मैं तेरा हिरो : डेव्हिडला मिळाला नवा `गोविंदा`

By Shubhangi Palve | Last Updated: Friday, April 4, 2014 - 18:02

सिनेमा : मै तेरा हिरो
निर्माता-दिग्दर्शक : डेव्हिड धवन
कलाकार : वरुण धवन, इलियाना डिक्रूझ, नर्गिस फाखरी, अरुणोद्य सिंह, राजपाल यादव, सौरभ शुक्ला, मनोज पाहवा
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
आपल्या हास्यप्रधान सिनेमांतून प्रेक्षकांचं धम्माल मनोरंजन करणारे निर्माता दिग्दर्शक डेव्हिड धवन यांचा `मैं तेरा हिरो` आजा मोठ्या पडद्यावर दाखल झालाय.
गोविंदाला सोबत घेऊन राजा बाबू, हिरो नंबर वन, जुडवा, पार्टनर यांसारख्या अनेक सिनेमांतून प्रेक्षकांना गुदगुल्या करणाऱ्या डेव्हिड धवन यांनी याहीवेळेस प्रेक्षकांना निराश केलेलं नाही. परंतु, यावेळेस धवन यांनी आपल्या हुकुमाचे एक्के म्हणजेच गोविंदा किंवा सलमान खान यांच्याशिवाय हा सिनेमा प्रेक्षकांसमोर आणलाय. कारण, या सिनेमात धवन यांनी आपला मुलगा वरुण धवन याला प्रेक्षकांसमोर आणलंय.
`मैं तेरा हिरो` हा तेलगू सिनेमा `कांडिरीगा` याचा रिमेक आहे. या सिनेमातही दिसतो तो प्रेमाचा त्रिकोण... हा टिपिकल डेव्हिडि धवन सिनेमा असल्याचं प्रत्येक क्षणी दिसत राहतं.
काय आहे सिनेमाचं कथानक...
सीलू ऊर्फ श्रीनाथ प्रसाद (वरुण धवन) अभ्यासासाठी बंगळुरू जातो. यावेळेस त्याला स्टेशनवर सोडण्यासाठी त्याच्या आई-वडिलांसोबतच अनेक लोक दाखल झालेले असतात. खरं म्हणजे, सीलूला लिहिण्या-वाचण्यात अजिबात रस नाही. सीलूच्या सवयींना कंटाळून त्याच्या वडिलांनी (मनोज पाहवा) त्याला पुढच्या अभ्यासासाठी बंगळुरू पाठविण्याचा निर्णय घेतलाय. कॉलेजमध्ये पोहचल्यानंतर सीलू अभ्यासाच्या जवळजवळही फिरकत नाही आणि कॉलेजमधील सर्वात सुंदर मुलगी सुनयना (इलियाना) हिला आपलं बनविण्याचा निर्धार मात्र तो नक्की करतो.
शहरातील सर्वात रागीट स्वभावाचा पोलीस इन्स्पेक्टर अंगद (अरुणोद्य सिंह) सुनयनावर जीव ओवाळून टाकतो, हे काही सीलू महाशयांना माहीत नाही. कॉलेजमध्ये अंगदला लोक एव्हढं घाबरतात की कुणीही सुनयनाकडे नजर उठवून पाहण्याचीदेखील हिंमत करत नाही. सुनयनाही अंगदला एव्हढं घाबरतेय की काही बोलूच शकत नाही.
अंगदला जेव्हा सीलूबद्दल माहीत पडतं तेव्हा तो आपल्या गुंडांना सीलूची सुपारी देऊन टाकतो. परंतु, प्रत्येक वेळेस हे गुंड सीलूकडून मार खाऊन परत येतात. तेव्हा अंगद स्वत:च सीलूला धडा शिकवण्याचं ठरवतो.
याच दरम्यान, सीलू काही असे फासे फेकतो ज्यामुळे अंगदला पोलीस फोर्समधून निलंबित केलं जातं. सीलू आणि सुनयनाला वेगळं करण्यासाठी मग अंगद अंडरवर्ल्ड डॉन विक्रांतसोबत (अनुपम खेर) जाऊन मिळतो. डॉन विक्रांतची एकुलती एक मुलगी आयशा (नर्गिस फाखरी) सीलूवर एकतर्फी प्रेम करतेय. आयशाला कोणत्याही प्रकारे सूरतमध्ये आपलं प्रेम हस्तगत करायचंय. डॉन विक्रांतचे गुंडे सुनयनाचं किडनॅप करून तिला परदेशात घेऊन जातात. साहजिकच, सीलू आणि अंगदही इथं दाखल होतात.
गोविंदा आणि वरुण
वरुण धवननं यावेळी डेव्हिडचा गोविंदा बनण्याचा प्रयत्न केलाय. डेव्हिड आणि गोविंदाचे सिनेमे वारंवार पाहूनच वरुण कॅमेऱ्यासमोर उभा राहिला होता की काय? असं वारंवार प्रेक्षकांना वाटत राहतं.
वरुणचा डान्स आणि अॅक्शन सीन चांगले झालेत. परंतु, खूपदा वापरल्यामुळे ते बोअरिंग वाटतात. नर्गिस आणि इलियाना यांनी केवळ हिरोसोबत नाचण्याचा आणि आपली सुंदरता कॅमेऱ्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय.
राजपाल यादव, सौरभ शुक्ला, मनोज पाहवा यांनी आपापल्या भूमिका निभावल्यात. तर रागीट इन्स्पेक्टर अंगद उभा करण्यात अरुणोदय चांगलाच यशस्वी झालाय, असं म्हणावं लागेल.
डेव्हिडच्या सिनेमांत लॉजिक नावाचा प्रकार नसतोच... तो या सिनेमात पाहण्यास मिळेल ही अपेक्षाही प्रेक्षकांना नसेल. सिनेमा पहिल्या अर्ध्या भागात मनोरंजक वाटतो परंतु, दुसऱ्या अर्ध्या भागात मनोरंजनाचा तडका थोडा कमी पडतो.
सिनेमाचं संगीत चांगलं जमलंय. `पलट तेरा हिरो इधर है` गाणं तुम्ही ऐकू शकता. यावेळी, नाचण्यात वरुण गोविंदासारखाच दिसतो.
शेवटी काय तर...
तुम्ही हा सिनेमा केवळ मनोरंजन म्हणून एकदा जरुर पाहू शकता. डेव्हिड धवनचे फॅन्स तर हा सिनेमा नक्कीच पाहू शकतात.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटर

First Published: Friday, April 4, 2014 - 18:02
comments powered by Disqus