शालेय क्रिकेटमध्ये ११ ऐवजी १५ खेळाडूंनी खेळावं- सचिन

मुंबईतील अधिकाधिक लहान क्रिकेटपटूंना खेळण्याची संधी अधिक कशी उपलब्ध होऊ शकते याबाबतच्या सूचना सचिन तेंडुलकरनं मुंबई क्रिकेट असोसिएशनला केलीय. सचिन म्हणतो, `भावी पिढी घडविण्यासाठी शालेय आणि महाविद्यालयीन क्रिकेट पाया असून या क्रिकेटमध्ये ११ ऐवजी १५ खेळाडूंना खेळण्याची संधी दिली, तर अधिकाधिक नवी गुणवत्ता पुढं येईल.`

Aparna Deshpande | Updated: Dec 4, 2013, 07:30 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबईतील अधिकाधिक लहान क्रिकेटपटूंना खेळण्याची संधी अधिक कशी उपलब्ध होऊ शकते याबाबतच्या सूचना सचिन तेंडुलकरनं मुंबई क्रिकेट असोसिएशनला केलीय. सचिन म्हणतो, `भावी पिढी घडविण्यासाठी शालेय आणि महाविद्यालयीन क्रिकेट पाया असून या क्रिकेटमध्ये ११ ऐवजी १५ खेळाडूंना खेळण्याची संधी दिली, तर अधिकाधिक नवी गुणवत्ता पुढं येईल.`
मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं क्रिकेटला अशा एका उंचीवर नेऊन ठेवलं आहे की क्रिकेटमध्ये आता नवीन काय रुजवता येईल याचा विचार करण्याची वेळ येऊन ठेवली आहे. सचिननं भारतात एक क्रिकेट इंडस्ट्री उभी केली आणि या इंडस्ट्रीमध्ये अनेक क्रिकेटपटू आपलं नशीब आजमवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. सचिनमुळंच भारतातील कानाकोपऱ्यात आणि छोट्या-छोट्या शहरांमध्ये क्रिकेट रुजलं आणि क्रिकेटपटूंची खाण तयार झाली. यामुळंच आता क्रिकेटमध्ये तेवढीच गळेकापू स्पर्धादेखील निर्माण झाली आहे.
अशा परिस्थितीमध्ये टॅलेंट असूनही अनेकजणांना संधीच मिळत नाही. म्हणूनच आता क्रिकेटमध्ये नवनवीन प्रयोग रुजवण्याची गरज निर्माण झाली आहे. हे जर सर्वात प्रथम कोणाच्या लक्षात आल असेल तर ज्याला आपण क्रिकेटचं विद्यापीठ म्हणतो त्या सचिन तेंडुलकरच्या.
सचिनची ही सूचना आता मुंबई क्रिकेट असोसिएशन अमलात आणते का? हे पहावं लागेल. सचिनच्या या सूचनेमुळं मुंबईतील अनेक उदयोन्मुख क्रिकेटपटूंनाही एक आशेचा किरण नक्कीच दिसला असेल.
मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरनंतरच्या पर्वाला आता सुरुवात झाली आहे आणि सचिनही आता मेन्टॉरच्या भूमिकेत दिसू लागला आहे. सचिननं रिटायर्डमेंट जरी घेतली असली तरी त्यानं आयुष्यभर क्रिकेटशीसंबंधिच काहीतरी करत रहावं अशीच इच्छा प्रत्येकजण व्यक्त करत आहे. खरंतर सचिनच्या आयुष्यात क्रिकेट हा ऑक्सिजनसारखा आहे. म्हणूनच क्रिकेटला गुडबाय केल्यानंतरही क्रिकेटची आपण अजून काय सेवा करु शकतो याचाच विचार त्याच्या मनात घोळत असतात, हेच त्याच्या या सूचनांवरून स्पष्ट होतंय. याचबरोबर सचिनला जिनिअस का? संबोधलं जातं हेदेखील आता आपल्या लक्षात आलंच असेल.

सचिनच्या या सत्कार सोहळ्यात बीकेसी इथल्या क्रिकेट अकादमीचं शरद पवार क्रिकेट अकादमी असं नामकरण करण्यात आलं. "मुंबईत जवळपास दहा हजार शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी क्रिकेट खेळत आहेत, पण प्रत्येकाला अंतिम सामन्यात खेळण्याची संधी मिळत नाही. म्हणूनच अशा मुलांना स्वतःला सिद्ध करण्याची संधी एमसीएनं उपलब्ध करून द्यावी. निवड समितीचे सदस्यही मग आणखी काही खेळाडूंना खेळताना पाहू शकतात, त्यातून आणखी काही मुलांची निवड होऊ शकते, म्हणून मी हा एक प्रस्तावही सचिननं एमसीएपुढं ठेवला.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.