चॅम्पियन्स लीग टी-२०: राजस्थाननं मुंबईला ७ विकेटनं हरवलं

विक्रमजीत मलिकच्या धारदार बॉलिंगनंतर संजू सॅमसनच्या हाफ सेंच्युरीच्या मदतीनं राजस्थान रॉयल्सनं चॅम्पियन्स लीग टी-२०च्या क्रिकेट स्पर्धेत आयपीएल विजेत्या मुंबई इंडियन्सला सलामीलाच पराभवाचा धक्का दिला.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Sep 22, 2013, 09:36 AM IST

www.24taas.com , झी मीडिया, जयपूर
विक्रमजीत मलिकच्या धारदार बॉलिंगनंतर संजू सॅमसनच्या हाफ सेंच्युरीच्या मदतीनं राजस्थान रॉयल्सनं चॅम्पियन्स लीग टी-२०च्या क्रिकेट स्पर्धेत आयपीएल विजेत्या मुंबई इंडियन्सला सलामीलाच पराभवाचा धक्का दिला.
रोहित शर्मा आणि कॅरॉन पोलार्ड यांच्या आक्रमक बॅटिंगनंतरही मुंबईला १४२ रन्सवर रोखणाऱ्या राजस्थाननं हे आव्हान दोन बॉल शिल्लक राखून पार केलं. कप्तान द्रविड अपयशी ठरल्यानंतर सॅमसननं ५४ रन्सची वेगवान खेळी करून अजिंक्य रहाणेसह टीमला विजयी पथावर ठेवलं.
विजय आवाक्याधत आलेला असताना सॅमसन बाद झाला; पण शेन वॉटसन आणि स्टुअर्ट बिन्नी यांनी मोहित फत्ते केली. त्याआधी, पहिले बॅटिंग केलेल्या मुंबई इंडियन्सची सुरवात खराब होती. विक्रमजित मलिक या नवख्या बॉलरनं स्मिथ आणि कार्तिक यांना आऊट करून मुंबईची दोन बाद २६ अशी अवस्था केली होती. त्यानंतर तेंडुलकर आणि रायुडू बाद झाल्यावर मुंबईची अवस्था चार बाद ४३ अशी झाली होती.
कर्णधार रोहित शर्मा आणि पोलार्ड यांनी यानंतर डावच सावरला नाही तर उत्तुंग टोलेबाजी करून धावांचीही गती वाढविली, परंतु अंतिम टप्प्यात हे दोन्ही फलंदाज बाद झाले तरी आयपीएल विजेत्यांना १४२ धावांपर्यंत मजल मारता आली.
दरम्यान, पावसामुळं आउटफील्ड ओली असल्याकारणानं मॅच १५ मिनीटं उशीरा सुरू झाली. द्रविडनं टॉस जिंकून पहिले बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आणि राजस्थान रॉयल्सच्या बॉलर्सनंही हा निर्णय योग्य ठरवला.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.