मोदी पर्व ?

Last Updated: Friday, May 25, 2012 - 22:50

 www.24taas.com, मुंबई

 

नरेंद्र मोदी आज ज्या उंचीवर उभे आहेत, त्या स्थानावर आता मागे वळून पाहणं अशक्य आहे. गेल्या दहा वर्षात विकास पुरुष म्हणून मोंदीनी ओळख निर्माण केलीय. तसेच भाजपमध्येही त्यांच्या तोलामोलाचा दुसरा नेता सध्यातरी दिसत नाही. त्यामुळे मोदींना घेरण्याचा प्रयत्न आप्तस्वकीयांकडूनच केला जाणार हेही उघडचं आहे. त्यामुळेच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांशी मोदींचं पटत नसल्याची माहिती  प्रथम लिक होते  आणि  पक्षाच्या कार्यकारीणीत मोदी उपस्थित राहणार नसल्याचे मथळे होतात, त्यानंतर पक्षाच्या नेत्यांना प्रसार माध्यमांसमोर येवून खुलासा करावा लागतो.

 

भाजपचा चेहरा

 

भाजपच्या या पर्वातला महत्त्वाचा चेहरा आहे, नरेंद्र दामोदर मोदींचा... राजकारणात व्यक्ती बदलतात, परिस्थिती बदलते मात्र, वास्तव काही बदलत नाही. गेल्या दहा वर्षांच्या राजकीय प्रवासादरम्यान मोदींच्या व्यक्तीमत्वाचे अनेक पैलू  उलगडत गेलेले दिसतात. कधी अपेक्षा, कधी दृढनिश्चय तर कधी असहायता... प्रत्येक राजकीय नेत्याला आपल्या  कारकिर्दीत एकदातरी चक्रव्यूहातून जावं लागतं आणि नरेंद्र मोदींच्या बाबतीतही तेच आहे.  गुजरात दंगल, भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशी असलेला दूरावा  आणि विरोधकांचा हल्ला हे सगळं काही नरेंद्र मोदीसाठी एखाद्या चक्रव्यूहापेक्षा काही कमी नाही. पण, चक्रव्यूहालाच चक्रव्यूहात अडकवून  मोदींनी आपल्या विरोधातील प्रत्येक  चक्रव्यूह भेदलं आहे. आपल्यावर होणाऱ्या आरोपांनाच ढाल बनवून त्यांनी आपली राजकीय शक्ती वाढवली.  आज भाजपामध्ये मोंदीना तुल्यबळ पर्याय दिसत नाही. मोदींनी आपल्या राजकीय कारकिर्दीचं पाळमुळं  केवळ गुजरातमध्येच रोवलीत असं नाही तर गुजरात बाहेरही त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे. तसेच  कोमेजलेल्या भाजपला नवसंजीवणी देण्याची तादत त्यांच्यात आहे, असं त्यांच्या समर्थकांना वाटतंय. भारतीय राजकारणातील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून आज नरेंद्र मोदींकडे बघीतलं जातंय. आपण मुंबईला जाणार असं जेव्हा नरेंद्र मोदींनी सांगितलं तेव्हा कुठं पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाचा जीव भांड्यात पडला. खरं तर या कुरघोडीच्या राजकारणात भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा पराभव झालाय. कारण पक्ष आणि संघाची इच्छा नसतानाही नरेंद्र मोदींनी संजय जोशींची विकेट घेतली आणि त्यानंतरच ते मुंबईकडं रवाना झाले होते.

 

आता लक्ष्य एकच... लोकसभा निवडणूक २०१४

भाजपात मोदी युगाची सुरुवात झाल्याची चर्चा जोर धरु लागल्यामुळे 2014च्या लोकसभा निवडणुकीत भाजपकडून नरेंद्र मोदींचं नाव पुढं केल जाणार का? असा सवाल त्यांच्या समर्थकांकडून केला जातोय. 2014 ची लोकसभा निवडणूक  अवघ्या दोन वर्षांवर येऊन ठेपलीय असून दहा वर्षापूर्वीचं गुजरात दंगलीचा भूत पुन्हा डोकं वर काढणार तर नाही ना? तसेच आगामी सार्वत्रिक निवडणुकीत भाजपचा हा चेहरा खरंच काही चमत्कार घडविणार  का असा सवालही अनेकजण उपस्थित करतात. नरेंद्र मोदींचं व्यक्तीमत्व जेव्हा स्वच्छ मानलं जातं तेवढेच गंभीर डागही त्यांच्यावर आहेत. मुंबईतील पक्षाच्या कार्यकारणीत नरेंद्र मोदींना जो मानसन्मान आणि महत्त्व देण्यात आलंय ते पाहता पक्ष त्यांच्या लोकप्रियतेचा फायदा घेण्याच्या तयारीत आहे, हे आता लपून राहिलेलं नाही.

 First Published: Friday, May 25, 2012 - 22:50


comments powered by Disqus