भारत X ऑस्ट्रेलिया : हैदराबादही जिंका!

कांगारुंविरुद्ध बदला घेण्याच्या मोहिमेमध्ये ‘धोनी अॅन्ड कंपनी’ पुन्हा एकदा विजय साकारण्यास आतूर आहे. हैदराबादमध्ये रंगणाऱ्या दुसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडियाची भिस्त पुन्हा एकदा स्पिनर्सवर असेल. तर ऑस्ट्रेलिया सर्वशक्तीनिशी कमबॅक करण्यासाठी प्रयत्नशील असेल.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Mar 2, 2013, 09:02 AM IST

www.24taas.com, हैदराबाद
कांगारुंविरुद्ध बदला घेण्याच्या मोहिमेमध्ये ‘धोनी अॅन्ड कंपनी’ पुन्हा एकदा विजय साकारण्यास आतूर आहे. हैदराबादमध्ये रंगणाऱ्या दुसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडियाची भिस्त पुन्हा एकदा स्पिनर्सवर असेल. तर ऑस्ट्रेलिया सर्वशक्तीनिशी कमबॅक करण्यासाठी प्रयत्नशील असेल.
चेन्नईनंतर हैदराबादमध्येही कांगारुंना धूळ चारण्यासाठी टीम इंडिया सज्ज झालीय. पहिल्याच टेस्टमध्ये विजय मिळवून सीरिजमध्ये आघाडी घेतल्यामुळे टीम इंडियाचा आत्मविश्वास चांगलाच दुणावलाय. चेन्नईमध्ये टीम इंडियाच्या बॅट्समन आणि बॉलर्स दोघांनीही आपापल्या भूमिका चोख बजावल्या. भारताची ओपनिंग जोडीची समस्या मात्र अजूनही सुटलेली नाही.
वीरेंद्र सेहवाग आणि मुरली विजय चेन्नई टेस्टमध्ये चांगली ओपनिंग देण्यात अपयशी ठरले आहेत. यामुळे आता हैदराबाद टेस्टमध्ये चांगली सुरुवात करुन देण्याच आव्हान त्यांच्यासमोर असेल. चेतेश्वर पुजारा, सचिन तेंडुलकर, विराट कोहली, महेंद्रसिंग धोनीवर मिडल ऑर्डरची जबाबदारी असेल. तर आर. अश्विनवरच पुन्हा एकदा फिरकीचा भार असेल. हरभजन सिंग आणि रविंद्र जाडेजाची त्याला चांगली साथ मिळाली तर पुन्हा एकदा भारताला विजयाची संधी आहे.

ऑस्ट्रेलियन टीम मात्र चेन्नईतील पराभव विसरून पुन्हा विजयी ट्रॅकवर परतण्यासाठी आतूर असेल. त्यांची प्रमुख अडचण आहे ती स्पिनर्सला मदत करणाऱ्या पिचवर भारतीय स्पिनर्सचा मुकाबला करण्याचं. ऑसी कॅप्टन माइकल क्लार्कडून भारताला सर्वाधिक धोका असेल. शेन वॉट्सन आणि डेव्हिड वॉर्नर या स्फोटक बॅटसमन्सला झटपट आऊट करण्याचं आव्हान भारतीय बॉलर्सपुढे असेल. याशिवाय मोईसेस हेन्रिक्स या नवख्या ऑल राऊंडरकडून भारताला सावध रहावं लागेल. बॉलिंगमध्ये जेम्स पॅटिन्सनच्या भेदक माऱ्यापासून भारतीय बॅट्समनला चांगलाच धोका असेल.

पहिली टेस्ट गमावल्यामुळे कांगारुंसमोर कमबॅकच आव्हान असेल. तर टीम इंडिया पुन्हा विजय साकारून सीरिजमध्ये २-० नं आघाडी घेण्यासाठी आतूर असेल. आता ‘धोनी अॅन्ड कंपनी’नं गवसलेला सूर कायम राखवा, हीच भारतीय क्रिकेटप्रेमींची इच्छा असेल.