भाजपनं काय कमावलं, काय गमावलं?

मिशन 2014 हे लक्ष्य डोळ्यासमोर ठेऊन भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक मोठ्या गाजावाजात मुंबईत पार पडली खरी मात्र, या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या निमित्तानं भाजपातील दुफळीच प्रामुख्यानं समोर आली.

Updated: May 25, 2012, 07:34 PM IST

  www.24taas.com, अमित जोशी / मुंबई  

 

मिशन 2014 हे लक्ष्य डोळ्यासमोर ठेऊन भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक मोठ्या गाजावाजात मुंबईत पार पडली खरी मात्र, या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या निमित्तानं भाजपातील दुफळीच प्रामुख्यानं समोर आली. दुसरीकडे या बैठकीच्या निमित्तानं नरेंद्र मोदींची पक्षावरची पकड आणि गडकरींना अध्यक्षपदाची दुसऱ्यांदा मिळालेली संधी यामुळं भाजप कात टाकतोय हेही स्पष्ट झालं.

 

गेल्या दोन दिवसांपासून मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान संकुलात भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा वावर उत्साही होता. पेट्रोल दरवाढीचं इंधनही याला काही प्रमाणात कारणीभूत होतं. २०१४ सालच्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन पक्षातल्या बड्या नेत्यांचं एकत्रिकरण आणि शक्तिप्रदर्शन असाच या कार्यकारणीचा उद्देश होता. मात्र बैठकीच्या निमित्तानं ज्येष्ठ नेत्यांतले मतभेदच प्रामुख्यानं समोर आले.

 

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि संजय जोशी या वादाचे पडसाद या बैठकीत उमटले. अखेर जोशींच्या राजीनाम्यानंतर मोदी मुंबईत दाखल झाले. दुसरीकडे, संघाच्या आशिर्वादानं नितीन गडकरींचा दुसऱ्यांदा अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा झाला खरा. पण, प्रस्ताव पारित झाला तेव्हा गडकरींचे विरोधक गोपीनाथ मुंडे आणि लालकृष्ण अडवाणी हे दोघेही सभागृहात उपस्थित नव्हते. वादात सापडलेले कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा आले तेही दुस-या दिवशी. येताच त्यांनी मोदींना पंतप्रधानपदाचे दावेदार जाहीरही  करुन टाकलं. यातच भर म्हणून की काय दुसऱ्या दिवसाच्या समारोच्या सभेत लालकृष्ण अडवाणी आणि सुषमा स्वराज यांची अनुपस्थिती  चर्चेचा विषय ठरली. अर्थातच, भाजपच्या धुरिणांकडून मात्र असे कोणतेही मतभेद नसल्याची सारवासारव केली गेली. पण, काँगेसनं त्यांना मिळालेली ही संधी सोडली नाही. मनिष तिवारींची ‘भाजप ही मतभेदाची पार्टी आहे’ अशी टीका लागलीच ऐकायला मिळाली.

 

दुसरीकडे या निमित्तानं भाजपचं नवं युग सुरु झाल्याची नांदी या कार्यकारिणीत पहायला मिळाली. लालकृष्ण अडवाणी यांच्या एका दीर्घ युगाचा अंत आणि नितीन गडकरी पर्वाची सुरुवात, हे या कार्यकारिणीत प्रकर्षानं पहायला मिळालं. एनडीएच्या विस्ताराची कल्पना मांडून गडकरींनीही दुसऱ्या टर्मसाठी आपण तयार असल्याचं दाखवून दिलं. गुजरातमध्ये गेल्या १० वर्षांपासून अनभिषिक्त सत्ता उपभोगणारे नरेंद्र मोदी यांचं पक्ष आणि संघावरचं वर्चस्वही यानिमित्तानं जाणवलं. यानिमित्तानं मोदी येत्या काळात राष्ट्रीय राजकारणात सक्रीय होतील, असा संदेशही भाजपनं दिला. महागाई, घोटाळे आणि भ्रष्टाचारावरुन काँग्रेसप्रणित युपीए सरकारच्या विरोधात देशभर रान पेटवण्याची संधी भाजपकडे आहे, मात्र आपआपसातल्या कुरबुरी सोडल्या तरच ही संधी साधता येईल.