साठीतली रेखा!

बॉलिवूडच्या सौंदर्यवतींमध्ये एक नाव आपसुकच घ्यावं लागेल ते म्हणजे रेखा... गेल्या चार दशकांपासून रुपेरी पडदा गाजवणारी रेखा सिनेरसिकांसाठी अतिशय जवळची बनली आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Oct 10, 2013, 08:56 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
बॉलिवूडच्या सौंदर्यवतींमध्ये एक नाव आपसुकच घ्यावं लागेल ते म्हणजे रेखा... गेल्या चार दशकांपासून रुपेरी पडदा गाजवणारी रेखा सिनेरसिकांसाठी अतिशय जवळची बनली आहे. सदाबहार असणाऱ्या आणि आपल्या सौंदर्याने भल्याभल्यांना मोहिनी घालणाऱ्या रेखाने आज वयाच्या ६० व्या वर्षात पदार्पण केलंय.
भानू रेखा... अर्थातच रेखा... अवघ्या चार वर्षांची असताना तिने पहिल्यांदा कॅमेरा फेस केला. सुरुवातीच्या काळात तिने काही दाक्षिणात्य सिनेमातून काम केल्यानंतर ‘सावन भादो’ या पहिल्या हिंदी सिनेमात तिला भूमिका मिळाली.

प्रत्येक नवोदीत कलाकाराला एका योग्य संधीची गरज असते... ती संधी अमिताभ बच्चन सोबतच्या ‘दो अनजाने’च्या रुपाने रेखाला मिळाली आणि तिचं आयुष्यचं बदलून गेलं. इथूनच सुरु झाला तो तिचा रुपेरी पडद्यावरचा खरा प्रवास... १९८१मध्ये आलेल्या मुजफ्फर अलीच्या उमरावजानमध्ये रेखाचं एक वेगळचं रुप पहायला मिळालं. तिने रुपेरी पडद्यावर उमराव जान अक्षरश: जिवंत केली. या भूमिकेसाठी रेखाला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. या दरम्यान तिने कहानी किस्मत की, नमक हराम, रामपुर का लक्ष्मण, प्राण जाए पर वचन न जाए या सिनेमांतून अभिनय केला. धर्मेंद्र, जितेंद्र, शशी कपूर, राकेश रोशन, विनोद मेहरा या बॉलिवूडमधल्या अनेक दिग्गजांसह रेखाने सिल्व्हर स्क्रीन शेअर केली. मात्र, खऱ्या अर्थाने रेखाची केमिस्ट्री जुळली ती अमिताभ बच्चनबरोबर...
रेखा-अमिताभ या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळाली आणि त्यानंतर या जोडीने सिलसिला, नटवरलालसारखे अनेक हिट फिल्म्स हिंदी सिनेसृष्टीला दिले. त्याच दरम्यान या दोघांच्या अफेअरचीही खूप चर्चा झाली. मात्र, आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत दोघांनीही मौन बाळगणचं पसंत केलं. गेल्या चार दशकांपासून रुपेरी पडदा गाजवणाऱ्या या रुपगर्वितेने नंतरच्या काळातही कोई मिल गया, परिणिता यांसारख्या सिनेमांमधून आपल्या अभिनयाची एक वेगळी शैली प्रेक्षकांसमोर आणली. या १० ऑक्टोबरला रेखा साठीत पदार्पण करतेय. तिच्या चिरतरुण अभिनयाची जादू आजही रसिक-प्रेक्षकांच्या मनावर कायम आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.