मंदिर नावाचे मार्केट…, market of temple`s

मंदिर नावाचे मार्केट…

मंदिर नावाचे मार्केट…
www.24taas.com, मुंबई

प्रत्येकाच्या मनात एक देव असतो.. श्रद्धाळूच्या मनातल्या देवाला एक नाव असतं.. त्य़ाचा आकार असतो.. आणि असलच तर त्याच मंदिरही असत.. तर जे कामावर विश्वास ठेवतात त्याचा फक्त काम हेच निराकार दैवत असत.. पण तत्वज्ञान कितीही सांगल तरी या क्षणाला समोरची आकडेवारी ही मंदिरातल्या देवाला आणि देवाच्या श्रीमंतीला ठसठसशीतपणे प्राधान्य देणारी आहे.. कधी काळी शांततेच स्थान असणारी मंदिर आता मात्र गजबजाट आणि कोलाहलात पुरती हरखून गेलीय.. खरा भक्त आणि देवातलं अंतर हळूहळू दूर होत चाललय.. व्हीआयपी रांग आणि सोन्याचे नवस वरचढ होऊ लागलेत.. दानदक्षिणेमागे शुद्ध हेतू असतो.. पण त्याचा विनियोग शुद्ध हेतून होतो का याचच विचरमंथन करणारा आहे आजचा प्राईम वॉच ‘मंदिर नावाचे मार्केट…’दिवसागणिक देशातल्या प्रत्येक मंदिरातली दानपेटीत दान वाढत जातंय. मंदिराच्या या दानपेट्यात श्रद्धेपोटी दिलं जाणारं दान वाढत चाललय. या साऱ्या गोष्टीला निमित्त एवढच की, शिर्डीत एका भक्तानं साईच्यां चरणी ३२ लाख रुपये किंमत असणारा सोन्याचा कलश अर्पण केलाय आणि या बरोबरच साईंच्या सुवर्ण खजिन्यात आणखीनच वाढ झालीय. भारतात सुमारे १०० मंदिर अशी आहेत की ज्यांची वार्षिक दानाची रक्कम ही सरकारच्या एका योजनेच्या निधी एवढी असेल. या मंदिराच्या सांपत्तिक स्थितीवर नजर टाकली तर हे सहज लक्षात येईल.

 पद्मनाभस्वामी मंदिर - एक लाख कोटीचा खजिना

 तिरुपती बालाजी - ५० हजार कोटीचा खजिना

 वैष्णो देवी - वार्षिक दान ५०० कोटी

 शिर्डी साईं संस्थान - वार्षिक दान २०० कोटी

प्रत्येकाचे श्रद्धेचे आयाम हे वेगवेगळे असतात. त्याची श्रद्धाही आपल्या दैवताप्रती निस्सीम असतात. पण भक्त आणि दैवत यांच्यामध्ये कोणीतरी आहे त्यावरच आपण या भागात बोलतोय. शिर्डीच्या एका साईभक्तानं साईंच्या चरणी एक किलो सोन्याचा एक कलश अर्पण केलाय. सोन्याचा या कलशाची किमत ३२ लाख एवढी आहे. दान देणाऱ्या या साईभक्तानं आपली ओळख गुप्त ठेवली असली तरी या निमित्तान दान-दक्षिणेच्या प्रश्नावर पुन्हा एकदा सगळ्यांच लक्ष वेधलय.

सोन्य़ाचा हा कलश शिर्डीच्या साईबाबांच्या चरणी एका भक्तानी अर्पण केलाय. अंदाजे एक किलो वजनाच्या या कलशाची किमत ३२ लाख रुपये एवढी आहे. साईबाबांवर निस्सीम विश्वास असणाऱ्या या भक्तानं साईंच्या आरतीवेळी हा कलश अर्पण केलाय. पण असं असल जरी तरी एवढ मोठी वस्तु अर्पण करणाऱ्या या भक्तानं आपलं नाव जाहीर करण टाळलंय. असं म्हटलं जातंय की हा भक्त दिल्लीचा रहिवासी आहे आणि आपली मनोकामना पूर्ण झाली म्हणून त्यानं ही नवसपूर्ती केलीय. ही पहिलीच वेळ नाहीय़ की ज्यावेळी शिर्डीच्या साई बाबांना अशी मौल्यवान भेट अर्पण झालीय. जगभरातल्या असंख्य भक्ताची श्रद्धा साईंच्या चरणी एवढी लीन आहे की म्हणूनच ते बाबांच्या चरणी सोन्याचांदीचे दागिने अर्पण करत आहेत. शिर्डीचे साई मंदिर हे देशातलं एक श्रीमंत मंदिर मानल जातं. साईंच्या चरणी येणारे भाविक वर्षाला सुमारे २०० कोटींची दान अर्पण करतात. शिर्डीच्या मंदिराचे व्यवस्थापन साई बाबा संस्थान ट्रस्टच्या वतीनं करण्यात येतं. पण, जमा झालेला साईभक्तांचा पैसा योग्य वापरला जात नाही, अशी तक्रार साई भक्तच करत असतात. भक्तांचा हा आकडा दिवसेंगणिक वाढत चाललाय. जगभरातल्या श्रीमंत देवस्थानात ज्याची गणना होते त्या शिर्डीच्या साईमंदिरात भक्तही बाबांच्या चरणी यथाशक्ती दान देतात. सुरुवातीला पैशात असणार दान-दक्षिणा आता सोन्या-चांदीच्या वस्तूत दिसू लागलीय.

साल २०११-१२ मध्ये शिर्डी साई संस्थान ट्रस्टला २०६ कोटींचा फायदा झाला होता. गेल्या वर्षी शिर्डी साई संस्थान ट्रस्टच्या तिजोरीत २७३ कोटी रुपयांची भर पडली होती. ३१ मार्च २०१२ पर्यंत शिर्डी संस्थान ट्रस्टकडे ५० कोटी ५३ लाख रुपयांचे दागिने जमा असल्याची नोंद होती. साई भक्तांनी दिलेल्या दानामुळे विविध बँकांमध्ये ६३८ कोटींचं डिपॉझिट जमा झालंय. त्याचप्रमाणे ३२७ किलो सोनं आणि ३२०० किलो चांदीही जमा झालीय. साई भक्तांच्या या पैशाचा आणि सोन्या-नाण्याचा अधिकार ट्रस्टकडे आहे. ज्यावर आता राजकारण्यांचा शिरकाव झाल्याचा आरोप साईभक्त करत आहेत. त्याचप्रमाणं साईभक्तांच्या या दानाचा विनीयोग योग्य होत नसल्याची तक्रारही वारंवार करण्यात येतेय. अर्थात आक्षेप काहीही असले तरीही शेवटी सर्वाधिकार हे ट्रस्टकडे आहेत. त्याबरोबरच साईंच्या चरणी आलेला साईभक्ताचा पैसा हा साईभक्तांसाठी वापरावा, ही मागणीही काही वावगी नाहीय, हे मात्र नक्की.
मंदिर नावाचे मार्केट…

कर्नाटकमधल्या पद्मनाभ मंदिराचा खजाना

जाणकारांच्या म्हणण्यानुसार शिर्डीमध्ये साईंच्या चरणी प्रत्येक वर्षाला अंदाजे २०० कोटीची दान अर्पण करतात. पण असं असली तरी श्रीमंत देवस्थानातल मोजदाद न होताही सर्वात अव्वल स्थानावर आहे ते पद्मनाभ स्वामी मंदिर... असं म्हटलं जातंय, की या मंदिरात आत्तापर्यंत मिळालेली संपत्ती जरी वापरली तरी केरळचा चेहरामोहरा एका दिवसात बदलू शकणार आहे.

केरळचे पद्मनाभस्वामी मंदिरातील केवळ चार तळघरातं सापडलेल्या खजिन्याची किमत सुमारे एक लाख करोडच्या वर जावून पोहोचल्याचा अंदाज वर्तवण्यात येत होता. अर्थात याची सरकारी आकडेवारी समोर आली नसली तरी प्राथमिक अंदाजच डोळे चक्रावणारा आहे. ही एवढी मोठी संपत्ती आहे की कुठल्याही राज्याचा यामुळे चेहरामोहरा बदलू शकतो. पद्मनाभ देवस्थानची आतापर्यंत समोर आलेली संपत्तीची आकडेवारी पाहता एकट्या केरळच्या माथ्यावर असलेला ५६ हजार कोटींचं कर्ज दोन वेळा चुकतं करता येईल. केरळबरोबर पाँडीचेरी सिक्कीम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, मिझोराम, नागालॅंड, मणीपूर, गोवा, त्रिपूरा, उत्तराखंड, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, झारखंड, आणि जम्मू काश्मीर या राज्यांवरील कर्ज पद्मनाभच्या संपत्तीतूनच एका वेळेस पूर्ण करता येईल. पद्मनाभच्या या संपत्तीवर निंयत्रण कोणाचं असावं यावरुनही आता वादंग सुरु झालंय. केरळच्या साडेतीन कोटी जनतेचा विचार करणंही यानिमित्तानं महत्वाचं ठरतंय. केरळच्या प्रत्येक कुटुंबाला दीड ते दोन लाख रुपये दिले जाऊ शकतात. ४० हजार कोटी बजेट असणारं मनरेगाचे दोन वर्षाचे अंदाजपत्रकासाठी निधी देता येईल. देशाच्या शेतकऱ्यांवर असणारे ७२ हजार कोटींचे कर्ज माफ करता येईल. याच संपत्तीमधून २० हजार किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग बांधले जावू शकतात. ५०० मेगावॅटचे ५०० विद्युतप्रकल्प उभारुन घराघरात विजेचा प्रकाश खेळवला जाऊ शकतो. एम्ससारखी व्यवस्था असलेले २००० कोटीचे ५० वर्ल्डक्लास सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलची बांधणी करता येईल. देशातल्या प्रत्येक राज्यात आयआयटीसारखं एक इंजिनियरींग कॉलेज बनवलं जाऊ शकता. दोन वर्षापूर्वी एम्सचे एकूण बजेट ७०० कोटी आणि ७ आयआयटीचे बजेट दीज हजार कोटी होते. यावरुन तुम्ही अंदाज लावू शकता की पद्मनाभस्वामी मंदिराच्या एक लाख करोड संपत्तीवरुन देशाचा चेहरामोहराच बदलू शकतो. आता गरज आहे ती संपत्ती ज्यांच्या हातात आहे त्यांनी देवासारखं वागण्याची.

मंदिर नावाचे मार्केट…

श्रीमंत तिरुपती बालाजी

श्रीमंत देवस्थानाचा उल्लेख आणि त्यात तिरुपतीचा उल्लेख नाही असं कस होईल. तिरुपती बालाजीचे मंदिरही श्रीमंत देवस्थानामध्ये अग्रभागी आहे. तिरुपतीच्या या मंदिराला प्रत्येक वर्षी करोडो रुपयांची दान-दक्षिणा दिली जाते. भगवान विष्णुचा अवतार आणि तिरुपतीचे भगवान बालाजी हे श्रीमंत देवापैकी एक मानले जातात. बालाजीचा हा खजिना राजा महाराजांच्या संपत्तीच्या वरचढ ठरणारा आहे. दुसऱ्या शतकात बनलेल्या या मंदिराची संपत्ती ही ५० हजार कोटींहून अधिक संपत्ती असल्याचे बोललं जातंय. हा आकडा म्हणजे भारताच्या वार्षिक बजेटचा ५० वा हिस्सा आहे. वेगवेगळ्या बॅंकांमध्ये मंदिराचे सुमारे ३००० किलोचे सोनं जमा आहे आणि केवळ याच्याच व्याजावरुन मंदिराची कमाई होते. या व्यतीरिक्त मंदिराच्या नावे १००० कोटीचे फिक्स डिपॉझीटही जमा आहे, हे विशेष. भगवान बालाजीकडे या व्यतिरिक्त १५ सोन्याचे मुकूट आहेत, ज्याची किमत काही कोटींच्या घरात आहे. बालाजीच्या दर्शनासाठी रोज ५० हजार ते १ लाखापर्यंत भाविक हे तिरुपतीला येत असतात. नवरात्रीच्या दिवसात हा आकडा कैक पटीनं वाढत जातो. आपल्याला देवानं भरपूर दिलंय. या हेतुनेच भक्त तिरुपतीला दान करतात. नवरात्रीच्या दिवशी देवाच्या चरणी सुमारे १२-१५ कोटींची दक्षिणा जमा होते. भगवान वेकेटेश्वरला प्रत्येक वर्षी अंदाजे ३५० किलोग्रॅंम सोना आणि ५०० किलो चांदी अर्पण केली जाते. मंदिराच्या विश्वसांनी या दागिन्यांचा विमाही काढलाय. मंदिरात जमा होत असलेली दक्षिणा गोळ्या करण्यासाठी कर्मचाऱ्यांचं मोठं सैन्य आहे. पैसे मोजण्यासाठी अनेक लोक तैनात आहेत आणि या सगळ्यांना एक क्षणही फुरसत नसते. भक्तांचा विश्वास आहे की बालाजीच्या दरबारात येणाऱ्या प्रत्येकाची मनोकामना पूर्ण होते. याच विश्वासातून भक्तानी लोकाला श्रीमंत बनवलंय आणि हाच विश्वास भक्तांच्या देवाला दिवसेंदिवस श्रीमंत बनवतोय.


व्हिडिओ पाहण्यासाठी - नवीन टॅब ओपन करून खालील लिंक कॉपी-पेस्ट करा
मंदिर नावाचे मार्केट… (भाग १) - http://goo.gl/zrw2z
मंदिर नावाचे मार्केट… (भाग २) - http://goo.gl/rGn0V
मंदिर नावाचे मार्केट… (भाग ३) - http://goo.gl/XPULg
मंदिर नावाचे मार्केट… (भाग ४) - http://goo.gl/L5SeL
मंदिर नावाचे मार्केट… (भाग ५) - http://goo.gl/UCKRx
मंदिर नावाचे मार्केट… (भाग ६) - http://goo.gl/WKEiy
मंदिर नावाचे मार्केट… (भाग ७) - http://goo.gl/09zut

First Published: Friday, January 25, 2013, 22:15


comments powered by Disqus