`टायटानिक` फेम केट विन्स्लेट आणि... भांगडा!

By Shubhangi Palve | Last Updated: Sunday, November 17, 2013 - 10:05

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
हॉलिवूडच्या ‘टायटॅनिक’ सिनेमातील प्रसिद्ध अभिनेत्री केट विन्स्लेट लवकरच चक्क भांगडा करताना दिसणार आहे. या सिनेमाचं नाव आहे ‘गोल्डन स्पॅरो’. हा एक इंडो-वेस्टर्न सिनेमा आहे. या सिनेमात हॉलीवूड कलाकारांसोबत, बॉलवूड कलाकारही दिसणार आहे.
हॉलिवूडच्या सिनेमांत गाणी फारच कमी प्रमाणात पाहायला मिळतात. नृत्य अथवा संगीतावर आधारीत सिनेमा असल्याशिवाय तिथे नृत्याला काही स्थान नाही. त्यामुळे प्रश्न असा की केटला नृत्य करता येतं की नाही? आणि नृत्य जमत जरी असले तरी चक्क भांगडा करायला लावणं... म्हणजे जरा अवघडच काम... केट विन्स्लेटला भांगड्याचं प्रशिक्षण भारतीय कोरिओग्राफर राजीव खिनची देणार आहे. राजीवला मात्र यात विशेष काही वाटत नाही. हिंदी सिनेसृष्टीत नृत्यशैली आणि जॅझ यात राजीव खिनची पारंगत आहे. केटला भांगडा शिकवण्याचे आव्हान राजीवनं स्वीकारलं. गेले काही आठवडे राजीवचा मुक्काम लॉस एंजेलिसमध्ये आहे. राजीव या सिनेमासाठी भरपूर प्रयत्न करत आहे, त्याने सिनेमातील गाण्यांवर काम केलंय.
या सिनेमात केट विन्स्लेट सोबत एक भारतीय अभिनेत्रीही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. मात्र ती अभिनेत्री कोण हे अद्यापही समजलं नाही, तिच्या नावाविषयी निर्म्यात्यांनी मौन बाळगले आहे. पुढच्या वर्षी या सिनेमाच्या शुटींगला सुरूवात होणार आहे. हॉलीवूडमधील अभिनेत्री हिंदी गाण्यावर नृत्य करताना खूप क्वचित दिसतात. याआधी निकोल किडमनने `मुलीन रग` या सिनेमात `चायना गेट` सिनेमातील उर्मिला मातोंडकरच्या `छम्मा छम्मा` गाण्यावर नृत्य केले होते. केट भांगडा करताना कशी दिसणार हे पाहणे मज्जेशीर असणार आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, November 17, 2013 - 10:04
comments powered by Disqus