लाचखोर अधिकाऱ्यांना घरचा रस्ता

पाच वर्षांमध्ये फौजदारी गुन्हे दाखल झालेल्या शिक्षण खात्याच्या १६ लाचखोर अधिकाऱ्यांना निलंबित करून त्यांना कायमचा घरचा रस्ता दाखविण्यात आला आहे.

Updated: Oct 21, 2011, 09:06 AM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

 

पाच वर्षांमध्ये फौजदारी गुन्हे दाखल झालेल्या शिक्षण खात्याच्या १६ लाचखोर अधिकाऱ्यांना निलंबित करून त्यांना कायमचा घरचा रस्ता दाखविण्यात आला आहे.

 

शिक्षण विभागातील १९ अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून त्यापैकी १६ अधिकारी लाचखोरी व फौजदारी गुन्ह्य़ांसाठी निलंबित करण्यात आले आहेत. राज्याच्या शिक्षण विभागाला भ्रष्टाचाराची कीड लागल्याचे ८९ अधिकाऱ्यांची कामचुकारपणा व अन्य कारणांसाठी विभागीय चौकशी सुरू आहे.

 

शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्या मंत्रालयातील कार्यालयात त्यांचा सचिव कारंडेला लाच घेताना नुकतीच अटक करण्यात आली. या पाश्र्वभूमीवर शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे गुन्हे, निलंबन, विभागीय चौकशी आदीसंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. अजय तापकीर यांनी मागविलेल्या माहितीच्या अधिकारात ही माहिती उघड झाली आहे.

 

जानेवारी २००६ ते ऑक्टोबर २०११ या कालावधीतील आकडेवारी पाहता ८९ अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी सुरू असल्याचे निष्पन्न झाले आहे. ती कधी पूर्ण होणार, त्यानंतर त्यांच्यावर काय कारवाई होणार, याबाबत प्रश्नचिन्ह आहे. लाचखोरीसह फौजदारी गुन्ह्य़ांसाठी ज्यांच्यावर कारवाई झाली आहे.  त्यांच्याबाबतचे खटले संबंधित न्यायालयांमध्ये प्रलंबित आहेत.

 

शिक्षण विभागात रिक्त पदांची संख्या मोठी असताना भ्रष्टाचारी  व कामचुकार अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्याही मोठी असल्याने या विभागाचा कारभार कसा सुरू आहे, हे दिसून येते.