ऑसी टीममध्ये बंड, चारी मुंड्या चीत

मोहाली टेस्टपूर्वी ऑस्ट्रेलियन टीमला मोठा धक्का बसलाय. शेन वॉटसन, जेम्स पॅटिन्सन, उस्मान ख्वाजा आणि मिचेल जॉन्सन या चार क्रिकेटपटूंना टीम बाहेर ठेवण्यात आलंय. टीम प्रोटोकॉल मोडित काढल्यानं क्रिकेट ऑस्ट्रेलियन त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे.

प्रशांत जाधव | Updated: Mar 11, 2013, 07:53 PM IST

www.24taas.com, मोहाली
मोहाली टेस्टपूर्वी ऑस्ट्रेलियन टीमला मोठा धक्का बसलाय. शेन वॉटसन, जेम्स पॅटिन्सन, उस्मान ख्वाजा आणि मिचेल जॉन्सन या चार क्रिकेटपटूंना टीम बाहेर ठेवण्यात आलंय. टीम प्रोटोकॉल मोडित काढल्यानं क्रिकेट ऑस्ट्रेलियन त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे.
आता तिस-या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाला 13 क्रिकेटपटूंमधून अंतिम 11 क्रिकेटपटूंची निवड करावी लागणार आहे. ऑस्ट्रेलिया चार टेस्ट मॅचेसच्या सीरिजमध्ये 0-2 नं पिछाडीर आहे. शेन वॉटसन खेळत नसल्यानं कांगारुंची बॅटिंग उघडी पडणार आहे. तर जेम्स पॅटिन्सन आणि मिचेल जॉन्सनवर कारवाई केल्यानं केवळ दोनच स्पेशलिस्ट फास्टर बॉलर्ससह खेळाव लागणार आहे.
ऑस्ट्रेलियन प्लेअर्सनी टीमचा प्रोटोकॉल मोडल्याने मोहाली टेस्टकरता त्यांना टीमबाहेर बसवण्याचा निर्णय क्रिकेट ऑस्ट्रेलियाने घेतला आहे.

नेमका काय आहे वाद
भारताविरोधातील दोन कसोटी सामन्यात काय चुका झाल्या आणि आपण पुढील दोन कसोटी कशा खेळाव्यात या संदर्भात कोचने सर्व टीमकडून स्पष्टीकरण आणि सूचना मागविल्या होत्या. ऑस्ट्रेलिया संघातील वरील चार वगळता सर्व खेळाडूंनी मेल करून स्पष्टीकरण आणि सूचना दिल्या. पण या चौघांनी सूचना दिल्याच नाही, त्यामुळे चौघांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली असल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्पष्ट केले आहे.

मोहली टेस्टपूर्वी ऑस्ट्रेलियन टीममध्ये नवा वाद समोर आला आहे. शिस्तभंगाची कारवाई केल्यानंतर शेन वॉटसन सिडनीला रवाना झाला आहे. वॉटसनबरोबर कांगारुंच्या इतर तीन क्रिकेटपटूंवरही शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. या चार क्रिकेटपटूंविनाच ऑस्ट्रेलियन टीमला मोहालीत खेळावं लागणार आहे. वॉटसन तडाफडकी ऑस्ट्रेलियाला रवाना झाल्यानं कांगारु टीममध्ये दुफळी माजली असल्याची चर्चा सध्या चांगलीच रंगलीय.
कोच आणि क्रिकेटपटूंमध्ये हा वाद असल्याचं म्हटलं जातंय. क्रिकेट ऑस्ट्रेलियानं मात्र वॉट्सन वैयक्तकि कारणांमुळे मायेदशी गेला असल्याचं सांगितलंय...