असतात.

देशाच्या राजकारणाचा कायापालट करत एकहाती सत्ता दिली पण महाराष्ट्रातही तसच घडेल? 

- मोदींचा चेहरा पुढे करुन लोकसभा जिंकली पण मोदींनाच पुढे करून विधानसभा जिंकता येईल? आणि समजा जिंकलीच तर काय मोदी मुख्यमंत्री होणार का? 
- बाळासाहेबांनंतर तो दम दिसणार नाही असं म्हणणा-यांना पुन्हा एकदा विचार करायला वाव आहे. पण एकहाती सत्ता येणं तितकसं शक्य नाही. 
- मिस्टर क्लीन म्हणून पृथ्वीराज चव्हाणांना समोर केलय. पण त्यामुळे काँग्रेसवरचे भ्रष्टाचाराचे डाग पुसले जाणार नाहीत हेही खरं.
- सक्रीय राजकारणात राहणार नाही अशी घोषणा केलेल्या पवारांच्या जागी अजितदादांची वर्णी लागेल? (इथही अनेक आरोप आहेतच)
- पॉप्युलॅरटीमध्ये आपला हात कुणीच धरू शकत नाही पण कोणालाही विचारा इंजिन डबल डिजिट गाठेल याचीही शंकाच आहे.

मग काय करायचं? आजचीच रात्र.. ठरवून टाका आणि उद्या आपल्या महाराष्ट्राला कुठे घेऊन जायचय याचा नुसता विचार करत बसू नका कृतीही (किमान मतदान) करा... 
19 ऑक्टोबरला कळेच कुठे जाणार महाराष्ट्र माझा…

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.