परीक्षा आली, मुलांना टेन्शन देऊ नका....

परीक्षा म्हटलं की साऱ्यांचाच मनात धडकी भरते. या काळात मुलांवरचा मानसिक ताण प्रचंड वाढतोय. या ताणाची परिणती मानसिक स्वास्थ्य बिघड़ण्यामध्ये होऊ लागलीये.

Updated: Mar 16, 2013, 10:44 PM IST

www.24taas.com, कृष्णात पाटील, मुंबई
परीक्षा म्हटलं की साऱ्यांचाच मनात धडकी भरते. या काळात मुलांवरचा मानसिक ताण प्रचंड वाढतोय. या ताणाची परिणती मानसिक स्वास्थ्य बिघड़ण्यामध्ये होऊ लागलीये. परिणामी मानसोपचार तज्ज्ञांकडे पालक आणि विद्यार्थ्यांची गर्दी वाढत असल्याचं चित्र आहे... फेब्रूवारी उजाडला की विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये एक अनामिक भिती येते ती परीक्षेची...वर्षभर खेळीमेळीत गेल्यानंतर परीक्षा तोंडावर आल्या की अनेक विद्यार्थ्यांच्या मनावर एक प्रकारचा ताण येतो.
अभ्यास न करणे, अभ्यासात लक्ष न लागणे, अभ्यास कंटाळवाणा वाटणे, परीक्षेला न बसण्याची भाषा करणे, घरात चीडचीड करणे अशा वेगवेगळ्या त-हा विद्यार्थ्यांमध्ये पहायला मिळतात... त्यामुळं या काळात मानसोपचार तज्ञ्जांकडं विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा लोंढा लागलेला दिसतो. सध्या स्पर्धेच्या युगात लहान वयापासूनच मुलांवर घरातून, शाळेतून, क्लासेसमधून आणि इतर कलागुणांच्या क्लासेसमधून विविध गोष्टींचा भडीमार होतोय. यामुळं बिचा-या मुलांना मानसिक समस्यांना सामोरं जावं लागतंय.
परीक्षेच्या काळात पालकांनी काही गोष्टी ध्यानात ठेवणं गरजेचं आहे.परीक्षेचा जादा बाऊ करु नका, वारंवार अभ्यासाचा तगादा त्याच्यामागे लावू नका, मुलांना त्याच्या आवडीच्या गोष्टी करण्यासाठी मोकळं सोडा, घराला घर राहू द्या त्याचे इन्स्टिट्यूट करु नका, घरात आनंदाचे, प्रेमाचे वातावरण ठेवा. सध्या मुलाकडून असलेल्या अपेक्षांचे रुपांतर मागणीमध्ये होऊ लागल्यानं मुलांवर अतिरिक्त ताण येतोय. त्यामुळं पालक आणि शिक्षकांनी संयम ठेवून आणि मुलांचा कल लक्षात घेवून वागण्याची गरज आहे.