विद्याची लगीनघाई...

By Shubhangi Palve | Last Updated: Thursday, September 20, 2012 - 11:20

www.24taas.com, नवी दिल्ली
बॉलिवूडमध्ये ‘डर्टी पिक्चर’मधलाही एक सोज्ज्वळ चेहरा लोकांच्या मनात घर करून राहिलाय. तो म्हणजे विद्या बालन... पण, आता हीच विद्या लवकरच बोहल्यावर उभी राहून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का देणार आहे.

सुरुवातीला विद्यानं कितीही वेळा नकार दिला असला तरी यूटीव्हीचा सीईओ सिद्धार्थ रॉय कपूरसोबत तिचे जवळीक आता सर्वांच्याच लक्षात आलीय. आणि त्यांचे हेच प्रेमाचे संबंध लवकरच एका प्रेमळ नात्यात रुपांतरीत होणार असल्याचं समजतंय. विद्या आणि सिद्धार्थ या वर्षीच्या शेवटी लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचं सूत्रांकडून समजंतय.
नाही म्हणायला, विद्यानं मागच्या वर्षी आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. त्यानंतर अनेक प्रायव्हेट पार्टीज आणि परदेश वाऱ्यांमध्ये ही जोडी एकत्र पाहायला मिळाली होती. नुकतंच त्यांनी मुंबईत समुद्रकिनारी आपल्यासाठी एक नवं घरंही विकत घेतल्याची बातमी कळली होती. विद्या आणि सिद्धार्थच्या जवळच्या एक व्यक्तीकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही जोडी सध्या व्यस्त आहे ती लग्नाच्या तयारीत... आणि हे लग्न डिसेंबर २०१२मध्ये होण्याची शक्यता आहे.
पण, विद्या आणि सिद्धार्थ दोघांनी मात्र अजूनही आपल्या लग्नाबद्दल अळीमिळी गुपचिळीचंच धोरण स्विकारलंय. असो... विद्याच्या चाहते ही बातमी ऐकल्यानंतर नक्कीच खूश होऊन तिला शुभेच्छा देतील.First Published: Thursday, September 20, 2012 - 11:20


comments powered by Disqus