हिंदी आणि तमिळमध्ये येतोय मराठी `काकस्पर्श`!

महेश मांजरेकरांचं दिग्दर्शन आणि सचिन खेडेकरांचा करारी अभिनय यामुळे ‘काकस्पर्श’ या सिनेमानं प्रेक्षकांसह समीक्षकांचीही दाद मिळवली होती. आता हाच ‘काकस्पर्श’ हिंदीत येतोय.

शुभांगी पालवे | Updated: Jan 15, 2014, 09:49 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
महेश मांजरेकरांचं दिग्दर्शन आणि सचिन खेडेकरांचा करारी अभिनय यामुळे ‘काकस्पर्श’ या सिनेमानं प्रेक्षकांसह समीक्षकांचीही दाद मिळवली होती. आता हाच ‘काकस्पर्श’ हिंदीत येतोय.
महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘काकस्पर्श’ या विलक्षण प्रेम कहाणीला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला होता. बॉक्स ऑफिसवर सिनेमाला मिळालेलं यश पाहून महेश मांजरेकरांनी आता काकस्पर्श हिंदीसह तमिळमध्येही बनविण्याचं ठरवलंय.
सिनेमात सचिन खेडेकरांनी भूमिका गाजवली होती. आता, मात्र सचिन खेडेकरांच्या जागी अरविंद स्वामीला मुख्य भूमिकेसाठी घेण्यात आलंय. तर मेधा मांजरेकरांनी केलेल्या भूमिकेसाठी तिस्का चोप्राला पसंती देण्यात आलीय. या रोलसाठी चित्रांगदा सिंग, श्रृती हसन यांच्या नावाचीही चर्चा होती. केतकी माटेगावरचा रोल मात्र कायम ठेवण्यात आलाय. यानिमित्ताने ‘टाईमपास’ फेम केतकीला आता या सिनेमाद्वारे बॉलीवूडचे दरवाजे खुले होणार आहेत.
प्रिया बापटला मात्र या सिनेमातून वगळण्यात आलंय. प्रियाच्या जागी वैदेही परशुरामी या नवोदित अभिनेत्रीला पसंती देण्यात आलीय. वैदेही महेश मांजरेकरांच्याच कोकणस्थ सिनेमातून याआधी झळकली आहे. या निमित्ताने वैदेही आणि केतकी हे दोन मराठी चेहरे हिंदी आणि तामिळमध्ये झळकणार आहेत.
कथानकात यावेळी दक्षिणेची पार्श्वभूमी घेतली आहे. यातला ब्राह्मण हा तमिळ असणार आहे. सिनेमात तमीळ कथेप्रमाणे काही बदलही करण्यात येणार असल्याचं समजतंय. एकूणच मराठीत प्रेक्षकांची पसंती मिळालेला हा काकस्पर्श आता हिंदीत कसा आकाराला येतो, याचीच उत्सुकता आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.