कोयना लेक टॅपिंग पुन्हा सरू

कोयनेचं पाणी पुन्हा एकदा उसळी घेणार आहे. होय, चौथ्या टप्प्यातील लेक टॅपिंगची तयारी पूर्ण झालीय. येत्या २५ एप्रिलला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कळ दाबून कोयनेच्या पाण्याखाली स्फोट घडवण्यात येणार आहेत.

Updated: Apr 19, 2012, 08:18 PM IST

www.24taas.com

 

कोयनेचं पाणी पुन्हा एकदा उसळी घेणार आहे. होय, चौथ्या टप्प्यातील लेक टॅपिंगची तयारी पूर्ण झालीय. येत्या २५ एप्रिलला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कळ दाबून कोयनेच्या पाण्याखाली स्फोट  घडवण्यात  येणार आहेत. लेक टॅपिंगच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पामुळे कोयना क्षेत्रातील दुष्काळी भागातील  पाण्याची गरज वीजनिर्मिती प्रभावित  होऊ न देता  भागवता येणार आहे.

 

१३ मार्च  २००९ रोजी घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती होणार आहे. २५ एप्रिल  २०१२... सकाळी ११ वाजता कोयनेचं पाणी पुन्हा एकदा उसळणार आहे. पाण्याखाली स्फोट  घडवून  जलाशयातील पाणी बोगद्यात  सोडण्यात येणार आहे...यालाच  लेक  टॅपिंग म्हणतात.  जितका  आकर्षक, तितकाच थरारक असा हा प्रयोग...कोयना प्रकल्पातील पाण्याचं नियोजन  तसेच  व्यवस्थापनाचा हा भाग  आहे. कोयना धरणाचा उपलब्ध पाणीसाठा १०५.२५ टीएमसी आहे. त्यापैकी २३ टीएमसी पाणी सिंचन तसेच इतर नागरी गरजांसाठी वापरले जाते. ६७.५ टीएमसी पाण्यावर वीजनिर्मिती चालते. कोयानातून १९६० मेगावॉट विजेची निर्मिती होते.  उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याची पातळी खाली जाते. अशा परिस्थितीत दुष्काळी भागाला पाणी पुरवायचं झाल्यास वीज निर्मिती खंडित होते. वीज आणि पाणी या दोन्ही गोष्टी साध्य करण्यसाठी लेक टॅपिंगचा पर्याय शोधण्यात आलाय. यावेळच्या लेक टॅपिंगमुळे सिंचनासाठी २० टीएमसी अतिरिक्त पाणी उपलब्ध होणार आहे. महत्वाच  म्हणजे या प्रयोगामुळे कोयानातील  वीजनिर्मिती अबाधित राहणार आहे.

 

यापूर्वी म्हणजे १९९९ मध्ये समुद्रसपाटीपासून ६१८ मीटरवर लेक ट्यापिंग करण्यात आलं होतं. यावेळी ६०६ मीटरवर लेक ट्यापिंग करण्यात येणार आहे.  त्यासाठी  सुमारे साडेचार किलोमीटरचा बोगदा तयार  करण्यात आलाय. जलविद्युत निर्मिती प्रकल्पाच्या जुन्या बोगद्याला हा नवीन  बोगदा जोडण्यात  आलाय. बोगद्याच व्यास साडे सहा मीटर आहे. पाणीसाठ्याच्या बाजूने तो साडेसात मीटर आहे. कोयानातील पाणी आणि बोगदा यामध्ये आता केवळ ५ मीटरचा खडक आहे. दोन ठिकाणी स्फोट घडवून  हा खडक फोडण्यात येणार आहे.  त्यासाठी दीड  टन स्फोटकं वापरण्यात येणार आहेत. हे सगळं करत असताना सुरक्षाविषयक कमालीची सतर्कता बाळगावी लागणार आहे.

 

दोन वर्षांच्या अथक परिश्रमानंतर लेक ट्यापिंग अंतिम टप्प्यात आहे. नॉर्वे च्या तंत्रज्ञाची मदत त्यासाठी घेण्यात आलीय. त्यवर सुमारे १० कोटींचा खर्च  करण्यात आलाय. लेक ट्यापिंगची  संपूर्ण तयारी झालीय. आता फक्त  कळ  दाबण्याचा अवकाश आहे. २५ एप्रिल ला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हा कार्यक्रम होणार आहे.