रेल्वेचे मोबाईल बुकिंग कसे करावे ?

लोकसभेत रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांनी मंगळवारी रेल्वे अर्थसंकल्प मांडला. यावेळी मोबाईलवरून रेल्वे तिकिटचे बुकिंग करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. याआधी रेल्वेच्या इंटरनेटद्वारे ई-बुकिंगला चांगला प्रतिसाद मिळालाय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 26, 2013, 04:20 PM IST

www.24taas.com,नवी दिल्ली
लोकसभेत रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांनी मंगळवारी रेल्वे अर्थसंकल्प मांडला. यावेळी मोबाईलवरून रेल्वे तिकिटचे बुकिंग करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. याआधी रेल्वेच्या इंटरनेटद्वारे ई-बुकिंगला चांगला प्रतिसाद मिळालाय. रेल्वेचे मोबाईल बुकिंग कसे करावे, याबाबत ही माहिती.
मोबाईल बुकिंगनंतर आता थेट आरक्षण केल्यानंतर आरक्षणाच्या स्थितीबाबतही एसएमएसद्वारे प्रवाशांना माहिती दिली जाणार असल्याचे बन्सल यांनी स्पष्ट केलेय. त्यासाठी इंटरनेट बँकिंग मोबाईल पेमेंट सेवेचा (आयएमपीएस) उपयोग केला जाणार आहे. रेल्वे प्रवाशांना आता मुद्रित तिकिटांऐवजी थेट त्यांच्या मोबाईलवरच एसएमएस येणार आहेत.
मोबाईल बुकिंगच्या नव्या सेवेला ‘एम-तिकीट’ असे नाव देण्यात आलेय. प्रवाशांना त्यांच्या मोबाइलवरूनच रेल्वे प्रवासाचे तिकीट बुक करता येणार आहे. एसएमएसद्वारे पाठविलेले मोबाइलवर डिस्प्ले होणारे तिकीट दाखवून प्रवासही करता येणार आहे. मोबाइलद्वारे तिकीट बुक केलेल्या प्रवाशाला या तिकिटाची प्रिंट काढण्याची गरज नाही.
मोबाईलवर इंटरनेट सुविधा असलेल्या प्रवाशाने रेल्वेच्या www.indianrailways.gov.in या पोर्टलवरून मोबाइल टिकेटिंग अॅप्लिकेशन डाऊनलोड करायचे आहे.

रेल्वेच्या पोर्टलवर सुरुवातीला प्रवाशाला आपली नोंदणी करावी लागेल. अनिवार्य तपशिलाचे रकाने भरल्यानंतर प्रवाशाला युजर आयडी दिला मिळेल. त्यानंतर इच्छित प्रवासाच्या तपशिलाचा एसएमएस पाठवायचा आहे. तिकिटाची रक्कम अदा करण्याची औपचारिकता पूर्ण केल्यानंतर प्रवाशाला मोबाइल रिझर्व्हेशन मेसेज (एमआरएम) प्राप्त होईल.
या मेसेजसाठी लागणारा खर्च रेल्वे उचलणार आहे. मात्र, वातानुकुलीत तिकिटासाठी ५ तर सर्व तिकिटांसाठी १० रूपये जादा भरावे लागतील. तर तिकिट बुक करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या क्रेडिट अथवा डेबिट कार्डची गरज पडणार नाही. शिवाय नेटबँकिगचीही आवश्य कता भासणार नाही.