Zeenews logo
English   
Sunday, May 19, 2013 
Search
Follwo us on: Facebook Follwo us on: Twiter Follwo us on: google+ RSS Mail to us Mail to us

तहाची 'राज'नीती

Friday, April 13, 2012, 18:43
Comments 0
 
टॅग्स::
www.24taas.com, मुंबई
 
राज ठाकरेंनी गुरुवारी मालेगावात मोठ्या आवेशात बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना आव्हान दिलं होतं. त्यामुळं मुंबईत आयोजित बिहार दिनाच्या कार्यक्रमाचं काय होणार असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. पण राज यांनी दिलेल्या आव्हानाला चोवीस सातही उलटले नाही त्यापूर्वीच त्यांनी आपला विरोध मागे घेतला..कसं झालं हे मतपरिवर्तन ?
 
मुंबईत होऊ घातलेल्या बिहार दिनाला गुरुवारी  कडाडून विरोध करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अवघ्या 24 तासात आपली भूमीका बदललीय. राज यांचा विरोध अचानकपणे  मावळल्यामुळं राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केलं जातंय...गुरुवारी मालेगावात राज ठाकरेंनी एका जाहिर सभेत बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमारांना मुंबईत बिहार दिन साजरा करुनच दाखवाच असं थेट आव्हानचं दिलं होतं. त्यामुळं राज्य़ातील वातावरण चांगलच ढवळून निघालं होतं.
राज ठाकरे विरुद्ध नितिशकुमार असा राजकीय संघर्ष पेटण्याची चिन्ह निर्माण झाली होती. मात्र कार्यक्रमाच्या आयोजकांनी शुक्रवारी कृष्णकुंजवर जाऊन मनसेप्रमुखांची भेट घेतली आणि त्यानंतर बिहार दिनाला असलेला मनसेचा विरोध मावळला. बिहार राज्याच्या निर्मितीला शंभर वर्षपूर्ण झाल्याच्या निमित्ताने 15 एप्रिलला मुंबईत विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. या कार्यक्रमाला बिहारचे मुख्यमंत्री नितिशकुमार उपस्थित राहणार आहे. मात्र हा कार्यक्रम होण्यापूर्वीच वादात सापडला होता. कारण नितीशकुमार आणि राज ठाकरे यांच्यात शाब्दिक युद्ध रंगलं होतं. पण  24 तासाच्या आत या दोन नेत्यांमधील वाद शमला. खरं तर तसे संकेत शुक्रवारी नितिशकुमारांच्या वक्तव्यातून मिळाले होते. मुंबईत बिहार दिन साजरा करुन दाखवाच असं राज यांनी आव्हान दिल्यानंतरही नितिशकुमारांनी एक पाऊल  मागे घेत मवाळ भूमीका घेतली होती.
 
नितीशकुमारांनी आपली भूमिका सौम्य़ केल्यानंतर राज ठाकरेंनीही एक पाऊल मागे घेत रविवारी होऊ घातलेल्या बिहार दिनाच्या कार्यक्रमाला हिरवा कंदील दाखवला.
 
बिहार दिनाचा कार्यक्रम हा अराजकीय असल्याचं आयोजकांनी सांगितल्यानंतर राज यांनी कार्यक्रमाला असलेला विरोध मागे घेतला.गैर समजातून हा वाद रंगल्याचं आयोजकांकडून स्पष्टीकरण देण्य़ात आलंय. मात्र हा वाद इतक्या लवकर पण्यामागे काही  वेगळी राजकीय कारणं तर नाही ना अशी शंकाही व्यक्त केली जात आहे.
 
बिहार दिनाच्या मुंबईतील कार्यक्रमाला मी उपस्थितीत राहणारच. देशातील कुठल्याही भागात मी जाऊ शकतो त्यासाठी मला व्हिसाची गरज नाही, मुंबईत जायला मला कुणाच्या व्हिसाची गरज नाही असं वक्तव्य  बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार  यांनी केल खरं, पण त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात बरीच खळबळ उडाली होती. प्रत्येक  पक्षाने आपआपल्या राजकीय सोईप्रमाणे भूमिका घेतली. तसेच एकमेकांचं उट्टे काढण्याची संधीही या निमित्ताने साधलीय.
 
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या याच वक्तव्यामुळंच महाराष्ट्रात नवं राजकीय वादळ घोंगावू लागलं होतं.....पुन्हा मराठी विरुद्ध परप्रांतिय असा संघर्ष पेटणार तर नाही ना ? अशी शंका व्यक्त केली जात होती...मराठीचा मुद्दा घेऊन जन्माला आलेली शिवसेना नितीशकुमारांच्या त्या वक्तव्यावर कोणती भूमिका घेतेय याकडं सर्वांच लक्ष लागून राहिलं होतं...पण भाजपशी असलेल्या युतीच्या राजकीय अपरिहार्यतेमुळे शिवसेनेनं याप्रकरणी मवाळ भूमिका घेतली...मात्र भाजपलाही टार्गेट करण्याची संधी शिवसेना नेत्यांनी सोडली नाही..
 
बिहारमध्ये भाजपची नितीशकुमारांशी युती असल्यामुळे नितीशकुमारांना थेट टर्गेट करण्याची राजकीय खेळी शिवसेनेला खेळता आली नाही..पण  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं  थेट नितीशकुमारांनाच आव्हान दिल्यामुळं राजकारण तापणार अशी शक्यता वर्तवली जात होती..
 
 
नितीशकुमारांच्या वक्तव्यावर दोन्ही ठाकरे बंधूनी वेगवेगळी भूमिका घेतली असली तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी मात्र बिहार दिनाचं समर्थन केलं होतं....
 
 
बिहार दिनाच्या निमित्ताने वाद रंगला खरा...मात्र तो जास्त ताणला गेला नाही...नितीशकुमारांना आव्हान देणारे राज ठाकरे यांचा विरोध चोवीस तासही टिकला नाही...बिहार दिनाच्या निमित्ताने सांस्कृतीक कार्यक्रमाचं आयोजन केलं जाणार असेल तर आपला त्याला विरोध असणार नाही असं सांगत   मनसेप्रमुखांनी नवी भूमिका मांडली...
 
बिहार दिनाच्या कार्यक्रमाविरोधात मनसेनं रणशिंग फुंकलं होतं...पण एका फोनमुळं सगळा विरोध मावळला. या प्रकरणात सगळ्याच राजकीय पक्षांनी आपआपल्या पद्धतीने खेळी खेळण्याचा प्रयत्न केला....पण मनसेच्या खेळीने सर्वानाच धक्का दिला होता...
 
बिहार दिनाच्या मुद्द्यावरुन वाद सुरु झाला....इतर राजकीय पक्षांनी याप्रकरणी  भूमिका स्पष्ट करावी असा स्टँड शिवसेनेनं घेतला...पण त्यानंतर मनसेनं थेट नितीशकुमारांना आव्हान देत सगळ लक्ष आपल्याकडं वेधून घेतलं... या सगळ्या घडामोडीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे या प्रकरणाचं केंद्र बनले...हे नाकारता येणार नाही..

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी बिहार दिनाच्या वादात जोरदार फटकेबाजी करत संपूर्ण देशांच लक्ष पुन्हा एकदा आपल्याकडे वेधून  घेण्यात यश मिळवलंय..कोणत्या वेळी कोणतं वक्तव्य करायचं याची राज ठाकरे यांना चांगलीच जाण आहे...बिहार दिनाच्या वादातही त्यांनी तेच केलं... खरंतर बिहार दिनाच्या वादाची सुरुवात  नितीशकुमार यांनी केली..पण  नितीशकुमारांच ते वक्तव्य  राज यांच्यासारख्या कसलेल्या फलंदाजासाठी  फुलटॉस ठरला ...आणि त्यांनी नेहमीप्रमाणे  त्यावर षट्कार खेचला....राज ठाकरेंच्या मालेगावातील त्या भाषणामुळे थेट राष्ट्रीय पातळीवर याची चर्चा सुरु झाली....पण या सगळ्या वादात समजावादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनीही महत्वाची भूमिका बजावली आहे...त्यांनी थेट राज ठाकरेंच्या अटकेची मागणी केली होती..
 
बिहार दिनाच्या वादाला  अबू आझमींनी फोडणी दिल्यामुळे त्यावर राज ठाकरे तिखट प्रतिक्रीया देणार हे उघडच होतं..कारण मनसे आणि आबू आझमी यांच विळ्याभोपळ्याचं नात सर्वश्रूत आहे...
 
नितीशकुमारांना थेट आव्हान देत राज ठाकरेंनी  अबू आझमींवरही जोरदार टीका केली..परप्रांतीयांविषयी मनसेची भूमिका त्यांनी पुन्हा एकदा आधोरेखीत केली...सांस्कृतीक कार्यक्रमाच्या नावाखाली अशा कार्यक्रमातून  राजकीय अजेंडा राबविला जात असून तो खपवून घेतला जाणार नसल्याचं सांगत  राज ठाकरेंनी उपस्थितांकडून टाळ्या वसूल केल्या....
.मालेगावच्या त्या भाषणामुळं वातावरण चांगलचं ढवळून निघालं होतं....बिहार दिनाचा मुद्दा राजकीय हुशारीने हाताळून  राज ठाकरे या प्रकरणाच्या केंद्रस्थानी राहण्यात यशस्वी झालेत
 
बिहार दिनाच्या मुद्यावरुन राज ठाकरेंनी एक पाऊल मागे घेतल्यामुळं विरोधकांनाही टीका करण्याची आयतीच संधी चालून आलीय.. हे फिक्सिंग होतं अशा शब्दात शिवसेनं टीका केलीय..पण खरंच हे फिक्सिंग होतं की यामागे राजकीय अपरिहार्यती होते ?
 
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी थेट बिहारच्या मुख्यमंत्र्यांनाच आव्हान देत नवा वाद अंगावर ओढून घेतला खरा पण काही तासातच त्यांनी इरादा बदलला...राज ठाकरेंनी अचानकपणे आपली भूमिका का बदलली? त्यांनी ती स्वताहून बदलली की राजकीय अपरिहार्यतेमुळं तो निर्णय त्यांना घ्यावा लागला असे अनेक तर्क वितर्क लावले जातायत...
 
राज ठाकरेंच्या आजवरच्या राजकीय वाटचालीवर नजर टाकल्यास त्यांनी यापूर्वी कधीही एखाद्या  मुद्द्यावरुन सहजासहजी  माघार घेतलेली नाही... रेल्वे भरती परिक्षेच्या मुद्दावरुन मनसेनं मोठं आंदोलन  केलं होतं..तसेच मराठी पाट्या आणि परप्रांतिय टॅक्सी चालकांच्या विरोधातील आंदोलनामुळे मनसेला मोठी प्रसिद्धी मिळाली...गेल्या काही वर्षात मनसेची आंदोलनं पहाता बिहार दिनाच्या मुद्यावर केलेल्या घुमजावामुळे शिवसेनाला टीका करण्याची आयतीच संधी मिळालीय..

राज ठाकरेंच्या घुमजावा मागे मनसेची भाजपशी असलेली जवळीक कारणीभूत असल्याचं बोललं जातंय..गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्याशी राज ठाकरेंचे मैत्रीचे संबंध आहेत...शिवसेना-भाजप युतीत मनसेला सहभागी करुन घ्यावं या विचाराचा एक गट भाजपात आहे...शिवसेनेच्या विरोधामुळं तो विचार मागे पडला खरा पण महापालिकेच्या निवडणुकीनंतर भाजप आणि मनसे यांची चांगलीच गट्टी जमलीय.. नाशिकसह अनेक ठिकाणी हे दोन्ही पक्ष सत्तेसाठी एकत्र आले आहेत... भाजपशी असलेल्या मैत्री खातरच राज ठाकरेंनी  बिहार दिनाच्या वादावर पडदा तर टाकला नाही ना ? अशी शंका व्यक्त केली जात आहे...नितीशकुमारांना दुखावल्यास भाजप अडचणीत येईल आणि आपला मित्र अडचणीत येवू नये यासाठीच राज ठाकरेंनी एक पाऊल मागे घेण्याचा निर्णय़ घेतला असावा असा राजकीय जाणकारांना वाटतंय...एकीकडं भाजपशी मनसेचे असलेल्या मैत्रीच्या संबंधांना या वादाशी जोडून पाहिलं जात आहे तर दुसरीकडं राष्ट्रवादी काँग्रेसवरही राजकीय जानकारांकडून अंगुलीनिर्देश केला जातोय..
राज ठाकरेंच्या राजकीय खेळीमागचं कारण सांगण कठीण असलं तरी त्यांच्या खेळीने राजकीय जानकारांना चांगलचं चकीत केलीय..

First Published: Saturday, April 14, 2012, 07:56

प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

नाव:
ठिकाण:
ई-मेल आयडी:
प्रतिक्रिया: