घरच्या मैदानावर धवन खेळाला मुकणार?

टीम इंडियाच्या ‘गब्बर’ शिखर धवननं मोहालीत चांगलाच धुमाकूळ घातला. त्याच्या धडाकेबाज खेळीमुळे भारताला मोहालीवर कब्जा करता आला. पण, ऑस्ट्रेलियाविरुद्ध २२ मार्च रोजी होणाऱ्या आपल्या घरच्या मैदानावर मात्र शिखर धवन खेळणार नसल्याचं चित्र दिसतंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Mar 19, 2013, 11:20 AM IST

www.24taas.com, मोहाली
टीम इंडियाच्या ‘गब्बर’ शिखर धवननं मोहालीत चांगलाच धुमाकूळ घातला. त्याच्या धडाकेबाज खेळीमुळे भारताला मोहालीवर कब्जा करता आला. पण, ऑस्ट्रेलियाविरुद्ध २२ मार्च रोजी होणाऱ्या आपल्या घरच्या मैदानावर मात्र शिखर धवन खेळणार नसल्याचं चित्र दिसतंय.
येत्या २२ मार्च रोजी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया चौथी टेस्ट मॅच दिल्लीत रंगणार आहे. आपल्या घरच्या मैदानावर धवनच्या चाहत्यांना मात्र त्याला पाहता येण्याची चिन्हं कमी आहेत. धवनच्या हाताला झालेल्या दुखापतीमुळे या टेस्टमध्ये त्याला टीममधून बाहेर राहावं लागू शकतं. कॅप्टन महेंद्रसिंग धोनीनं ही शक्यता व्यक्त केलीय.

तिसऱ्या टेस्ट मॅचच्या चौथ्या दिवशी क्षेत्ररक्षण करताना धवनचा तोल गेला आणि त्याच्या डाव्या हाताला दुखापत झालीय. धवननं आपल्या कारकिर्दिच्या पहिल्याच टेस्टला चार चाँद लावले. केवळ १६८ बॉल्समध्ये त्यानं १८५ रन्सची तुफान खेळी केली. यात तब्बल ३३ फोर आणि सिक्स खेचले आणि पदार्पणाच्या मॅचमध्ये सर्वात जलद शतक ठोकणारा तो पहिलाच बॅटसमन ठरला. या टेस्टमध्ये त्याला मॅन ऑफ द मॅचचा खिताबही मिळाला.
बॉल पकडण्यासाठी झेपावलेला धवन बोटांवर खाली पडला. फ्रॅक्चर झालं नसलं तरी डॉक्टरांनी त्याला काही काळ बॅटींग न करण्याचा सल्ला दिलाय.