कवी-गीतकार सुधीर मोघे यांचं निधन

ज्येष्ठ कवी - गीतकार सुधीर मोघे यांचं पुण्यात निधन झालंय. जानकी, पुढचं पाऊल, शापित, हा खेळ सावल्यांचा, कळतनकळत, चौकट राजा, आत्मविश्वास, एक डाव भुताचा, लपंडाव अशा सुमारे ५० हून अधिक सिनेमांसाठी त्यांनी गीतलेखनाचं काम केलंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Mar 15, 2014, 03:30 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, पुणे
ज्येष्ठ कवी - गीतकार सुधीर मोघे यांचं पुण्यात निधन झालंय. मेंदूमध्ये रक्तश्राव झाल्याने पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांचं निधन झालंय.
जानकी, पुढचं पाऊल, शापित, हा खेळ सावल्यांचा, कळतनकळत, चौकट राजा, आत्मविश्वास, एक डाव भुताचा, लपंडाव अशा सुमारे ५० हून अधिक सिनेमांसाठी त्यांनी गीतलेखनाचं काम केलंय.
सांज ये गोकुळी, फिटे अंधाराचे जाळे, दिसलिस तू, फुलले ऋतु, आदिमाया अंबाबाई, मन मनास उमगत नाही, मना तुझे मनोगत, झुलतो बाई रास-झुला, दयाघना, एकाच या जन्मी जणू... अशी त्यांची अनेक गाणी आजही रसिकांच्या ओठांवर आहेत.
शांता शेळके, सुधीर फडके यांच्यासोबतची त्यांची गाणी विशेष गाजली. कविता-गीतलेखनाचं काम करत असतानाचा त्यांनी काही मालिका, सिनेमांनाही संगीतकार म्हणून साज चढवला. `कशासाठी प्रेमासाठी` या सिनेमाला त्यांनी संगीत दिलं होतं तर झी मराठीवर गाजलेला `नक्षत्रांचे देणे` या कार्यक्रमाची एक वेगळी संकल्पना घेऊन त्यांनी या कार्यक्रमाचं सादरीकरणही तितक्याच दिमाखदारपणे केलं होतं. `मंतरलेल्या चैत्रबनात` असो किंवा `स्मरणयात्रा` असे नेहमीच वेगळे प्रयोग करण्यात त्यांचा हातखंडा होता.
`रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा` असं म्हणारा हा कवी आज एकाएकी आपल्यातून निघून गेल्याने एख जिंदादिल कविता आज अबोल झाली, असंच म्हणावं लागेल.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.