नितीश ठाकूरकडे एवढा पैसा आला कसा?

Last Updated: Friday, March 23, 2012 - 18:33

दिनेश मौर्या, www.24taas.com, मुंबई

 

काळ्या संपत्तीचा कुबेर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नितीश ठाकूरनं कशा प्रकारे अब्जावधींची माया जमवली याचा खुलासा  झालाय. एसीबी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ठाकूरनं ही काळी संपत्ती राज्य महसूल विभागात उपजिल्हाधिकारी असताना जमा केली.

 

शासकीय सेवेत नितीश ठाकूर हा रायगडच्या आणि मुंबईच्या एसआरएच्या उपजिल्हाधिकारीपदी, राज्य गृहनिर्माण विभागाच्या स्वीय सचिव म्हणून काम केलंय. महसूल विभाग आणि एसआरएमध्ये असतांना नितीश ठाकूर याची ओळख मुंबईच्या दोन बड्या  बिल्डरांशी झाली. आपल्या पदाचा गैरवापर करून आरोपी ठाकूरनं या दोन बिल्डरांना मुंबई आणि रायगडमध्ये स्वस्तात जमीन मिळवून दिली. त्याच्या मोबदल्यात नितीश ठाकूरला कोट्यवधी रुपये मिळाले. त्यातही एका बिल्डरला रायगडमध्ये ७०० एकर जमीन मिळवून दिल्यानंतर ठाकूरला  घसघशीत २५० कोटींची लाच मिळाली.

 

नितीश ठाकूरने रायगडमध्ये उपजिल्हाधिकारी असताना जमिनीच्या नोंदीमध्ये हेरीफेरी केली आणि आपल्या सहकाऱ्यांनाही करण्यास भाग पाडलं. पोलीस तपासात ठाकूरचे हे कारनामे आता उघड होऊ लागलेत. अशाप्रकारे जमिनीच्या नोंदीत हेराफेरी करून ठाकूरनं जमीन बिल्डरांच्या घशात घातली. जमिनीच्या प्रत्येक डीलनंतर ठाकूरला कोट्यावधी रुपये मिळायचे.

 

हा ब्लॅकमनी व्हाइट करण्यासाठी ठाकूरनं लकी एंजेल्स कंपनीत आपल्या नातेवाईकांच्या नावानं गुंतवणूक केली. पोलिसांना ठाकूरच्या या दोन बिल्डरांशी असलेल्या या संबधांची माहिती मिळाली आहे. पोलीस लवकरच पोलीस या दोन्ही बिल्डर्सना चौकशीसाठी बोलवणार आहेत. एकूणच ते दोन बिल्डर कोण आहेत ? हे दोन्ही बिल्डर्सही एसीबीच्या गळाला लागणार का  ? या प्रश्नाची उत्तरं येणाऱ्या काही दिवसांत समोर येतील, तेव्हा ठाकुरच्या कारनाम्यांत आणखी कोण-कोण साथीदार आहेत याचाही छडा लागण्याची शक्यता आहे.

 First Published: Friday, March 23, 2012 - 18:33


comments powered by Disqus