युती, आघाडी का तुटली ?

Updated: Sep 30, 2014, 08:18 PM IST
युती, आघाडी का तुटली ? title=

झी चोवीस तासचे प्रतिनिधी धनंजय शेळके यांचा ब्लॉग

युतीच्या 25 वर्षाच्या आणि आघाडीच्या 15 वर्षांच्या संसाराचा घटस्थापनेच्या दिवशीच घटस्फोट झाला. भाजपला शिवसेनेसोबतच्या युतीमध्ये स्वारस्य नव्हते. तर आघाडीत असं न् तसं सत्ता जाण्याचीच चिन्हं आहेत. मग महायुतीतल्या मतविभागणीचा फायदा आणि तळागाळात असलेलं संघटन याचा तरी काही फायदा होईल असं दोन्ही पक्षांना वाटतंय. त्यामुळचं आघाडीतले दोन्ही पक्ष असा जुगार खेळलेत.

मोदींच्या लाटेमुळे राज्यातल्या भाजपच्या नेत्यांमध्ये नको तेवढा आत्मविश्वास आला होता. त्यातच त्यांनी काही कंपन्यांकडून राज्यभर सर्व्हे केला होता. त्यातही महाराष्ट्रात भाजपची हवा असल्याचं सांगितलं गेलं. त्यामुळे तर भाजपच्या नेत्यांना अधिकचाच चेव आला.

केंद्रात मोदी लाट, जनमत चाचण्यांचा अहवाल आणि राज्यात आघाडीविरोधी वातावरण यामुळे आघाडीतल्या अनेक धुर्त नेत्यांनी भाजपचा तंबू धरला तर काही ठिकाणी भाजपनं काही वजनदार नेत्यांना आपल्या गळाला लावले. ( उदा. सांगलीतील अजित घोरपडे, विलासराव जगताप, पृथ्वीराज देशमुख, कराडचे अतुल भोसले, कोल्हापूरमधील अमल महाडिक, नंदुरबारचे विजयकुमार गावित, पनवेलचे प्रशांत ठाकूर इत्यादी) प्रवेश दिलेल्या या जागा बहुतेक शिवसेना लढवत असलेल्या होत्या. मात्र तरीही त्यांना भाजपने पक्षात सामावून घेतले. शिवसेनेवर दबाव आणून वाढीव आणि आपल्याला हव्या त्या जागा पदरात पाडून घेऊ असा भाजपच्या नेत्यांचा प्रयत्न होता. मात्र उद्धव ठाकरेंनी त्याला दाद दिली नाही.

गेल्या तीन चार दिवसांपासूनच भाजपने शिवसेनेशिवाय निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी केली होती. असं म्हणण्याचं कारण म्हणजे एकीकडे जागावाटपावर दोन्ही पक्षात प्रचंड तणाव सुरू असताना भाजपने औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूरचे अपक्ष आमदार प्रशांत बंब यांना भाजपात घेतलं.

तिथून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे इच्छुक होते. या जागेवरुनही जोरदार वाद होऊ शकतो हे माहित असूनही भाजपने बंब यांना पक्षात घेतले. दुसरीकडे पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनही पक्षात घेतले. गेल्यावेळी युतीमध्ये इथली जागा शेकापकडे होती.

इथे भाजपचे नामोनिशान नाही त्यामुळे यावेळी ही जागा शिवसेनेला मिळावी अशी शिवसैनिकांची रास्त मागणी होती. तर तिकडे नाशिक जिल्ह्यातील सिन्नरचे अपक्ष आमदार माणिकराव कोकाटे यांनाही भाजपपात प्रवेश देण्याची तयारी सुरू होती.

तिथेही शिवसेनेकडे तगडा उमेदवार होता. तर पुण्यातल्या चिंचवडमध्ये मावळचे खासदार आणि शिवसेना नेते श्रीरंग बारणे यांचे कट्टर विरोधक लक्ष्मण जगताप यांना युतीमध्ये काडीमोड झाल्यानंतर काही वेळातच पक्षात घेतले. यावरुन भाजपला शिवसेनेसोबत संसार करण्यात स्वारस्य नव्हतं असं म्हणालयला जागा आहे.

महायुतीतल्या चार पैकी तीन घटक पक्षांना गोपीनाथ मुंडे यांनी महायुतीमध्ये आणलं होतं. त्याचबरोबर केंद्रातल्या सत्तेची गाजरं दाखवत त्यांना आपल्या जाळ्यात ओढलं आहे. त्यामुळे ते तीनही पक्ष ते भाजपसोबत गेले. राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांच्या मागे धनगर समाज आहे.

काही मतदारसंघात धनगर समाजाची मते निर्णायक ठरु शकतात. तसंच पश्चिम महाराष्ट्रात आघाडीचे गळाला लागलले नेते आणि राजू शेट्टी यांच्या जोरावर तिथलं मैदान मारु असा त्यांना विश्वास आहे.

विदर्भात शिवसेनेची फारशी ताकद नाही नाही तिथे मोठ्या प्रमाणात जागा जिंकू आणि मुंबईत गुजराती, उत्तर भारतीय मतांच्या जोरावर काही जागा जिंकू असं गणित भाजपनं मांडलेलं दिसतंय.

उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे आणि नंदूरबार जिल्हयात चांगलं यश येईल असं त्यांना वाटतंय. तर बीडमध्ये मुंडेंच्या निधनाने सहानुभुती भाजपला मिळेल असं गणित भाजप नेत्यांनी मांडलं आहे.

नाशिक आणि मराठवाड्यातील इतर जिल्ह्यात मिळतील त्या जागा बोनस असतील असंही त्यांना वाटतंय. त्यामुळे शिवसेनेचं लोढणं गळ्यात वागवण्यापेक्षा स्वतंत्रपणे मैदानात उतरून राज्यात शतप्रतिशत भाजप करु असा त्यांचा होरा आहे. 

राज्यातल्या नेत्यांसोबत केंद्रातल्या नेत्यांचाही युती तोडण्यामध्ये महत्वपूर्ण वाटा असण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश आणि गुजरात या राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही पक्ष वाढला पाहिजे अशी केंद्रातल्या नेत्यांची अर्थात नरेंद्र मोदी आणि अमित शहा या मंडळीचा प्रयत्न आहे. त्यातच एकत्र लढून सत्ता आली तरी भाजपच्या अजेंड्यावर असलेले निर्णय घेतना शिवसेना अडसर ठरु शकते.

उदा. जैतापूरच्य अणऊर्जा प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध आहे. वेगळ्या विदर्भाला शिवसेनेचा तीव्र विरोध आहे. त्यामुळे वेगवेगळे लढून स्वबळावर शंभरी गाठायची आणि मनसे आणि अपक्षांच्या मदतीने सरकार बनवायचं असंही त्यांचे गणित असू शकते. त्यामुळे त्यांनी शिवसेनेशी काडीमोड घेतला आहे. मात्र भाजप जागांचे शतक मारते की अर्धशतक करतानाच दमछाक होते हे येत्या 19 तारखेला कळेलच....

आता आघाडी तुटण्याची कारणं

महायुतीमध्ये भाजप शिवसेनेचा काडीमोड झाल्यामुळे आघाडी असलेले अनेक इच्छुक भाजप किंवा शिवसेनेकडे जातील आणि त्यांच्यातच खरी लढत होईल अशी भीती आघाडीतल्या दोन्ही पक्षांना होती. त्यामुळे दोन्ही पक्ष आपआपल्या फॉर्म्युल्यावर शेवटपर्यंत ठाम राहिले. दुसरीकडे मुंबईत शिवसेना, मनसे आणि भाजप यामुळे मतविभाजनाचा फायदा आपल्याला उचलता येईल असे काँग्रेसचे गणित आहे. तसेच विदर्भात राष्ट्रवादीची फारशी ताकद नाही तिथेही युतीतल्या विभाजनाचा फायदा होईल असं काँग्रेसचे गणित असण्याची शक्यता आहे. तर पश्चिम महाराष्ट्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये मुख्य लढत होण्याची शक्यता आहे. त्याचा फायदा आघाडीतल्या दोन्ही पक्षांना होण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने जोरदार आपटी खाल्ली. ज्या सहा ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला यश आले आहे त्याचं मुख्य कारण म्हणजे स्थानिक नेतृत्व. दोन्ही पक्षांचं स्थानिक नेतृत्व अनेक ठिकाणी मजबुत आहे.

मुंबई, ठाणे नाशिक आणि नागपूर या महापालिका सोडल्या तर गेल्या 15 वर्षात स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये वेगवेगळे लढून आणि शिवसेना भाजप एकत्र लढूनही काँग्रेस आणि राष्ट्रवादीने चांगले यश मिळवले होते. एकत्र लढल्यावर दोन्ही पक्षांचे स्थानिक नेते युतीच्या उमेदवारांना मदत करतात असा दोन्ही पक्षांना अनुभव आहे. असं नं तसं आघाडीच्या विरोधात वातावरण आहे. एकत्र लढल्यासही सत्ता येईलच असंही काही नाही. त्यामुळेच दोन्ही पक्षांनी स्वतंत्र लढण्याचा जुगार खेळलेला दिसतोय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.