गायक ते महागायक... एक प्रवास

Last Updated: Sunday, October 30, 2011 - 13:05

[caption id="attachment_4096" align="alignleft" width="250" caption="विश्वजीत बोरवणकर - ‘आयडिया सारेगमप पर्व-१०’चा महागायक"][/caption]

झी २४ तास.कॉमच्या सर्व वाचकांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार...

 

एक गोष्ट मी सुरूवातीलाच स्पष्ट करतोय. अगदी मनापासून सांगतो की मी स्वतःला अजिबात महागायक मानत नाही. कारण, संगीत हे अनंत आहे आणि प्रत्येक गायकाला किंवा संगीतकाराला ते जितकं कळलंय असं वाटतं त्याहून कितीतरी जास्त त्यातलं कळायचं राहिलेलं असतं, उरलेलं असतं. हा माझ्या आयुष्यातला पहिला ब्लॉग आहे, सो.. काही चूक भूल झाल्यास क्षमस्व.

 

संगीत क्षेत्रात पूर्णपणे मी स्वतःला झोकून देण्याचं ठरवलं ते दहा वर्षंपूर्वी. हो, दहा वर्षं... खरंच, हा कालखंड माझ्यासाठी अतिशय अभूतपूर्व असा ठरलाय. काही उत्कट भावपूर्ण  सांगीतिक क्षणही मी या कालावधीत अनुभवलेत आणि कित्येक तास खडतर रियाझात घालवले आहेत.

 

मी जेव्हा हा ब्लॉग लिहायचं ठरवलं तेव्हा मला असं वाटलं की या ब्लॉगच्या माध्यमातून जर साधारण माझ्या वयाच्या किंवा माझ्याहून लहान मित्रांना त्यांचा या क्षेत्रातला एक मित्र म्हणून काही टिप्स देऊ शकलो, तर मला वाटतं की जे काम माझे गुरूजन करत आले आहेत त्यात माझ्यापरीने मी ही हातभार लावला आहे.

 

माझं असं ठाम मत आहे की कुठल्याही व्यक्तीला, जिला गायन क्षेत्रात करियर करायचं असेल, त्यांनी पहिली ५ वर्षं शास्त्रीय संगीताचा अगदी मनापासून रियाझ करावा. अगदी ध्यासच घ्यावा...  ध्यास घ्यावा असं मी मुद्दाम म्हणतोय, कारण कुठलंही संगीत ध्यास घेतल्याशिवाय गळ्यात मुरत नाही. शास्त्रीय संगीताचा भक्कम पाया तयार झाल्यानंतरच तुम्ही ठरवू शकता की आपल्याला कुठल्या दिशेने वाटचाल करायची आहे. म्हणजे, मला प्लेबॅक सिंगरच व्हायचंय, हलकं फुलकं, गझल, रॉक किंवा जॅझच गायचंय असं काहीही आधीच ठरवून ठेऊ नये. असा माझा पर्सनल अनुभव आहे. कारण, मी अगदी खरं सांगतो की ‘सारेगमप’च्या आधी मी कधीही ‘ढगाला लागली कळ....’ किंवा ‘मधुबाला’ ही गाणी गायलो नव्हतो. हे मी सांगतोय ते माझा उदो उदो करण्यासाठी नाही. पण, यातून तुमच्या लक्षात येईल की शास्त्रीय संगीत शिकणं किती महत्त्वाचं आहे आणि ते भविष्याच्या दृष्टीने किती उपयोगी पडतं. शास्त्रीय संगीतामुळे आपला आवाज खूप लवचिक होतो तसंच आवाजाची अ‍ॅडाप्टेशन करण्याची क्षमताही वाढते....

 

अर्थातच, प्रवहाबरोबर जाणं ही काळाची गरज आहे. जगभरातला संगीत ऐकलं गेलंच पाहिजे. त्यात काहीच चुकीचं नाही. ते ही मनापासून ऐका. त्याचा अभ्यास करा. या संगीतातील चांगलं ते घ्या. आपलंसं करा. पण, जे अयोग्य वाटतं त्याकडे दुर्लक्ष करा.

 

आत्ता फार मोजक्याच गोष्टी मी लिहिल्या आहेत. पण, माझ्या महागायकाच्या दिशेने झालेल्य़ा प्रवासात मला या गोष्टींचा खूप फायदा झालाय. आणि तो जसा मला झालाय, तसाच तो तुम्हालाही नक्की होईल याची मला खात्री आहे.

अजूनही बरंच काही लिहायचं आहे, बरंच काही तुमच्याशी शेअर करायचं आहे... पण, ते पुढच्या ब्लॉग मध्ये...

 

First Published: Sunday, October 30, 2011 - 13:05
comments powered by Disqus