'दोस्त दोस्त ना रहा'; विनोदचा सचिनवर इमोशनल अत्याचार

‘सचिनला माझ्याविरूद्ध काही लोक भडकवत होते… यात त्यांना यश मिळाल्याचं सध्या दिसतंय’ असं खुद्द सचिनचा एकेकाळचा मित्र विनोद कांबळीने म्हटलंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Nov 20, 2013, 08:36 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
‘सचिन तेंडुलकरची आणि माझी दोस्ती नेहमीच चर्चेत असते. मात्र, गेली काही वर्ष आमच्यात संभाषण झालेलं नाही... खरंतर मी आणि सचिनने हॅरीस शिल्डमध्ये केलेल्या पार्टनरशीपनंतर सचिनला ओळख मिळाली होती... पण, आता मात्र सचिन मला विसरला' असं खुद्द सचिनचा एकेकाळचा मित्र विनोद कांबळीने म्हटलंय.
‘सचिननं निवृत्ती घेताना आपल्या फेअरवेल भाषणात सगळ्यांना धन्यवाद दिले... पण, तो मला मात्र विसरला... मी त्याला तो १० वर्षांचा असल्यापासून ओळखतो... मला वाटतं, त्यानं मला विसरायला नको होतं... हॅरीस शिल्डमध्ये आम्ही दोघांनी केलेली पार्टनरशीप त्याच्या करिअरचा टर्निंग पॉईंट ठरली होती... पण, हे तो विसरला. पार्टीत त्यानं सगळ्यांना बोलावलं होतं... पण, ज्या मित्रानं त्याच्यासोबत त्याचे सगळे सुख आणि दु:ख शेअर केले त्या मित्राला मात्र तो विसरला... मला वाटलं, तो मैदानावर कदाचित माझं नाव घ्यायचं विसरला असेल पण, मला किंवा माझ्या कुटुंबीयांना त्याच्या पार्टीचं निमंत्रण मिळालं नव्हतं... तेव्हा मात्र खूप वाईट वाटलं... मला पण समजलं नाही की नक्की कुठे बिघडलं?’ असं विनोदनं यावेळी म्हटलंय.
‘सचिनला माझ्याविरूद्ध काही लोक भडकवत होते… यात त्यांना यश मिळाल्याचं सध्या दिसतंय’ असंही विनोदनं म्हटलंय. सचिनच्या फेअरवेल भाषणात विनोदचा उल्लेख नव्हता एव्हढंच नाही तर सचिनने निवृत्तीनंतर दिलेल्या ग्रँड पार्टीलाही विनोदला आमंत्रण नव्हतं. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत होतं. यावर ‘झी मीडिया’ला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह इंटरव्ह्यूमध्ये विनोदनं हे दुःख व्यक्त केलंय.
एव्हढंच नव्हे विनोदची सध्याची रिंग टोन आहे... 'कसमे वादे प्यार वफ़ा सब, बातें हैं बातों का क्या... कोई किसी का नहीं ये झूठे, नाते हैं नातों का क्या?'
व्हिडिओ पाहा -

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.