सट्टेबाजांच्या यादीत अझरुद्दीन नाही!

२०००मध्ये उघड झालेल्या या मॅच फिक्सिंग प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यास दिल्ली पोलिसांना १३ वर्ष लागलेत. 80 पानांच्या आरोपपत्रात दक्षिण आफ्रिकेच्या हॅन्सी क्रोनिएसह 5 सट्टेबाजांच्या नावाचा समावेश आहे

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jul 22, 2013, 08:51 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
मार्च २०००
भारत- द.आफ्रिका
क्रिकेट स्टेडियमवर क्रिकेटप्रेमींची मोठी गर्दी होती...प्रत्येक बॉलवर प्रेक्षकांची उत्सुकता वाढत होती. मॅच कोण जिंकणार याकडं सर्वांच लक्ष लागलं होतं...मात्र कोण हरणार कोण जिंकणार याचा फैसला आधीच झाला होता. कारण ही मॅच आधीच फिक्स झाली होती. दक्षिण आफ्रिका तसेच भारतीय टीममधील काही खेळाडूं त्यामध्ये सहभागी होते...पण दिल्ली पोलीसांच्या सट्टेबाजांवर करडी नजर होती..
७ एप्रिल २०००
दिल्ली पोलिसांनी आफ्रिकेचा कॅप्टन हॅन्सी क्रोनिए,हर्षल गिब्ज, पीटर स्ट्रेडोम आणि निकी बोये यांच्यावर मॅच फिक्सिंगचा आरोप ठेवण्यात आला..हॅन्सी क्रोनिए आणि सट्टेबाज संजय चावला यांच्यातलं दूरध्वनीवरचं संभाषण दिल्ली पोलिसांनी रेकॉर्ड केलं होतं...या घटनेमुळे क्रिकेट जगतात एकच खळबळ उडाली होती....सुरुवातीला हॅन्सी क्रोनिएने या आरोपाचं खंडन केलं..
११ एप्रिल २०००
हॅन्सी क्रोनिएची कबुली
`होय मी फिक्सिंग केलं`
मात्र ११ एप्रिल २०००ला हॅन्सी क्रोनिएला उपरती झाली आणि दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डाच्या चौकशी समितीसमोर क्रोनिएने फिक्सिंगची कबुली दिली. मॅच फिक्सिंगसाठी क्रोनिएने पैसे देवू केल्याची कबुली हर्षल गिब्ज, हेनरी विलियम्स आणि पीटर स्ट्रेडोम यांनी दिली. तसेच १९९६मध्ये मोहमद अझरुद्दीन याने सट्टेबाजाशी आपली ओळख करुन दिल्याचा गौप्यस्फोट क्रोनिएने केला. मात्र अझरुद्दीने क्रोनिएचा आरोप फेटाळून लागला. पण आयकर खात्याच्या पथकाने भारतीय क्रिकेट टीमचे तत्कालीन प्रशिक्षक कपील देव, अजय जडेजा, नयन मोंगिया आणि निखील चोप्रा यांच्या घरावर छापे टाकले. पुढे सीबीआयच्या तपासात मोहमद अझरुद्दीन याने अजय जडेजा आणि नयन मोंगियाच्या मदतीने मॅच फिक्सिंग केल्याचं उघड झालं. मात्र कपील देव यांच्या विरोधात कोणताच पुरावा मिळाला नाही. फिक्सिंगप्रकरणी भारतीय क्रिकेट बोर्डाने अझरुद्दीन आणि अजय शर्मावर अजीवबंदी घातली तर अजय जडेजा, मनोज प्रभाकर आणि फिजिओ थेरपीस्ट अली इराणी यांच्यावर पाच वर्षांची बंदी घालण्यात आली. याप्रकरणात नयन मोंगियाला क्लिन चिट देण्यात आली.
तिकडं दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डाने हॅन्सी क्रोनिएवर अजीवबंदी घातली..१ जून २००२ विमान अपघातात हॅन्सी क्रोनिएचा मृत्यू झाला. २०००मध्ये उघड झालेल्या या मॅच फिक्सिंग प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यास दिल्ली पोलिसांना १३ वर्ष लागलेत. 80 पानांच्या आरोपपत्रात दक्षिण आफ्रिकेच्या हॅन्सी क्रोनिएसह 5 सट्टेबाजांच्या नावाचा समावेश आहे. विशेष म्हणजे या आरोपपत्रात मोहम्मद अझहरूद्धीनच्या नावाचा उल्लेख नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.