दहावीही न झालेल्या विद्यार्थिनीची ‘एमआयटी’त धडक

मालविका जोशी हिच्या संगणकीय आज्ञावली कौशल्याचा अमेरिकेत सन्मान करण्यात आला आहे. मुंबईची मालविका ही दहावीही झालेली नाही. मात्र या विद्यार्थिनीने ‘एमआयटी’त धडक मारली.

Updated: Aug 31, 2016, 11:16 AM IST
दहावीही न झालेल्या विद्यार्थिनीची ‘एमआयटी’त धडक title=

मुंबई : मालविका जोशी हिच्या संगणकीय आज्ञावली कौशल्याचा अमेरिकेत सन्मान करण्यात आला आहे. मुंबईची मालविका ही दहावीही झालेली नाही. मात्र या विद्यार्थिनीने ‘एमआयटी’त धडक मारली.

देशात आयआयटी किंवा अगदी कोणत्याही सामान्य अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा असेल तर दहावी, बारावी इतकेच नव्हे तर प्रवेश परीक्षांचा सामना करावा लागतो. मात्र, सतरा वर्षीय मालविका जोशी या विद्यार्थिनीला केवळ तिची संगणकीय आज्ञावलीतील (कोडींग) बुद्धीमत्ता पाहून थेट अमेरिकेतील प्रतिष्ठेच्या मॅसॅच्युसेटस इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेत प्रवेश मिळाला. 

आंतरराष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान ऑलिम्पियाडमध्ये मालविकाने दोन रजत आणि एक कांस्य पदक मिळविले आहे. या ऑलिम्पियाडमध्ये यश मिळवणाऱ्या मुलांना थेट प्रवेश देण्याची पद्धत एमआयटीत आहे. त्यानुसार तिला संगणक विज्ञानात ‘एमआयटी’ या प्रतिष्ठित संस्थेत थेट प्रवेशाची संधी मिळाली. 

मुळची मुंबईची असलेल्या मालविका दादर येथील पार्शी युथ असेंब्ली या शाळेत शिक्षण घेत होती. शाळेत तिची उत्तम कामगिरी होती. शाळा सोडल्यानंतर तिने विविध विषयांचा अभ्यास केला यात तिला संगणक प्रोग्रॅमिंगमध्ये आवड निर्माण झाली.  

आईचा मोठा पाठिंबा, नोकरी सोडली आणि...

आईचे पाठबळ मालविकाच्या यशामागे आईचा पाठिंबा आणि तिची मेहनत या दोन्हीचा मोठा  वाटा आहे. मुलींना शाळेतून काढण्याचा निर्णय सोपा नसल्याचे मालविकाची आई सुप्रिया यांनी सांगितले.  
देशात घरीच शिक्षणाची संकल्पना नाही किंवा शाळेतून बाहेर पडणे म्हणजे शिक्षणाच्या पुढील वाटा बंद करण्यासाखेच आहे. पती राज हे अभियंता असून त्यांचा स्वत:चा उद्योग आहे. त्यांना मुलींना शाळेतून काढून घेण्याबाबत मनधरणी करणे अवघड होते. मी काम करत असलेल्या एनजीओतील नोकरी सोडली व मालविकासाठी शैक्षणिक अभ्यासक्रम तयार केला.

घरातच वर्ग आणि शिक्षणाचे धडे

घरातच वर्ग तयार केला. मुलींना शिकवण्याची क्षमता माझ्यात होती. माझ्या मुलींनाही ते आवडले, त्या समाधानी होत्या, दररोज मुली नवीन काहीतरी शिकत होत्या. ज्ञान ही त्यांची आवड बनली. तीन वर्षे ऑलिम्पियाडमध्ये तिला यश मिळाले. 

गेल्या तीन वर्षांत तिने गणित व अलगॉरिथमवर भर दिल्याचेही सुप्रिया यांनी नमूद केले. आपला पाल्य अमूक एका संस्थेत शिकावा किंवा अगदी तो एमआयटीत जावा असे वाटत असते पण आम्ही कधीच तसा उद्देश ठेवला नव्हता. मुलांना काय आवडते ते ओळखायला शिका आणि त्यानुसार त्यांना मार्गदर्शन करा असेही त्यांनी आवर्जुन सांगितले.