करीना जेव्हा सासूसमोर बिकिनी घालते...

By Shubhangi Palve | Last Updated: Tuesday, September 10, 2013 - 13:47

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
गेल्या वर्षी अभिनेत्री करीना कपूर हिनं सैफ अली खान याच्याशी लग्नगाठ बांधली. पण, त्यानंतर अनेक प्रकारच्या खाजगी प्रश्नांना तिनं नेहमीच टाळलंय. आपल्या आणि सैफच्या संबंधांबद्दल बोलताना ती नेहमीच आपल्या कुटुंबीयांच्या मर्यादेचं भान ठेवत आलीय. पण, बेबो बिंधास आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे.
सैफ अली खानच्या कुटुंबातल्या सदस्यांशी करीनाचं चांगलंच सूत जुळलंय असं म्हटलं जातं. किती? हे सांगताना करीनानं नुकतचं एका फिल्म मॅगझीनमध्ये आपल्या सासूबद्दल – शर्मिला टागोर यांच्याबरोबरच्या आपल्या संबंधांबद्दल असंच वक्तव्य केलंय... ज्यामुळे अनेक जण चाट पडलेत.
करीनानं या मुलाखतीत, आपण आपल्या सासूच्या खूप जवळ असल्याचं म्हटलंय. ‘सैफच्या घरात मला सून म्हणून नाही तर मुलगी म्हणून वागणूक दिली जाते. माझी सासू शर्मिलाजी मला आपली मुलगीच मानतात आणि मुलीप्रमाणेच माझ्यावर प्रेमही करतात. आम्ही ९० च्या दशकांतील सासू-सूनेप्रमाणे पारंपरिक पद्धतीनं राहत नाहीत...’ असं करीनानं म्हटलंय.

आपलं म्हणणं स्पष्ट करण्यासाठी करीनानं एक उदाहरणदेखील दिलंय. ‘नुकतंच आम्ही मालदीवमध्ये हॉलीडेसाठी गेलो होतो. इथं मी माझ्या सासू शर्मिला टागोर यांच्यासमोर बिकिनी घातली होती. आणि ही गोष्ट आम्हा दोघांसाठीही खूप सामान्य गोष्ट होती. ही काही फार मोठी घटना नाही. मी माझ्या आईसमोरही बिकिनी घालते. त्यामध्ये वाईट काय आहे?’
करीनाच्या या वक्तव्याचा अर्थ काय असेल तो तिलाच माहीत. पण, ती सैफच्या कुटुंबात लाडकी सून म्हणून सामावली गेलीय असं नक्कीच म्हणता येईल.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, September 10, 2013 - 13:47
comments powered by Disqus