जरबेराची शेती फायद्याची !

Last Updated: Friday, November 25, 2011 - 08:39

झी २४ तास वेब टीम, पुणे

 

शेती करतांना बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन जर शेतात पीक घेतले तर निश्चितच त्याचा फायदा होतो. फुलशेतीच्या बाबतीत तर हे सूत्र अगदी तंतोतंत लागू पडतं. २००५ सालापासून पुणे जिल्ह्यातल्या तळेगांव दाभाडे इथं फुलशेती करणारे विजय पाटील या शेतकऱ्यानं उत्पादन आणि विक्रीचा मेळ साधून चांगलं उत्पादन घेतलंय. विजय पाटील हे पुणे जिल्ह्यातील तळेगांव दाभाड इथले कृषी विभागातील माजी फलोत्पादन संचालक आहेत. निवृत्त झाल्यानंतरही विजय पाटील यांनी सातत्याने कामाची आवड जोपासली. त्यांनी आदर्शवत अशी ग्रीनहाऊस तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जरबेराची लागवड केलीय. स्वतःची जमीन नसल्याने शासनाची साडे तीन एकर जमीन ३० वर्षासांठी साडे आठ लाख रुपयांचा करार करुन त्यांनी फुलशेतीचं नियोजन केलं. ७० गुंठ्यावर २० गुंठ्याचे तीन ग्रीन हाऊस आणि १० गुंठ्यांचं एक अशा ४ ग्रीनहाऊसेसच्या माध्यमातून विजय पाटील यांनी जरबेरा फुलांचं ग्रीन हाऊस उभारलंय. सध्या त्यांच्याकडे सर्व प्रकारच्या जरबेराच्या फुलांची लागवड झालीय.

 

सवाना(लाल),सांग्रीया(लाल),दानाईलम(पिवळा),गोलियथ(भगवा),रोझोलीन (गुलाबी), बॅलंस(व्हाईट), इंटेन्स (डार्क गुलाबी),मलिबू (राणी कलर) ड्युन (केशरी बायकलर), विंटरविना (व्हाईट) या जरबेरा फुलांची लागवड शास्त्रोक्त पद्दतीने केलीय.

 

जुलै आणि ऑगस्ट महिन्यांत लागवड करतांना रोपांची मुळे कार्बेंडेझीम ०.१ टक्के या बुरशीनाशकाच्या द्रावणात बूडवून लागवड केली. शेणखताबरोबरच रासायनिक खतांमध्ये बेसल डोस २०:२०:१५ दिलं गेलंय. त्यानंतर पहिले तीन महिन्यांसाठी १०:१५:२० तर चौथ्या महिन्यात १५:१०:३० या प्रमाणात विद्राव्य खते दिली आहेत. जरबेराची कायिक वाढ लक्षात घेऊन पाणी आणि खतांचा समतोल अभ्यासपूर्वक साधल्याने कीड रोगाचा प्रादुर्भाव विजय पाटील यांना तितकासा जाणवत नाही. मात्र वातावरणातील अचानक बदल झाला तर नुकसान होते. त्यामुळे प्रतिबंधात्मक काळजी घेतली जाते. मूळकूज आणि खोडकूज या रोगाच्या नियंत्रणासाठी कॅप्टन, बेनोमिल, नागअळीसाठी क्लोरोपायरीफॉस, असिफेट,  फुलकिडीसाठी इमिडाक्लोप्रिड आणि असिटेम्प्रिड या कीड आणि रोग नाशकांचा वापर होतो.

 

लागवडी नंतरच्या चोख व्यवस्थापनेनंतर फुलांची काढणी तीन महिन्याने होते. विजय पाटील यांच्या चार ग्रीन हाऊसमध्ये साधारण ६००० फुलांची लागवड आहे. या फुलांसाठी साधारण १ रुपया खर्च येतो. फुलांचा भाव हा नोव्हेंबर ते मे पर्यंत ६ ते ७ रुपयांदरम्यान असतो मात्र वर्षभराची सरासरी काढली तर  २ ते अडीच रुपये इतका दर विजय पाटील यांना मिळतो. एकंदरीत वर्षभरासाठी ३८ ते ४० लाख रुपये खर्च येत असून उत्पादन खर्च वजा जाता १८ ते २० लाख रुपयांपर्यंत त्यांना उत्पन्न मिळतं. एकदा लागवड केल्यानंतर पुढे फुलांची काढणी दीड ते दोन वर्ष चालते. जरबेराला पुणे, मुंबई, राजकोट, दिल्ली या बाजारपेठेतून चांगली मागणी असल्याने विजय पाटील यांनी अनेक शेतकऱ्यांना या व्यवसायासाठी प्रवृत्त केलंय. शेती व्यवसायात उत्पादन खर्च आणि शेतीमालाला मिळणार भाव याचा अंदाज घेतला, तर भांडवली खर्च अधिक असणारी जरबेराची शेती मात्र नक्कीच परवडणारी आहे हेच यावरुन सिध्द होतं

First Published: Friday, November 25, 2011 - 08:39
comments powered by Disqus