सही रे सही !,cheque, signature, Czech the wrong sign, sahi re sahi

सही रे सही !

सही रे सही !
www.24taas.com,मुंबई

चेक लिहिताना सावधान !

चेकवरची सही चुकत तर नाही ना ?

सहीतील तफावत पडेल महागात !

सही चुकल्यास जावं लागेल तुरुंगात !

जर तुम्ही आर्थिक व्यवहार चेकने करत असाल तर हे तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. कारण चेकवर सही करण्यास तुम्ही विसरलात, किंवा सही करतांना चूक झाल्यास तुमच्यावर तुरुंगात जाण्याची वेळ येऊ शकते. वाचून धक्का बसला ना. मग घ्या खबरदारी.

चेकधारकांनो सावधान !, चेक लिहिल्यानंतर पुन्हा एकदा तपासून घ्या सही!, तुम्ही चेकवर सही केलीय?, चेकवरची सही चूकली तर नाही ना? याची पुन्हा चाचपणी करू घ्यावी. खरं तर ही किरकोळ चूक आहे... पण आता चेकधारकांना ही चूक भलतीच महाग पडण्याची शक्यता आहे..जर चेकवर सही करतांना चूक झाल्यास तसेच चेक बाऊन्स झाल्यास तुमच्यावर होणार फौजदारी. त्यामुळे किरकोळ चूक महागात पडेल, हे मात्र नक्की. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने महत्वाचा निकाल दिलाय.

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काय सांगतो?

चेकवरील सहीत तफावत आढळल्यास ठरणार गुन्हा!,`चेकवरची सही ही बँकेतल्या सहीशी तंतोतंत जुळायलाच हवी. कारण सहीतल्या फरकामुळे चेक बाऊन्स झाला तर खातेदारावर फौजदारी कारवाई करा`

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायधिश टी.एस. ठाकूर आणि न्यायाधीश सुधा मिश्रा यांच्या खंडपिठाने गुजरात उच्च न्यायालयाचा निकाल रद्दबादल ठरवत हा निकाल दिलाय.

गुजरात उच्च न्यायालयाचा निकाल

चेकधारकाने चेक दिल्यानंतर आपल्या खात्यात चेक वटवण्याइतकी रक्कम न ठेवल्यास त्याच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. मात्र सहीतल्या फरकामुळे चेक बाऊन्स झाल्यास खातेदारावर कारवाई फौजदारी कारवाई करता येणार नाही`

या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने निकाल देतांना हेही स्पष्ट केलं आहे की अशा प्रकरणात बँकेने चेक परत करते वेळी संबधीत खातेधारकाला नोटीस देणे आवश्यक आहे..तसेच खातेदारा विरुद्ध फौजदारी खटला भरण्यापूर्वी त्याला ती रक्कम जमा करण्याची संधी दिली पाहिजे.

चेकवरची सही चुकल्यास चेक धारकारवर फौजदारी खटला चालवला जाऊ शकतो.सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे चेकच्या मध्यमातून होणा-या फसवणुकीला आळा बसणार आहे. न्यायालयाच्या निकालाचा बँक खातेदारांना फायदा होणार आहे. पण बँक त्यावर अंमलबजावणी कशी करणार, हा खरा प्रश्न आहे. वाढत्या वयोमानाप्रमाणे सहीत बदल होतो. त्यावर बँक कोणता मार्ग काढणार? यामुळे फसवणुकीच्या प्रकारांना कशा प्रकारे आळा बसेल? चेकवर सही करतांना चूक झाल्यास कोणते परिणाम होऊ शकतात, याची माहिती बँकांकडून आपल्या खातेदारांना दिली जातेय का? हा देखील एक प्रश्न आहे.
सही रे सही !

चेक फसवणुकीवर लगाम!

या निकालामुळे पारदर्शकता वाढीला लागेल. तर बँक व्यवहारिक कसं बनवणार, हा प्रश्न आहे. तसेच वाढत्या वयाबरोबरच सहीत बदल होतो . बँक यावर कोणता उपाय शोधणार आहे का?,चेक फसवणुकीवर कसा लगाम लावणार?, सही चुकल्यास होणा-या कारवाईची माहिती बँकेकडू दिली जातेय का? आदी प्रश्न आहेत.

देशात चेक आणि ड्राफ्टच्या माध्यमातून होणा-या फसवणुकीच्या गुन्ह्यात दिवसेंदिवस वाढ होतेय. त्यातून बँकेला मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागतंय. चेक आणि ड्राफ्टच्या वाढत्या फसवणुकीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवरमुळे भारतीय रिझर्व बँकेनं देशभरात सीटीएस अर्थात चेक ट्रंकेशन सिस्टम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार बँकांना हायटेक सिक्युरिटी फिचरवाले चेक पुरविण्यात येणार आहेत. या चेकसाठी चेक वटवतांना इमेज बेस्ड चेक प्रोसेसिंग योजना तयार करण्यात आलीय. त्यामुळे आगामी काळात चेकचा व्यवहार अधिकाधिक सुरक्षित करण्याचा प्रयत्न रिझर्व बँकेककडून केला जाणार आहे.

आता मिळणार नवीन चेक

चेकच्या माध्यमातून होणा-या फसवणुकीला आळा घालण्यासाठी रिझर्व बँक प्रयत्न करत आहे. त्यामुळेच नवीन वर्षात तुमची बँक जुन्या पद्धतीचे चेक स्विकारणार नाही. त्यामुळेच बँकांनी आपल्या खातेदारांना ३१ डिसेंबरपूर्वी नवीन पद्धतीचे चेक बुक घेऊन जाण्याच्या सूचना दिल्या आहेत.

जर तुम्ही तुमच्या बँकेतून नवीन मानांकन असलेलं चेक बुक घेतलं नसेल तर जास्त उशीर करु नका.कारण ३१ डिसेंबर नंतर जुन्या चेकच्यामाध्यमातून तुम्हाला कोणताच आर्थिक व्यवहार करता येणार नाही. केवळ नवीन चेकच्या माध्यमातून तुम्हाल तुमचा आर्थिक व्यवहार करता येणार आहे..रिझर्व बँकेने या संदर्भात सर्व बँकांना आदेश दिले आहे. ३१ डिसेंबर पूर्वी नवीन चेकबुक देण्याचा आदेश रिझर्व बँकेकडून जारी करण्यात आला आहे.

सुरक्षेच्या दृष्टीने चेकमध्ये सिक्युरिटी वॉटर मार्क आणि टेक्स्ट फिचर असणार आहेत. चेकसाठी आल्ट्रव्हायलेट सेन्सिटिव्ह टेंपर एव्हिडेंट पेपरचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे चेकवर करण्यात आलेली फेरफार तात्काळ लक्षात येणार आहे. नवीन प्रणाली नुसार तयार करण्यात आलेल्य़ा चेक बुकची लांबी ७ इंच तर रुंदी ४ इंच असणार आहे. आज पर्यंत विविध बँकांकडून आपल्या सोईनुसार विविध आकाराचे चेक तयार केला जात होते. ती पद्धत आता बंद होणार आहे.

कोणाला घ्यावं लागणार नवीन चेक बुक?

जर आता पर्यंत तुम्ही जुन्या चेकबुकचा वापर करत असाल तर आता तुम्हाला नवीन चेकबुक घ्यावं लागणार आहे..काही बँकांनी आपल्या खातेदारांना नवीन पद्धतीचे चेक बुक वितरीत केले आहेत..ज्यांना ते चेकबुक मिळाले आहेत त्यांनी नवीन चेकबुक घेण्याची आवश्यकता नाही.

गेल्या काही दिवसांपासून प्रत्येक बँकेकडून आपल्या खातेदारांना सीटीएस चेक बुक विषयी मोबाईल फोनवर माहिती दिली जात आहे. तसेच नवीन चेकबुक घेतांना जुनं चेकबुक बँकेत जमा करावं लागणार आहे.

कोणता परिणाम होणार?

ज्यांनी ३१ डिसेंबरनंतरचे पोस्ट डेटेड चेक दिले आहेत अशा व्यक्तिंना याचा फटका बसणार आहे. ज्यांनी असे चेक दिले आहेत त्यांना आता नव्याने नवीन पद्धतीचे चेक द्यावे लागणार आहेत..काही बँकांनी पुढच्या काही काळासाठी जुने चेक स्विकारण्याची तयारी दर्शवली आहे.

सर्वसामान्य माणूस खातेदार म्हणून पैशाचं ट्रान्झॅक्शन करताना नेहमीच भांबावलेला असतो. तुमच्या याच भांबावलेपणावर कुणाची तरी नजर असते. ठकसेन टोळ्यांना आता मात्र लगाम लागणार आहे. कारण आता नव्या प्रणालीत क्लिअऱन्सला येणा-या चेकमधील फेरफारी, नजरेतून सुटू शकणार नाही.
सही रे सही !

देशात चेक, ड्राफ्ट फसवणुकीचे गुन्हे

२०१०- २०११ मध्ये १९,८३४ गुन्ह्यांची नोंद
३७९९ कोटी रुपयांचं नुकसान
२०११-२०१२ मध्ये १४,७२७ गुन्ह्यांची नोंद
४४४८ कोटी रुपयांचे नुकसान

फसवणुकीच्या माध्यमातून होणा-या नुकसानीची ही आकडेवारी डोळ्यात अंजन घालणारी आहे.चेक आणि ड्राफ्टच्या माध्यमातून केली जाणारी फसवणूक लक्षात घेता रिझर्व बँकेनं चेक ट्रंकेशन सिस्टिम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामाध्यमातून विशिष्ट पद्धतीचे हायटेक सेक्युरिटी फिचर्स असलेले चेक तयार करण्यात येणार आहेत. वाढत्या फसवणुकीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर बँकेत चेक वटवतांना इमेज बेस्ड चेक प्रोसेसिंग प्रणालीचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे अशाप्रकारच्या फसवणुकीला आळा बसेल. देशाची राजधानी दिल्लीत गेल्या दोन वर्षांत अशा प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे.

दिल्लीत फसवणुकीच्या घटना

२०११मध्ये २४ गुन्ह्यांची नोंद
२०१० मध्ये ३४ गुन्ह्यांची नोंद

बँक चेक आणि ड्राफ्टमध्ये खाडाखोड करुन फसवणूक करण्याच्या घटना वाढत असून अशी फसवणूक करणा-या टोळ्यांवर वेळीच लगाम करण्याची आवश्यकता आहे. अन्यथा अशा फसवणुकीच्या घटना वाढत जाण्य़ाची शक्य़ता नाकारता येत नाही.

First Published: Tuesday, December 04, 2012, 12:59


comments powered by Disqus