लक्ष्मण-द्रवीडशिवाय लढत; न्यूझीलंडचं कडवं आव्हान

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिली टेस्ट आज हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर रंगणार आहे. मायदेशात टेस्टमध्ये चमकदार कामगिरी करण्यास धोनी अँड कंपनी आतूर असणार आहे. तर न्यूझीलंडची टीमही भारताला कडवी टक्कर देण्यास सज्ज आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Aug 23, 2012, 08:22 AM IST

www.24taas.com, हैद्राबाद
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिली टेस्ट आज हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर रंगणार आहे. मायदेशात टेस्टमध्ये चमकदार कामगिरी करण्यास धोनी अँड कंपनी आतूर असणार आहे. तर न्यूझीलंडची टीमही भारताला कडवी टक्कर देण्यास सज्ज आहे. राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मणच्या अनुपस्थितीत टीम इंडियाच्या मिडल ऑर्डरची कसोटी लागणार आहे.
महेंद्रसिंग धोनीच्या टीमला पहिल्या टेस्टमध्ये न्यूझीलंडच्या आव्हानाला सामोर जावं लागणार आहे. मायदेशात खेळत असल्यामुळे भारतीय टीमच या मॅचमध्ये हॉट फेव्हरिट असणार आहे. मायदेशात नेहमीच टीम इंडियानं लौकिकाला साजेशी कामगिरी केलेली आहे. त्यामुळे या मॅचमध्ये किवींना दणका देण्यासाठी भारतीय टीम सज्ज आहे. भारताची भिस्त या मॅचमध्ये बॅटिंगवरच असणार आहे. राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मणच्या अनुपस्थितीत बॅट्समनची चांगलीच कसोटी लागणार आहे.
ओपनिंगची जबाबदारी गौतम गंभीर आणि वीरेंद्र सेहवागवर असणार आहे. तर मिडल ऑर्डरमध्ये विराट कोहली, सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंग धोनीकडून मोठ्या अपेक्षा असतील. सुरेश रैनाबरोबर चेतेश्वर पुजारा आणि एस. बद्रिनाथमध्ये कोणाला संधी मिळते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. झहीर खान, ईशांत शर्मा आणि उमेश यादव या फास्ट बॉलर्सवर किवी बॅट्समनना रोखण्याचं आव्हान असेल. तर आर. अश्विन, प्रज्ञान ओझा आणि पीयूष चावला स्पिनची धुरा सांभाळतील. भारताचं पारडं या मॅचमध्ये जरी जड वाटत असलं तरी, किवींना कमी लेखून धोनीब्रिगेडला चालणार नाही. रॉस टेलरच्या टीमला भारताला भारतामध्ये मात देण्यासाठी चांगलेच कष्ट करावे लागणार आहेत. बॉलिंगचे ऑप्शन्स कॅप्टन टेलरकडे असल्यानं त्याला याचा फटका बसण्याची शक्यता आहे. ब्रेंडन मॅककलम, मार्टिन गप्टिल आणि कॅप्टन रॉस टेलरवर किवींच्या बॅटिंगची मदार असेल. त्यातच डॅनियल व्हिटोरी दुखातीमुळे टेस्टला मुकणार असल्यानं त्याची कमी किवींना चांगलीच भासणार आहे. आता, ब्लॅक कॅप्सचं आव्हानं टीम इंडिया कसं मोडित काढते याकडेच भारतीय चाहत्यांचं लक्ष असेल.