आयपीएल ७: उद्घाटन `यूएई`त, सामने बांग्लादेशात, फायनल भारतात!

By Aparna Deshpande | Last Updated: Wednesday, March 12, 2014 - 17:41

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
भारतात होणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर बीसीसीआयनं आयपीएलच्या सातव्या सीझनसाठी पहिला पर्याय म्हणून युएईवर शिक्कामोर्तब केलं आहे. संयुक्त अरब अमिरातीमध्ये १६ एप्रिलला या स्पर्धेचं उद्घाटन होईल आणि १ जूनला भारतात आयपीएल-७ चा समारोप होईल, असं संयोजकांनी जाहीर केलंय.
या स्पर्धेचा मधला टप्पा, अर्थात १ मे ते १२ मे दरम्यानचे सामने भारतात खेळवणं शक्य न झाल्यास बांगलादेशात होणार आहेत. त्यानंतरचे आयपीएलची बाद फेरी भारतात खेळवण्याचा बीसीसीआयचा इरादा आहे. कारण १३ मे रोजी लोकसभा निवडणुकीचा शेवट ज्या राज्यांमध्ये निवडणुकांची काम झाली आहेत, त्या राज्यांमध्ये आयपीएलच्या सामन्यांचं आयोजन करता येईल, असं बीसीसीआयचं मत आहे.
मतमोजणीच्या दिवशी म्हणजेच १६ मे रोजी आयपीएलचा कोणताही सामना होणार नाही. १६ एप्रिल ते ३० एप्रिल हा आयपीएल स्पर्धेचा पहिला टप्पा यूएईत - अर्थात अबूधाबी, दुबई आणि शारजा इथं होईल. तिथल्या १६ सामन्यांनंतर, १ ते १२ मे हा दुसरा टप्पा बांग्लादेशात घ्यायचा का, हे ठरवण्याआधी बीसीसीआय केंद्रीय गृहखात्याशी सल्लामसलत करणार आहे. या कार्यकाळात सुरक्षाव्यवस्था देण्याची तयारी गृहखात्यानं दाखवल्यास हे सर्व सामने भारतातच होतील. पण ते शक्य न झाल्यास बांग्लादेशला सह-यजमानपद मिळेल, असं बीसीसीआयनं स्पष्ट केलं.
त्यानंतर, १३ मेपासून आयपीएलचं धुमशान भारतात सुरू होणार आहे. १२ मे रोजी नवव्या टप्प्यातील मतदान संपणार असल्यानं सुरक्षेचा मुद्दा निकालात निघेल. त्यामुळे उर्वरित साखळी सामने आणि प्ले-ऑफ भारतात खेळवता येऊ शकतील. अर्थात, १६ मे रोजी निवडणुकीचा निकाल असल्यानं त्या दिवशी कुठलाही सामना होणार नसल्याचं बीसीसीआयनं सांगितलंय. १ जूनला या स्पर्धेचा दणदणीत समारोप होईल, असंही त्यांनी जाहीर केलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, March 12, 2014 - 17:25
comments powered by Disqus