सैफ - करीना... अखेर लग्नगाठीत अडकले

By Shubhangi Palve | Last Updated: Tuesday, October 16, 2012 - 15:16

www.24taas.com, मुंबई
अखेर मुंबईत आज सैफ अली खान ऊर्फ साजिद अली खान (सैफचं खरं नाव) आणि करीना कपूर यांचा विवाहसोहळा पार पडलाय. लग्न पार पडल्यानंतर दोघांनी मीडिया आणि लोकांना समोर येऊन अभिवादन केलं. दोघंही या सोहळ्यादरम्यान खूपच खूश दिसत होते.
पाच वर्ष ‘लिव्ह इन रिलेशनशीप’मध्ये राहून त्यांनी अखेर लग्नाचा निर्णय घेतलाय. लिव्ह इन रिलेशनशीपबद्दल काही दिवसांपूर्वीच करीनानं खुलासा केला होता. सैफ अली खान आणि करीना कपूर यांनी रजिस्टर पद्धतीनं लग्न केलंय. संध्याकाळी ‘निकाह’च्या सर्व ‘रस्म’ पार पाडण्यात येणार आहेत. रजिस्टर मॅरेजचा हा विधी सैफ अली खान याच्या बांद्रास्थित ‘फॉर्च्युन हाईटस्’ या बंगल्यात पार पडला. रजिस्ट्रार सुरेखा रमेश यांनी या दोघांच्या कायदेशीर लग्नावर शिक्कामोर्तब केलं. १२ सप्टेंबर २०१२ रोजी रजिस्टर लग्नासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता.
आज संध्याकाळी ताजमहल होटलमध्ये आमंत्रितांसाठी भोजनाचं आयोजन करण्यात आलंय. यानंतर १८ ऑक्टोबर रोजी दिल्लीमध्ये आणखी एका पार्टीचं आयोजन करण्यात येणार आहे. यासोबतच हरियाणास्थित पटौदी पॅलेसमध्येही लग्नाचा सोहळा आयोजित करण्यात आलाय.
यामध्ये नातेवाईकांसोबतच दोघांच्या जवळचा मित्रपरिवारही सहभागी होणार असल्याचं समजतंय. यानंतर हरियाणास्थित सैफचं पारंपरिक घरामध्ये पतौडी पॅलेसमध्ये १७ ऑक्टोबरला निकाहच्या रस्म पार पडणार आहेत. त्यानंतर १८ ऑक्टोबर रोजी रिसेप्शन होणार आहे.

First Published: Tuesday, October 16, 2012 - 15:16
comments powered by Disqus