टीम इंडियाचं मिशन सेमीफायनल!

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडिया ओव्हलवर वेस्ट इंडिजविरूद्ध होणाऱ्या मॅचकरता कंबर कसून सज्ज झालीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jun 11, 2013, 10:21 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, लंडन
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडिया ओव्हलवर वेस्ट इंडिजविरूद्ध होणाऱ्या मॅचकरता कंबर कसून सज्ज झालीय. पहिल्या मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेविरूद्ध मिळवलेल्या दणदणीत विजयानंतर आता विंडिजला पराभूत करून सेमीफायनल गाठण्याचं स्वप्न टीम इंडिया पाहात असेल तर दुसरीकडे कॅरेबियन टीमही भारताविरूद्ध दमदार खेळ करण्यास सज्ज असेल.
चॅम्पियन्स ट्रॉफीतील आपापली पहिली मॅच जिंकून धोनी ब्रिगेड आणि विंडिज टीम ओव्हलवर एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. टीम इंडियाने कार्डिफ वन-डेत द. आफ्रिकेचं कडवं आव्हान मोडीत काढत २६ रन्सने दणदणीत विजय मिळवला होता. तर पाकिस्तानविरूद्ध लो स्कोअरिंग मॅचमध्ये वेस्ट इंडिजने अवघ्या २ विकेट्सने विजयाची नोंद केली. त्यामुळे या दोन्ही टीम्समधील विजेता सीममधील स्थान निश्चित करणार.
रोहित शर्मा आणि शतकवीर शिखर धवन पुन्हा एकदा जबरदस्त ओपनिंग करून देण्यास सज्ज असतील तर मिडल ऑर्डरमध्ये दिनेश कार्तिकसह शंभरावी वन-डे खेळणारा विराट कोहली आणि कॅप्टन महेंद्र सिंग धोनी यांच्यावर वेगाने रन्स जमवण्याची जबाबदारी असणार आहे. तर सुरेश रैना आणि ऑलराऊंडर रवींद्र जाडेजा स्लॉग ओव्हर्समध्ये विंडिजच्या बॉलिंगची पिसं काढण्याच्या तयारीनेच मैदानात उतरतील.

मात्र, विंडिजकडे वैविध्यपूर्ण बॉलिंग अटॅक आहे. भारतीय बॉलर्सलाही त्यांच्यापासून सावध रहावं लागेल. पाकिस्तानच्या इनिंगला ब्रेक लावणाऱ्या केमार रॉचसह, रवी रामपॉल, मार्लन सॅम्युअल्स, कॅप्टन ड्वेन ब्राव्हो आणि सुनिल नारायण यांच्यासमोर भारतीय बॅट्समन्सना रोखण्याचं आव्हान असेल. भारताप्रमाणेच विंडिजची बॅटिंग लाईनअप विस्फोटक वाटते तितकीच ती बेभरवशाची आहे. महत्त्वाचं म्हणजे ख्रिस गेल, डवेन ब्राव्हो आणि कायरन पोलार्डला भारतीय बॉलिंग अटॅकचा अंदाज आहे.. त्यामुळे भारतीय टीमच्या अडचणी वाढू शकतात. ओपनिंगला येणाऱ्या ख्रिस गेलसह जॉन्सन चार्ल्स, डॅरेन ब्राव्हो, रामनरेश सारवान, विकेट कीपर दिनेश रामदिन आणि ऑलराऊंडर कायरन पोलार्डला पीचवर उभं राहून रन्स करावे लागणार आहेत. विंडिजची बॅटिंग लाईनअप पाहता धोनीब्रिगेडने वेगळे प्लान्स निश्चितच आखले असणार. विंडिजच्या बॅट्समनला रोखण्याचं कठिण आव्हान भारतीय बॉलर्सपुढे असेल.

भारतीय फास्ट बॉलिंगची मदार असणार आहे ती उमेश यादव, ईशांत शर्मा आणि भुवनेश्वर कुमार या त्रिकुटावर. शिवाय आर. अश्विन आणि जाडेजा स्पिनची कमाल दाखवत विंडिज बॅट्समन्सची दांडी गुल करण्यास सज्ज असतील. त्यामुळे भारत विरूद्ध वेस्ट इंडिज मॅचमध्ये कोणती टीम विजय मिळवून चॅम्पियन्स ट्रॉफी सेमीफायनलचं तिकीट बूक करते हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.