गृहकर्ज महागले !

होम लोन घेतांना घराच्या पूर्ण किंमतीच्या २० टक्के रक्कम ग्राहकांना भरावी लागायची. उरलेली रक्कम कर्जपुरवठा करणारी बँक गृहकर्जाच्या रुपात देत असे. पण आता गृहकर्ज घेतांना घराच्या किंमतीच्या २५ ते ३० टक्के रक्कम द्यावी लागणार आहे.

Updated: Feb 10, 2012, 03:08 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

घर घ्यायचं म्हणजे गृहकर्ज किंवा होमलोन घेणं ओघानं आलंच. होम लोन घेतांना घराच्या पूर्ण किंमतीच्या २० टक्के रक्कम ग्राहकांना भरावी लागायची उरलेली रक्कम कर्जपुरवठा करणारी बँक गृहकर्जाच्या रुपात देत  असे. पण आता गृहकर्ज घेतांना घराच्या किंमतीच्या २५ ते ३० टक्के रक्कम द्यावी लागणार आहे. घराची किंमत ठरवतांना  STAMP DUTY, REGISTERATION FEE आणि इतर कर वगळून आता घराची किंमत गृहकर्ज देताना ठरवली जाणार आहे. त्यामुळे या खर्चाची तरतूद आता घर घेणाऱ्या ग्राहकांनाच करावी लागणार आहे.

 

घर घेताना घराच्या किंमतीच्या २५ ते ३० टक्के रक्कम गृहकर्ज घेण्याआधीच तयार ठेवावी लागणार असल्यानं घराचं स्वप्न पाहणाऱ्या ग्राहकांच्या चिंतेत भरच पडली आहे. बँकांचे होमलोन देतानाचे निकष अधिकच कडक होत गेल्याने घर घेणं फारसं सोपं राहिलेलं नाही. त्यातच आता घराच्या किंमतीच्या २५ ते ३० टक्के ग्राहकांना उभारावी लागणार असल्यानं घरांच्या विक्रीत घट होईल अशी भीती प्रॉपर्टी मार्केटमध्ये व्यक्त होत आहे.

 

घर घेणं हे प्रत्येकाचं स्वप्न असलं तरी ते प्रत्यक्षात येतांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. घर घेणारा प्रत्येक जण याचा थोडयाफार प्रमाणात का होईना अनुभव घेतोच, त्यात आता अधिकच भर पडेल अशी चिन्ह आहेत.