दुष्काळ हा मानवनिर्मितच....

दुष्काळ हा निसर्गनिर्मित नसून मानवनिर्मित असल्याचं मत ज्येष्ठ जलतज्ञ आणि वॉटर बॅंकेचे निर्माते अरूण देशपांडे यांनी व्यक्त केला आहे. पावसाच्या पाण्याचं योग्य नियोजन केल्यास आणि प्रत्येक गावात वॉटर बँक सुरू केल्यास कधीच दुष्काळ भासणार नाही.

Updated: May 10, 2012, 04:55 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

दुष्काळ हा निसर्गनिर्मित नसून मानवनिर्मित असल्याचं मत ज्येष्ठ जलतज्ञ आणि वॉटर बॅंकेचे निर्माते अरूण देशपांडे यांनी व्यक्त केला आहे. पावसाच्या पाण्याचं योग्य नियोजन केल्यास आणि प्रत्येक गावात वॉटर बँक सुरू केल्यास कधीच दुष्काळ भासणार नाही असा दावा त्यांनी केला आहे.

 

मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात दुष्काळाचा प्रश्न गंभीर बनला आहे. हा दुष्काळ बराचसा मानवनिर्मित असल्याचं जलतज्ज्ञ सांगतात. पावसाचं बरचसं पाणी आपण वाया घालवतो, तेच पाणी व्यवस्थित साठवून ठेवलं तर दुष्काळावर मात करता येईल. त्यासाठी  वॉटर बॅंकेचा उत्तम पर्याय आहे. यातून १०० कुटुंबं दुष्काळातही योग्य रितीनं शेती करतील आणि पाणीही मिळेल हे वॉटर बँकेच्या प्रयोगातून सिद्ध झालं आहे.

 

शेतकऱ्यांनी वॉटर बॅंक  महिलांच्या नावावर करून,  ज्या तऱ्हेनं बचत गट चालवतात त्याप्रमाणे वॉटर बँक काढाव्यात. या बॅंकेत महिलांना ठराविक जागी पाणी बॅंकेत डिपॉझीट करण्याची मुभा दिल्यास  दुष्काळावर मात करता येईल. महाराष्ट्रातील काही भाग दुष्काळानं होरपळून निघत असताना निसर्गानं  दिलेल्या संपत्तीचं आपणही देणं लागतो हे विसरून चालणार नाही.