'सैफीना'चा आज कायदेशीर संगम!

सैफ अली खान आणि करीना कपूर आज विवाह बंधनात अडकणार आहेत. कपूर आणि खान कुटुंबांतील सदस्यांसह बॉलिवूड काही मोजके सेलिब्रिटी या लग्नाला उपस्थित राहणार आहेत.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Oct 16, 2012, 10:56 AM IST

www.24taas.com, मुंबई
सैफ अली खान आणि करीना कपूर आज विवाह बंधनात अडकणार आहेत. कपूर आणि खान कुटुंबांतील सदस्यांसह बॉलिवूड काही मोजके सेलिब्रिटी या लग्नाला उपस्थित राहणार आहेत.
वांद्र्यातील फॉर्च्युन हाईटस् या सैफच्या घरी हा लग्नसोहळा होतोय. लग्न रजिस्टर पद्धतीनं करण्याचा निर्णय या दोघांनी घेतलाय. सैफ-करीनाच्या लग्नाची चर्चा बॉलिवूडमध्ये कित्येक दिवस होती आणि अखेर हे दोघे आज लग्नबंधनात बांधले जातायत. यावेळी करीना खास डिझाईन केलेले कपडे परिधान करणार आहे. करीना आणि करिष्माचा जवळचा मित्र म्हणून ओळखला जाणारा मनिष मल्होत्रानं दोघींसाठीही या खास दिवसासाठी खास कपडे डिझाईन केलेत. तर सैफचादेखिल नवाबी थाट लग्नात दिसून येईल.
त्याअगोदर रविवारी करीनाच्या घरी एका संगीत सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या संगीत सोहळ्यासाठी अनेक सेलिब्रिटी सामील झाले होते. यावेळी सैफ अली खान याची पूर्व पत्नी अमृता सिंग हिनेदेखील या संगीत सोहळ्याला हजेरी लावल्याची चर्चा रंगतेय.